जिया धडक धडक जाये भाग एक

रागातून बहरणारं प्रेम
जिया धडक धडक जाये
भाग एक

त्यादिवशी स्वर चाचणी करिता स्टुडिओत जाताना नेमका तिला घरून निघायला उशीर झाला. तेवढ्यात रस्त्यात एका वयोवृद्धाला एका कारचालकाने धक्का दिला. कुणास ठाऊक कसे पण त्या वृद्धाने मदतीसाठी, याचनेच्या दृष्टीने पर्णकडे बघितले. क्षणाचाही विलंब न करता पर्णने त्यांना आधार तर दिलाच पण कारचालकाची चांगलीच खरडपट्टी काढून त्याला सज्जड दमही भरला. कारचालकाने पर्णच्या मदतीने त्या वृद्धाला दवाखान्यात नेलं. सगळं काही व्यवस्थित आहे असं बघून पर्णने स्टुडिओकडे धाव घेतली. पण स्टुडिओत ती जवळपास तासभर उशिरा पोहोचली होती. स्वर चाचणीसाठी आलेले सर्व उमेदवार निघून गेले होते. तिथल्या स्टेनोला वारंवार विनंती करूनही ती गोष्ट कानावर घेत नव्हती. शेवटी नाईलाजाने पर्ण निराशेने घरी जाण्यास वळली आणि तिला स्वर चाचणीसाठी स्टुडिओत बोलावण्यात आलं. दिलेले संवाद पर्णने सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित वाचले.

स्टुडिओच्या आत मध्ये कंट्रोल पॅनलवरून तिला मेसेज मिळाला की तिची निवड झाली की नाही हे तिला दुसऱ्या दिवशी कळवण्यात येईल.

आज सकाळपासून घडलेल्या सगळ्या घटना तिला वारंवार आठवत होत्या. झालेला उशीर, वयोवृद्धाचा अपघात, आणि कुठलीही आशा नसताना निवड समितीने तिला शेवटच्या क्षणी स्वर चाचणीसाठी दिलेली संधी. एकीकडे तिला मनोमन वाटत होतं की आपली निवड नक्की होणार आणि दुसरीकडे कुठेतरी मनात धाकधूकही होती. ‘मुलाखतीलाच जर आपण उशिरा पोहोचलो तर पुढल्या रेकॉर्डिंग साठी आपल्या नावाचा निवड समितीतले लोक विचार करतील का? आपलं काय इम्प्रेशन पडलं असेल त्यांच्यावर? गेले कित्येक महिने आपण या संधीची वाट बघत होतो, आणि आज नेमक्या वेळी हे असं घडावं. कदाचित यालाच नियती म्हणतात. घडलेल्या साऱ्या घटना कदाचित पुढल्या नवीन संधीची नांदीही असु शकतात.’ असे अनेक विचार तिच्या मनात उगीच काळजी निर्माण करत होते. तेवढ्यात प्रिया पर्णची मैत्रीण हातातली पर्स हवेत फिरवत फिरवत गाणं गुणगुणत आपल्याच नादात घरी परतली.

पर्णचा उदास आणि लटकलेला चेहरा बघून प्रियाने हाताच्या इशाऱ्यानेच विचारलं काय झालं? पर्णने घडलेला सगळा घटनाक्रम तिला सविस्तर सांगितला.

“बालिके तू कुठल्याच गोष्टीचा कसलाही विचार करू नको. जी घटना घडून गेली ती तू बदलू शकत नाही आणि येणारा भविष्यकाळ तुझ्या हातात नाही त्यामुळे तू वर्तमानात जग आणि आपल्या दोघींसाठी मस्तपैकी कॉफी आणि पकोडे बनवून आण.” प्रिया मस्करीच्या मूडमध्ये पर्णला चिडवत होती.

“तुझ्यासारखी लोकं माझे मित्र आहेत ना म्हणून माझी ही अवस्था आहे. इथे माझं सिलेक्शन होईल की नाही या विचाराने माझा जीव अर्धा होतो आहे. आणि तुला चहा-भज्यांच पडलंय. तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का ग?” पर्ण वैतागून बोलत होती.

“हे बघा मिस भावे ही जी काही तुमची ऑडिशन होती ना, त्याबद्दल मीच तुम्हाला सांगितलं होतं. तुम्ही तर तिथे जायलाही तयार नव्हत्या, मी पामराने तुमची मन धरणी केली म्हणून राजकन्या तिथे स्वर चाचणी द्यायला गेल्या, त्यामुळे आता नो नौटंकी, नो नाटक! कॉफी बनवायची आणि मस्त पडणाऱ्या पावसाचा आस्वाद घ्यायचा.” गाणं गुणगुणत आपल्याच तंद्रीत प्रिया ओले झालेले कपडे बदलायला आत गेली.

दुसऱ्या दिवशी स्टुडिओतून सिलेक्शन झाल्याचा पर्णला फोन आला आणि पर्णचा आनंद गगनात मावेनासा झाला.

