जिया धडक धडक जाये भाग 3

रागानंतर बहरणारं प्रेम
जिया धडक धडक जाये
भाग 3

समरचं नभोनाट्य एअरवर गेलं आणि ते तुफान गाजलं. श्रोत्यांच्या अभिप्रायांच्या पत्रांचा तर त्या रेडिओ चॅनलच्या ऑफिसमध्ये नुसता खच पडला होता. पर्णच्या आवाजाची आणि संवादफेकीची ही सगळीकडे वाहवा होत होती.

समरला हे काही नवीन नव्हतं. समरचं प्रत्येक नभोनाट्य हे श्रोत्यांना नेहमीच आवडत असे. पण तरीही पर्ण त्याला का कुणास ठाऊक आवडत होती, कामाप्रती तीचं समर्पण समरला तिची दखल घ्यायला भाग पाडत होतं.

पर्णलाही आता वेगवेगळ्या ऑफर्स येत होत्या. नाटकांच्या, डबिंगच्या, जाहिरातींच्या, अगदी गाण्यांच्या सुद्धा. तिनेही स्वतःला कामात अगदी झोकून दिलं होतं.

समरचं नभोनाट्य लोकप्रिय झालं म्हणून समरच्या बाबांनी एक छोटसं गेट-टुगेदर करायचं ठरवलं. नाटकातले सर्व कलाकार, टेक्निशियन आणि घरचे काही लोक तीथेच आले होते. अर्थात पर्ण नाटकाची नायिका असल्याने तिला आमंत्रण होतंच. पण प्रियाला पण पर्णबरोबर बोलावलेलं होतं.

समरच्या खडूस वागणुकीमुळे पर्णची गेट-टुगेदरला जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. पण समरच्या बाबांनाही ती नाही म्हणू शकत नव्हती. त्यामुळेच नाईलाजाने प्रिया आणि पर्ण समरच्या बंगल्यावर पोहोचले. तिथे नाटकातले इतर कलाकार आधीच पोहोचलेले होते. प्रिया आणि पर्ण गेल्याबरोबर गेट-टुगेदरला सुरुवात झाली. तिथे प्रियाचा खास मित्र राज ही होता.

खरंतर राज आणि समर दोघे अगदी जीवलग बालमित्र. त्यामुळे समरच्या घरच्या प्रत्येक कार्यक्रमात राज असायचाच. प्रिया आणि राज एकाच कॉलेजमध्ये कॉन्ट्रीब्यूटरी लेक्चरर म्हणून काम करत होते. तिथेच त्यांची भेट आणि ओळख झाली.

समरच्या घरच्या कार्यक्रमात प्रियाला बघून राजचा तर आनंद गगनात मावेनासा झाला. संपूर्ण कार्यक्रम प्रिया आणि राज सोबतच होते. पर्ण मात्र अस्वस्थ होती. एकतर तिला समरचा गर्विष्ठ स्वभाव अजिबात आवडला नव्हता. दुसरं म्हणजे कार्यक्रमात अगदी सुरुवातीला समर तिला एकदाच भेटून, अगदीच जुजबी बोलून गेला. नंतर तो तिला कुठेही दिसला नाही. कार्यक्रमात मात्र ऋतुराज, अबोली, सायली, हेमंत, शिशिर, कुंदा, सरोज सगळेजण गप्पागोष्टी करण्यात अगदी दंग झाले होते. हॉलमध्येच लागून असलेल्या वरच्या खोलीच्या बाल्कनीत कुणाला दिसेल न दिसेल अशा पद्धतीने समर पूर्ण वेळ पर्णला बघत होता. पर्ण मात्र त्या कार्यक्रमात अगदी कंटाळून गेली होती. शेवटी तिने घरी जायचं ठरवलं. प्रियाला राज सोडणार होता म्हणून समरच्या बाबांनी समरला पर्णला पोहोचवून यायला सांगितलं.

गाडीत बसल्यानंतर पर्णला समरशी काय बोलावं ते कळेना. कार चालवता चालवता समरही डोळ्यांच्या कडातून पर्णकडे बघत होता. पर्णचा अकडूपणा बघून एकीकडे त्याला मजाही वाटत होती आणि तिने काहीतरी बोलावं अशी त्याची अपेक्षा होती.

शेवटी न राहावून त्यानेच सुरुवात केली, “मिस भावे नभोनाट्य फार गाजते आहे. तुम्हालाही आता चांगल्या ऑफर्स येत असतील. पण जरा हा अकडूपणा बाजूला ठेवून लोकांसोबत मोकळ्या व्हाल तर पुढे तुम्हालाच त्याचा फायदा होईल. नाहीतर अशा घमेंडी स्वभावामुळे कुणीही तुम्हाला विचारणार नाही.”

समरचं हे असं बोलणं ऐकून पर्णची तळपायाची आग मस्तकात गेली. “मिस्टर समर तुम्ही स्वतःला समजता काय? माझ्यापेक्षा जास्त अहंकार तुमच्या मध्ये आहे. जरा स्वतःचं आत्मनिरीक्षण करा आणि नंतर दुसऱ्यांना सल्ले द्या.”

“मिस भावे सध्या प्रसिद्धीची हवा तुमच्या डोक्यात गेली आहे. त्यामुळे तुम्ही या पद्धतीने माझ्याशी बोलत आहात. तुमच्यासारख्या हजारो मुली दररोज इथे येतात आणि संघर्ष करत काळाच्या पडद्याआड जातात. त्यांची कुणी साधी दखलही घेत नाही.”

