चिऊ 3

चिऊ ही तुमच्या आमच्यासारखीच शाळेत जाणारी मुलगी. बघा आवडते का..

चिऊच्या खुप सा-या आठवणी आहेत. त्या आठवणींमध्ये रमायला नक्कीच आवडेल तुम्हाला. बघूया आज चिऊची कोणती आठवण समोर येतेय.
चिऊचं घर ज्यात ती सध्या रहात होती त्याआधी ती दुसरीकडे रहायची. दुसरीकडे म्हणजे सध्या चिऊ हक्काच्या घरात रहात होती. आधी ती भाड्याच्या घरात रहायची. म्हणजे तिचे आई वडील सुरवातीला भाड्याच्या घरात रहायचे. त्यावेळी चिऊ खुपच लहान होती. म्हणजे बघा..ती बालवाडीत असेल. तर तिचं वय ४-५ वर्षे असणार. 
ते भाड्याचं घर जरा गावात आतमध्येच होतं. अगदी छोटंसं. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर १ रुम- किचन. त्या घराच्या मागच्या दाराला लागूनंच शेत होतं. घर एकटं नव्हतं. लागूनंच त्याला दुस-या खोल्या होत्या. तिथे दुसरे भाडेकरू रहायचे. चिऊचं ते घर एका कोप-यात होतं आणि त्याजवळंच एक जीना वर जायचा. पहिला मजला. त्या पहिल्या मजल्यावर सुद्धा भाडेकरूच रहायचे. 
चिऊ शेजारीपाजारी खेळायला जायची. खुप खेळायची. वयंच होतं ते खेळण्याचं. आणि खेळता खेळता खुप करामती व्हायच्या.
एकदा चिऊ सहजंच खेळता खेळता पहिल्या मजल्यावर गेली. सगळ्यांसोबत खेळत असताना अचानक त्यांनी वेगळाच खेळ चालू केला. जिन्यावरुन खाली वर करण्याचा. त्या पाय-या  ओबडधोबड आणि ओलसर होत्या. अशा पाय-यांवर त्यांचे खेळ सुरु झाले. चिऊचा मात्र अंदाज चुकला. आणि नेमकी ती वरुन पहिल्या पायरीवर होती. बिचारी. घरंगळत, पूर्ण स्वत:लाच वळसे घालत ती थेट खालच्या पायरीवर येऊन पडली. मग काय. तिचे कोपर फुटले, डोक्याला आणि गालाला मार लागला. दातातून रक्त येऊ लागले आणि हनुवटीला जोरात मार लागला. इतकं होऊन देखिल ती रडली नाही. सगळ्यांनी चिऊच्या आईला बोलावले. आई तिला घरी घेऊन गेली. औषध लावून तिला आराम करायला सांगितला. तिला त्रास देऊ नका म्हणून सगळया पोरांना दटावले. चिऊला उगीचंच special feeling आलं.  चिऊने मात्र पुन्हा त्या जिन्यावर पाऊल ठेवले नाही.
 चिऊच्या घराच्या गल्लीतून वळसा घेऊन थोडं पुढे गेलं की तिकडे विहिर होती. मोठी पट्टीची पोहणारी मुले त्या विहीरीच्या खोल तळाशी पोहायला जायची. चिऊ कधीच नाही उतरली त्या पाण्यात. तिला विहीरीचीच भीती वाटायची.
त्या विहिरीचा कच्चा रस्ता पुढे जाऊन मोठ्या रस्त्याला मिळायचा. तिथेच कोप-यात काही चिल्ल्यापिल्ल्यांसोबत चिऊ खेळायला जायची. तिकडे एका झाडाला लागून मधुमालतीची वेल फुलली होती. मधुमालतीची ती लांब दांडी असलेली फिक्या किंवा गडद रंगाची फुले फारंच मोहक होती. तिकडे चारही बाजूला त्या फुलांचा सडा पडलेला असायचा. चिऊच्या काही मैत्रिणी त्या फुलांची खुप सुंदर वेणी विणायच्या. चिऊने खुप प्रयत्न केले. पण तशी सुंदर वेणी तिला जमलीच नाही कधी.
एकदा चिऊ दारासमोर खेळत होती. तिच्याकडे एक छान चेंडू होता. सगळी चिल्लर पार्टी मिळून चेंडू खेळू लागली. असंच खेळता खेळता अचानक तो चेंडू एका डबक्यात जाऊन पडला. एका घराच्या कोप-यात ते डबकं होतं. चिऊच्या आकाराच्या मानाने ते दुप्पट-नाही नाही चौपट आकाराचं होतं. त्यातलं पाणी अतिशय खराब आणि त्यावर शेवाळ आलेलं होतं. आता झालं काय की नेमका चिऊचा चेंडू त्या डबक्यात पडला. आणि तो ब-यापैकी दूर गेला. त्यामुळे चिऊचा इवलासा हात त्याच्यापर्यंत पोहोचतंच नव्हता. 
चिऊने इकडेतिकडे बघितलं. आणि तिला एक लांब काडी दिसली. चिऊने ती कडी घेतली आणि त्याने चेंडू स्वत:कडे सरकवण्याचा प्रयत्न करु लागली. चेंडूच तो. हलका... पाण्यावर तरंगत होता. त्याला काडीमुळे गती मिळाली. तो अजुनंच लांब गेला चिऊपासून. चिऊ थोडी अजून पुढे सरकली. कमरेत वाकली. आधारासाठी आजुबाजुला काहिच नव्हते. स्वत:ला कसेबसे सावरत तो आवडता चेंडू बाहेर काढायचा तिचा आटापिटा चालू होता. आणि डुबुकऽऽ!! तिचा तोल गेला. पाय घसरला. आणि पोरगी त्या डबक्यात. चेंडू तर मिळालाच नाही पण तीच त्या घाण पाण्याच्या डबक्यात पडली.
नशीब ते डबकं जास्त खोल नव्हतं. तिने मान वर काढली तोच  तिकडेच बघत असणा-या एका काकांनी तिला बखोटीला धरलं आणि वर काढलं. कोणीतरी तिच्या आईला बोलावलं. आईने येऊन बघितलं. आता फटका द्यायचा तर पोरगी वरपासून खालपर्यंत खराब पाण्याने भरलेली. हात तरी कसा लावणार. तरीपण शेवटी आईच ती. हाताच्या कोपराला धरुन घेऊन आली तिला. हा पण तोंडाचा पट्टा चालूच होता. आता तेवढं तरी ओरडायला पाहिजे ना. चिऊ बिचारी काय बोलणार. ती ऐकुन घेत होती. सगळे ते प्रात्यक्षिक बघत होते.
आईने चिऊला बाहेरंच अंगणात उभे केले. घरात गेली आणि बादलीभर पाणी आणि साबण घेऊन आली. मग चिऊला घासूनपुसून आंघोळ घातली.  तिला कोरडी केली. चांगले कपडे घातले. आणि पाठीत एक धपाटा घातला आणि ओढत घरात घेऊन आली. 
चिऊ मात्र खुश होती. तिला डबक्यात पडण्याचं काहिच वाटलं नाही. तो चेंडू मिळाला की नाही माहीत नाही. पण चेंडू काढण्यासाठी तिने प्रयत्नांमध्ये कसलीही कसूर केली नाही याचाच तिला आनंद होता.

कशी वाटली तुम्हांला चिऊ? आवडली का? आवड़ेल तिला अधूनमधून भेटायला? तिच्या आयुष्यातल्या गमतीजमती वाचायला? नक्की कळवा.

🎭 Series Post

View all