एका नभो नाटकात नायिकेच्या भूमिकेसाठी पर्णची निवड होवून, तीला स्क्रिप्टही मिळाली होती. दोन दिवसानंतरच्या रेकॉर्डिंग करता पर्णला घरून तयारी करून यायला सांगितलं होतं. दोन दिवस पर्णने संवाद पाठ करून छान तयारी केली होती.

स्टुडिओत गेल्यानंतर तिने जेव्हा समरला बघितलं तेव्हा तिच्या लक्षात आलं की त्या दिवशी वृद्धाला कारचा धक्का देणारा कारचालकच तिच्या नभोनाट्याचा दिग्दर्शक असून त्यानेच संपूर्ण नाटकही लिहिले आहे.

स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंगची तयारी पूर्ण झाली होती. नाटिकेत काम करणारे सगळेजण स्वतःच्या संवादांचा सराव करत होते. एक-दोनदा तालीमही झाली आणि मग फायनल रेकॉर्डिंग होत असताना अचानक एका ठिकाणी संवाद म्हणता म्हणता पर्णच्या डोक्यात समरचा विचार चमकून गेला, स्वर-चाचणीच्या दिवशी वृद्धाला ज्याने कारचा धक्का दिला होता तो समरच होता, भर रस्त्यात तिने ज्याला फटकारलं आणि वृद्धाला दवाखान्यात नेण्यासाठी बजावलं तोही समरच होता, स्टुडिओमध्ये पर्ण जेव्हा संवाद वाचत होती, तेव्हा निवड समितीमध्येही समरच होता, आणि तिला मिळालेल्या पहिल्या नभोनाट्याचा दिग्दर्शकही समरच होता. हृदयाच्या एका कोपऱ्यात समरने हलकेच टकटक केल्यासारखं तिला वाटलं. काही क्षण ती समरच्या विचारात अगदी हरवून गेली आणि आजूबाजूला काय सुरू आहे याचं तिला भानच राहिलं नाही.

हे सगळं आठवून पर्ण पूर्णपणे निःशब्द झाली. तिला पूढचा कुठलाच संवाद आठवेना, जवळपास पाच सात मिनिटांचा पाॅज गेल्यावर शेवटी न राहून समर पर्णवर रागाने बरसला, “मिस भावे तुमचं हे काय सुरू आहे? दोन दिवसांआधी तुम्हाला स्क्रिप्ट घरी दिली होती ना संवाद पाठ करण्यासाठी? आज फायनल टेक आहे. चार दिवसांनंतरची तारीख आहे प्रसारणाची, स्टेशन डायरेक्टरने हे नाटक शेड्युल केलं आहे, मला एडिटिंग करता कमीत कमी दोन दिवस लागणार आहेत आणि तुम्ही ऐनवेळी संवाद विसरता? हे नभोनाट्य एअर वर जायलाच हवं. एक तर तुम्हाला नीट संवाद फेक जमत नाही, संवाद पाठ करून या म्हटलं तर त्याकडेही तुम्ही लक्ष देत नाही. घरी काय करता ओ तुम्ही? यानंतर माझ्या नाटकात असा गलथानपणा मला सहन होणार नाही.” समरची ही वाक्ये पर्णच्या जिव्हारी लागली, आणि नेक्स्ट टेक मध्ये पूर्ण नाटक व्यवस्थित रेकॉर्ड झालं. यावेळी पर्णला पूर्ण संवाद आठवून, संवाद फेकही जमली आणि आवाजातले चढउतारही, पण तीच्या मनात समर विषयी मात्र फारच राग धुमसत होता.

नाटकात इतर भूमिका करणाऱ्या सगळ्या कलावंतांनी पर्णच कौतुक केलं. समरनेही तिच्या संवाद फेकीला मनापासून दाद दिली.

“मिस्टर समर तुम्ही स्वतःला समजता काय? पाच मिनिटं एखादा डायलॉग आठवला नाही तर धरणीकंप होऊन जगबुडी होणार नाही! ऐनवेळी एखादा संवाद आठवला नाही तर त्यासाठी माणसाने समोरच्याला इतकं घालून पाडून बोलू नये, की त्याचा आत्मविश्वासच डळमळीत होईल. चुका ह्या माणसांकडूनच होत असतात आणि समोरच्यानेच माणुसकीच्या भावनेतून त्या सांभाळून घ्यायच्या असतात.” पर्ण चिडून रागारागात समरला बोलून घरी निघून गेली.

अजीब रंग में गुजरी है जिंदगी अपनी..
दिलो पर राज किया और अपनेपन को तरसे..

मनातल्या मनात हा शेर आठवत समर घरी पोहोचला पण मनातून पर्ण मात्र जात नव्हती.

क्रमशः

©® राखी भावसार भांडेकर.

सदर कथानक हे संपूर्णतः काल्पनिक असून त्याचा वास्तवात कुणाशी कुठलाही संबंध नाही. तसा तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.


🎭 Series Post

View all