Login

जवळ असतांनाही दूर

This is the heart touching classic love story which is depends on moral thoughts and it will be best example for young generation to find out the meaning of true love and promise .? Story Expresse full of emotions with patients..


..✍️ Copyright © जगदिश लक्ष्मण वानखडे..





                 "जवळ असतानाही... दूर.."

                    



             सकाळी बजरचा कर्कश आवाज झाला.

"अहो, उठा! सहा वाजलेत"  "हो." म्हणून अमितने कूस बदलली. प्रेरणाने अंथरुण आवरते घेतले. सकाळची सर्व कामे घाईघाईत संपवली आणि अमितच्या डब्याच्या तयारीला लागली. आज काय करू.? या विचारातच तिने भेंडी चिरायला घेतली. डबा पूर्ण झाला. पण अजूनही अमित उठला नव्हता.

"आज ऑफिसला जायचं नाही का.? आठ वाजलेत! उठा लवकर."

अमित इच्छा नसूनही कसाबसा उठला व ऑफिसला जाण्याच्या तयारीला लागला.

"अग! स्वाक्स, रुमाल काढून ठेव."

"तुम्ही नाष्टा करणार आहात का ?"

"नाही.. आता एवढा वेळ नाही."

घाईघाईत अमितने सर्व आटोपते घेतले. जाताना अमित आईला म्हणाला,

"आई, तुझे मेडिकल घेऊन येतो गं आज! आणखी काही हवं असेल तर प्रेरणाला कॉल करायला सांगशील." असं बोलून तो ऑफिसला निघून गेला. प्रेरणा आता पुढची कामे करायला मोकळी झाली. भांडी, धुणे, साफसफाई, इत्यादी कामे करून ती पुन्हा दुपारच्या स्वयंपाकाला लागली. आई-बाबांना वाढून, स्वतः जेवण केले व आराम करायला पहडली.



                प्रेरणाच्या लग्नाला आता जवळपास दीड वर्ष होत होते. एक हाऊसवाइफ म्हणून ती सर्व जबाबदाऱ्या पार पाडत होती. दिसायला सुंदर, बोलकी, हुशार अशी प्रेरणा कॉलेजला असतांना सर्वाना प्रेरणा देणारी, आत्मविश्वास असणारी होती. मात्र आता हिचं प्रेरणा जेवढी बोलकी, तेवढीच अबोल झाली होती. हळूहळू तिच्या मनातल्या आत्मविश्वासाची जागा भीतीने घेतली होती. तिच्यात अल्पावधीतच आमूलाग्र बदल झाला होता. या बदलांची जाणीव तिला पदोपदी होत होती. मात्र तिला आता या सर्व गोष्टींचे काहीच वाटत नव्हते.. सकाळी त्या बजरच्या कर्कश आवाजाने उठायचं. दिवसभर कामे करण्याची. अमितच्या आई-वडिलांची काळजी करायची. रात्री अमितला जेव्हा पाहिजे तेव्हा त्याची शारिरीक गरज पूर्ण करायची..... इच्छा नसतांनाही ती हे सर्व करत होती. आपण एक स्त्री नसून कामं करणारे यंत्र आहोत व 'यंत्राचं फक्त दुसऱ्यांच्या मर्जी प्रमाणे काम करणे.. एवढेच काम असतं!' अशीच अवस्था तिची झाली होती. कधी-कधी त्या सकाळी वाजणाऱ्या कर्कश बजरप्रमाणे आपलं आयुष्यही कर्कश झालं आहे, असं तिला वाटत होत.



                   दिवाळी जवळ येत होती. लग्नानंतर येणारी ही तिची दुसरी दिवाळी होती. मात्र प्रेरणा 'दिवाळी' या शब्दानेही प्रफुल्लित होत होती. गेल्या दिवाळीत परीक्षित भेटला नाही. वचन देऊनही भेटला नाही. याचा तिला खूप राग आला होता व आता आपणही त्याला भेटायचं नाही असं मनोमन तिनं ठरवलं होतं. पण जसजशी दिवाळी जवळ येत होती, तिची त्याला भेटण्याची आतुरता वाढतच चालली होती. 'म्हणतात प्रेमात रागाला काहीच किंमत नसते, तो क्षणात येतो व क्षणात जातो. प्रेम रागावर भारी पडतेच. कारण त्या रागातही प्रेमाचा रंग दाटून भरलेला असतो.'... तशीच तीही परीक्षितच्या प्रेमात अखंठ बुडालेली होती. मात्र प्रेमविवाहाला कुटुंबीयांचा तीव्र विरोध, 'आईवडिलांच्या मर्जीविरुद्ध लग्न करायचं नाही असं एकमेकांना दिलेलं वचन.' यामुळे त्यांचं लग्न झालं नाही. एकुणच भित्र्या समाजाचे अलिखित नियम, त्यामळे होणारी बदनामी, आईवडिलांचं दुःख. आईचं ते रडणं. या सर्व गोष्टींनी मिळून त्यांच्या प्रेमाचा वध केला व तेही या लढाईत शेवटी इतरणाप्रमाणे हरलेच.



