Login

थोरलेपण.. भाग एक

जया अंगी मोठेपण तया यातना कठीण
थोरलेपण भाग एक

“हे बघ ताई तुझा हा फुकटचा सल्ला तो तुझ्याजवळ ठेव मला त्याची काही एक गरज नाहीये.” अतिशय उर्मटपणे धाकटी रसिका मोठ्या बहिणीला रीताला चढ्या आवाजात सांगत होती.

“गरज आहे म्हणूनच मी हे बोलते आहे. आणि तू स्वतःला समजतेस तरी कोण ग? तुला थोडी जरी समज असती ना तर तुझ्यावर आज ही वेळ आली नसती. अक्कल ना शक्कल. अंगात भरला आहे तो केवळ, मीपण, हट्टीपणा आणि स्वार्थ! तुझ्या या अशा आडमुठ्या स्वभावामुळे या घरात आजपर्यंत कुणाचं भलं झालं आहे? बाकीच्यांचं सोड तुला तरी त्याचा कवडीचा फायदा झाला आहे का?” रीतनेही आता रसिकाला तिच्याच भाषेत उत्तर द्यायला सुरुवात केली होती.

“तर तर, तू तर अगदी समंजस, समजूतदार, आई पप्पांच्या अर्ध्या वचनातच आहेस ना! तू केवळ तोंडावर चांगुलपणाचा आव आणतेस पण तुझ्या मनात मात्र वेगळच काहीतरी असतं. तुझे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. आई पप्पांना जरी समजत नसलं ना तरी मी मात्र तुला पुरेपूर ओळखून आहे.” रसिका तिच्या मनाला येईल ते, मागचा पुढचा विचार न करता वाट्टेल तसं मोठ्या बहिणीवर तोंडसुख घेत होती.

“रसिका तोंडाला आवर घाल तुझ्या, मनाला वाटेल तसं, मनात येईल ते बरळू नकोस! उचलली जीभ आणि लावली टाळूला! मोठ्याचं मोठं पण नाही लहानाचं लहान पण नाही! अगं उद्धटपणाची पण एक सीमा असते, बोलण्याची पण एक पातळी असते, पण नाही तू तर आई-बाबांचे सर्व संस्कार आणि आपल्यापेक्षा मोठ्यांशी वागण्या बोलण्याची रीतच विसरली आहेस. तुझ्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाहीये.” स्वतःचा स्वाभिमान दुखावल्याने रीताही आता रसिकाला तिच्याच भाषेत उत्तर देत होती.

“एवढं सगळं माहिती असून सुद्धा प्रत्येक वेळी तू माहेरी येऊन, सतत आई-बाबांच्या मागे माझ्या लग्नाचा तगादा का लावतेस? तुझ्या बोलण्याचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही आणि मी कुणालाही दादही देणार नाही हे माहिती असूनही तेच ते विषय तुम्ही सगळेजण का उगाळून काढता?” स्वतःच्या लग्नाचा विषय निघाला की रसिका वागण्या-बोलण्यावरचा ताबा सोडून ज्याने त्या विषयाला हात घातला त्याच्याशी ती भांडण करी,जुनी उणीदूनी उकरून काढत उगाच शब्दाला शब्द वाढवत नेऊन नेहमीच वाद विकोपाला जाई. तिच्या लग्नाचा विषय काढणारी व्यक्ती ही तिच्यासाठी आता जगातली सर्वात मोठी शत्रू झालेली होती. घरात कुणीही तिच्या लग्नाच्या विषयाला हात घातला की ती समोरच्या व्यक्तीचा अगदी खालच्या शब्दात घालून पाडून बोलून अपमान करी.


©® राखी भावसार भांडेकर. नागपूर

सदर कथा हि संपूर्णतः काल्पनिक असून या कथेतील घटनांचा आणि पात्रांचा वास्तवात कुणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा, तसेच ही कथा राखी भावसार भांडेकर यांची असून प्रकाशनाचे सर्व हक्क लेखीकेकडे राखीव आहे. या कथेचे व्हिडिओ बनवण्यास परवानगी नाही.

0

🎭 Series Post

View all