                या दिवाळीत परीक्षित भेटेल का ? या विचारच आता प्रेरणा राहत होती. 'जर तो या दिवाळीतही भेटला नाही तर ?'  या विचाराने मात्र ती सुन्न होत होती व तिला सारखं रडायला येत होतं. प्रेमात अखंड बुडालेला माणूस प्रेमाच्या भोवऱ्यात सापडला की, तो त्याच भोवऱ्यात.. भावनेच्या घिरट्या घालत राहतो, किनाऱ्यावर पोहचतच नाही. तीही अशीच भावनेच्या भोवऱ्यात घिरट्या घालत होती. किनारा तर तिला दिसेनासाच झाला होता. लग्नाआधी परीक्षितसोबत झालेली भेट तिला आठवत होती. तिच तिची त्याच्यासोबतची अखेरची भेट होती. आपण दिवाळीत दरवर्षी फक्त एक वेळेस भेटायचं असं त्यांनी ठरवलं होतं. असं वचनच तिने परीक्षितकडून घेतलं होतं  या वचनामुळे व परीक्षितसोबत 'लग्न' नावाचं लेबल न लावताही आपण आपलं प्रेम टिकवून ठेवू शकतो. या विचाराने ती लग्नाला तयार झाली होती. दरवर्षी दिवाळीत निदान एक वेळस भेट झाली तर त्याला निदान आपल्याला एक वेळ पाहता येईल. त्याच्या आयुष्यात काय सुरू आहे ? तो कसा आहे ? याबाबत जाणून घेता येईल व या भेटीच्या आनंदाने व दरवर्षी त्याच्या भेटीच्या आतुरतेने वाट पाहण्यातच पूर्ण आयुष्य जगता येईल, असं तिला वाटत होतं.



               दरवर्षी प्रमाणे दिवाळी आली. प्रेरणाने दिवाळीची सर्व कामे केली. तिचे वडील तिला माहेरी घेऊन जाण्यासाठी आले होते. त्या दिवशी अमितने ऑफिस मधून सुट्टी घेतली व तिच्या वडिलांचे सर्व आदरातिथ्य केलं. प्रेरणानेही सर्व कामे लवकर आटोपती घेतली व जाण्याची तयारी केली. तिची आता परीक्षितला भेटण्याची ओढ वाढतच चालली होती. अमितने त्यांना ट्रेनमध्ये बसवून दिले. ट्रेनच्या वेगाने तिच्या मनातील विचार धावू लागले व कधी परीक्षितला भेटते असं तिला वाटू लागले. चार तासांचा प्रवास तिला खूपच मोठ्ठा वाटायला लागला.  ट्रेनमधून उतरून धावतच सुटावे व घरी पोहचवे अस वेडंवाकडं तिच्या मनात येत होतं.



              एकदाची ती घरी पोहचली. कधी नव्हे परीक्षितला भेटण्याचा दिवस उगवला. दिवाळी नंतरचा पाचवा दिवस. संध्याकाळी ठीक पाच वाजता भेटण्याचं ठरले होते. प्रेरणा चार वाजताच तिथे जाऊन पोहचली. वाहती नदी. तिचे खळखळणारे पाणी. ऐटदार डोंगर, सुंदर परिजातकाचे झाड. तिथे बसून ती परीक्षितची वाट पाहत होती. गेल्या वेळी तो आला नाही. या वेळेसही आला नाही तर ?  'आपण त्याला मागच्या वर्षी कॉल करायला नको होता. कारण एक वर्ष कोणताच संपर्क करायचा नाही असं ठरलं होतं. म्हणूनच तो आला नसावा. मागच्या वेळेस कॉल केला तेव्हा,  'पुन्हा कॉल केला तर मी या जगात तुला दिसणार नाही'.. असंही त्याने तीला ठणकावून सांगितले होतं.  म्हणून यावेळेस खूप वेळा कॉल करावासा वाटुनही, तिने कॉल केला नाही, कारण 'परीक्षित जे बोलतो ते खरंच करून दाखवतो' हे तिला चांगलेच माहित होते.



          नदीच्या वाहत्या पाण्यासारखे असंख्य विचार तिच्या मनात येत होते व जात होते. बराच वेळ झाला. पाच वाजूनही गेले होते. पण परीक्षित अजून आला नाही. जणूकाही तिचं हृदय घडयाळाच्या काट्यावर सुरू आहे असं तिला वाटत  होतं. आता सूर्य पार क्षितिजाकडे गेला होता. त्याची अंधूक किरणं सभोवतालच्या डोंगरावर.. नदीच्या पाण्यावर तरंगू लागली. आता परीक्षित येणार नाही, असं तिला वाटू लागलं. ती फार हताश झाली होती. रडत-रडत ती कशीबशी उभी राहिली. चालत-चालत नदीपात्राजवळ गेली. निराशेच्या गर्तेत सापडलेली ती किनाऱ्यावर बसून ढसाढसा रडू लागली.  तिचे अश्रू नदीच्या पाण्यात..तिच्या भावनांना घेऊन वाहत होते. आता खूप वेळ झाला. घरी जाण्याची वेळ झाली. आता अजून थांबण्यात अर्थ नाही. असं सर्व समजत असूनदेखील तिचं मन त्याला भेटल्याशिवाय तिथून जायला तयारच होत नव्हतं. कॉल करावा म्हणून तिने पर्समधून मोबाईल काढला. तोच तिला त्याचे शेवटचे शब्द आठवले. 'मी या जगात दिसणार नाही'. या भीतीने तिने रडतच मोबाईल पुन्हा पर्समध्ये ठेवला. हताश, हतबल, झालेली ती किनाऱ्यावरून उठून परत घरी जाण्यासाठी निघाली. तोच तिला परीक्षित येतांना दिसला.



             त्याक्षणी त्याला पाहून बांध फुटावा तशी ती आवेगाने धावतच त्याच्या जवळ गेली. तिथे जाऊन त्याच्यासमोर पाणावलेल्या डोळ्यांनी उभी राहली. त्याला न्याहाळू लागली. ती त्याच्या मिठीत शिरली व त्याला घट्ट पकडून रडू लागली. त्याच्या मिठीत जाण्याची हि तिची पहिलीच वेळ होती. कारण आपल्या प्रेमात शारिरीक संबंधांचा कुठलाही लवलेशही नसावा असं त्यांनी ठरवलं होतं व त्याचं पावित्र्य त्यांनी अजूनही जपलं होतं. एवढे स्वच्छ, निर्मळ, पवित्र त्यांचं प्रेम होतं. मिठीत असताना परीक्षितला हृदयाला काहीतरी टोचत असल्याचं जाणवलं. तोच त्याने तिला मिठीतून एका क्षणात दूर केले.



"परीक्षित, राजा... काय झालं.?"

"ते मंगळसूत्र,.......टोचत.. आहे.."



तिच्या कपाळवरचे कुंकू अर्धवट पुसल्या जाऊन परीक्षितच्या शर्टला लागले होते. ती त्याला आज वेगळीच भासत होती. त्याने कशाचाही विचार न करता तिला दूर केले.



"असं करू नको राजा, एक वर्ष होउन गेले, तुला पाहतादेखील आलं नाही मागच्या वेळेसही तू आला नाहीस."



"का आलो नाही ? हे तुला माहीत आहे." जणू काही तो समोरचा डोंगरच मनावर ठेऊन बोलू लागला.

"आता ही आपली शेवटची भेट..यापुढे आपण नाही भेटणार."



"नाही, नाही असं बोलू नकोस राजा."

ती रडतरडत खाली कोसळली. त्याचे शब्द बाणाप्रमाने तिच्या हृदयात शिरले. मानसिकरित्या रक्तबंबाळ झालेली ती बोलू लागली,

"या एका वर्षाच्या आशेवरच मी जगत आहे आणि तू असं म्हणतोस, प्लिज असं काही बोलू नको, मी आता तू म्हणशील तेच करेल, कोणताच नियम नाही मोडणार, नाही करणार तुला कॉल..पण मला दरवर्षी फक्त एक वेळेस भेट.. प्लिज भेट.." ती त्याच्या पायाशी पडून, त्याची विनवणी करू लागली. तिची अशी अवस्था पाहून तोही आता रडू लागला.



                  तिला उठवून, तिला सावरत त्याने तिला त्या नेहमीच्याच पारीजातकाच्या झाडाखाली नेऊन बसविले. तिचा हात हातात घेऊन तिला सावरत तो बोलू लागला.



"राणी!  तू माझं ऐकतस मला माहिती आहे."

ती "राजा!" ती काही बोलण्याच्या आतच त्याने तिच्या ओठांवर हात ठेवला.



"आता मला बोलु दे, प्लिज बोलू दे, तू काहीही बोलू नकोस."

"तुझं मंगळसूत्र, तुझं कुंकू..पाहताक्षणीच मला तू पहिल्यासारखी भासली नाहीस ते कुंकू, ते मंगळसूत्र दुसऱ्याच्या नावाचे आहे. अशा स्थितीत आता माझा तुझावर कोणताच हक्क नाही." तो रडत-रडतच बोलत होता.



"आणि, तुही एक गोष्ट लक्षात ठेव! तुझं लग्न झालेलं आहे. अग्नीला साक्षी ठेऊन हे तू विसरू नकोस. तू खूप निष्पाप आहेस. कायम तशीच रहा. लग्नानंतरही तू मला कॉल करणं किंवा मला भेटणं आता उचित होणार नाही."

त्याचं बोलणं तिला रुतत होत. पण तो बोलतच होता.

"एक तर हे सर्व तुझ्या नवऱ्याला कळलं तर त्याच्या व तुझ्याही आयुष्याची माती होईल. एका सोबतच दोन्ही कुटुंबाची अब्रू बाजारात विकली जाईल. तुला कोणी... माझ्या राणीला कोणी...., व्यभिचारी म्हंटल तर ते मला मुळीच आवडणार नाही आणि तसंही आता माझ्यासोबत कोणताच संपर्क ठेवणे हे नैतिकदृष्टया योग्य नाही.. तू तशी नाहीस.. माझं तू ऐकशील मला माहित आहे."

तो हे सर्व बोलत होता नकळत त्याचे अश्रू तिच्या हातावर पडत होते. तीही बेभान झाली होती. तो जे काही बोलत होता ते तिला पटत होते. मात्र रुचत नव्हते. तिला न्याहाळत तो पुढे बोलू लागला.

"आई-वडिलांबाबतही कोणतंच शल्य मनात ठेऊ नकोस. प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलीचं आयुष्य अधिकाधिक सुखकर झालं पाहिजे. असंच वाटत असतं. अमित माझ्यापेक्षा दिसायला छान आहे. त्याची आर्थिक स्थितीही फार चांगली आहे. त्याच्या सोबत छान संसार कर. या सर्व गोष्टीत त्याची काहीच चूक नाही. त्याचा विश्वासघात आपल्या हातून होता काम नये."



त्याने तिचे अश्रू पुसले. स्वतःला सावरत तो पुढे बोलू लागला.



"आयुष्यात प्रत्येक स्वप्न पूर्ण होत नसतं. आयुष्याच्या पुस्तकातील काही पाने कोरीच राहतात, याचा अर्थ आयुष्य अर्थहीन झाले आहे असं मुळीच समजू नकोस, आणि आपल्या आयुष्यातील पाने हि तर खूप छान होती."

......एवढ्यात प्रेरणाला फोन येतो. छानसी रिंगटोन वाजते....

  

"लग जा गले, की ये हसीन रात हो ना हो.. शायद इस जनम मे फिर मुलखात हो ना हो."

           

     

अन दोघेही भानावर येतात. तिला त्याच्या मिठीत जावेसे वाटते, ते ही अखेरचे. पण ती जात नाही. ती म्हणते.



"माझा नवरा भौतिकरित्या माझ्याजवळ आहे. पण आत्मिकरित्या जवळ नाही आणि राजा, तू आत्मिकरित्या माझ्या जवळ आहेस पण भौतिकरित्या जवळ नाहीस. आज तू तुझ्या नावाप्रमाणे माझीच परीक्षा घेतलीस व माझ्या नावाप्रमाणे मला जगण्याची प्रेरणा दिली. पण एक सांगते. आज सर्वकाही माझ्याजवळ असूनदेखील दूर आहे. हेच नियतीला मंजूर असेल तर " ... ती मध्येच थांबते. व पुढे काही न बोलता, त्याचा शेवटचा निरोप घेते. ती जात असतांना तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे तो पाहत राहतो.



...समाप्त.



.....✍️..लेखक..जगदीश लक्ष्मण वानखडे.

Copyright 

All Rights Reserved



संपर्क - jalawa28@gmail.com




0