“एक्सक्यूज मी, माईंड युवर टंग. तुम्हाला म्हणायचं काय आहे? तुम्ही मला मोठा केलं? या भूमिकेसाठी मी घेतलेल्या मेहनतीला, माझ्या प्रयत्नांना काहीच अर्थ नाही. मी माझ्या मेहनतीने हे नाव कमावलंय. प्लीज गाडी थांबवा मला इथेच उतरायचं आहे.” पर्ण राग अनावर होऊन बोलत होती.

“तुम्हाला घरी सोडायची जवाबदारी बाबांनी मला दिली आहे. तुमची इच्छा असो वा नसो तुम्हाला सुखरूप घरी पोहोचवल्याशिवाय मी गाडी थांबवणार नाही आणि तुम्हाला खाली उतरुही देणार नाही.” समर गाडी चालवतच बोलत होता.

पर्णने मात्र परत एकदा रागारागाने समरकडे बघून तोंड गाडीच्या खिडकीकडे वळवले आणि ती बाहेर बघत राहिली. तिच्या डोळ्यांना पाण्याच्या धारा लागल्या होत्या. आपल्याला जी व्यक्ती आवडते ती आपल्याशी तुसडेपणाने वागते यामुळे पर्णचं मन दुखावलं गेलं होतं. मनातल्या मनात तिला समरचा खूपच राग येत होता. पर्णच्या घरी पोहोचल्यावर समरने जोराचा हॉर्न वाजवला आणि पर्णने रागाने गाडीतून खाली उतरून, दरवाजा धाडकन बंद केला.

समरही तिथे एका क्षणासाठीही थांबला नाही. एखाद तासानंतर प्रियाही घरी आली. तिचा मूड मात्र अगदी छान होता. राजसोबत तिने छान वेळ घालवला होता पण पर्णच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले बघून एकंदरीतच काहीतरी बिनसलंय हे तिच्या लक्षात आलं. पुढे एकही अक्षर न बोलता दोघीही गुपचूप झोपल्या.

इकडे समरच्या बाबांनी राजला घरी बोलावून पर्णबद्दल समरला काय वाटते ते विचारलं.

राजला फार काही माहिती नव्हतं, पण प्रियाच्या सांगण्यावरून त्याने अंदाज बांधला होता की, अगदी पहिल्या भेटीतच पर्णला समर आवडला होता पण समरच्या हेकेखोर वागण्यामुळे पर्ण दुखावली गेली हे त्याने समरच्या बाबांना सांगितलं.

मग प्रिया, राज आणि समरच्या बाबांनी मिळून एका पिकनिकचा प्लान बनवला.

सुरुवातीला पर्ण तर पिकनिकला जायलाच तयार नव्हती. पण प्रियाने तिची मनधरणी केल्याने इच्छा नसूनही पर्णने पिकनिकला जायचं मान्य केलं.

इकडे राजनेही समरला पिकनिकसाठी तयार केलं. सुरुवातीला समर वेळ नाही, पुष्कळ काम पेंडिंग आहे, मी तिथे येऊन काय करणार? असल्या अनेक सबबी सांगत होता, पण राजनेही स्वतःच म्हणणं शेवटपर्यंत सोडलं नाही, शेवटी नाईलाजाने का होईना समर पिकनिकला जाण्यासाठी तयार झाला.

नभोनाट्यातलेच सर्व कलाकार 14 सीटर गाडीमध्ये बसले होते.

“समर सगळ्यां सोबत बसमध्ये गेलास तर पिकनिकची मजा वाढेल एकटाच कार मध्ये जाऊन उगाच तुझा एकटेपणा अजून वाढेल.”समर ने त्याच्या बाबांना काही उत्तर दिलं नाही आणि तो गुपचूप ट्रॅव्हल्सच्या समोरच्या सीटवर जाऊन बसला.

समरचे बाबाही त्यांच्यासोबतच होते, ट्रॅव्हल्स प्रियाच्या घराजवळ थांबल्यानंतर मात्र समर रागारागाने राज कडे बघत होता. राज ने त्याकडे साफ दुर्लक्ष केलं. दोन-तीनदा हॉर्न वाजवल्यावर प्रिया आणि पर्ण घरातून बाहेर आल्या.

प्रियाला बघताच राज ट्रॅव्हल्सच्या बाहेर आला आणि दोघांमध्ये काहीतरी ठरलं. समर मात्र गुलाबी पंजाबी ड्रेस मधल्या पर्णकडे भान हरपून बघत होता. त्याच्या डोळ्याची पापणीही लवत नव्हती. वाऱ्यावर डुलणारे पर्णच्या कानातले मोती आणि भुरभुर उडणाऱ्या केसांच्या बटा समरच्या हृदयाचा ठाव घेत होत्या. समरच्या मागच्या सीटवर समरचे बाबा कुणाशी तरी फोनवर बोलत होते आणि इकडे राज आणि प्रियाचं बोलणं संपतच नव्हतं. सगळेजण गाडीत आधीच बसलेले होते. ऋतुराज, सायली, वसंत, अबोली, जुई ह्यांच्या गाण्यांच्या भेंड्या सुरू होत्या. त्यामुळे बराच वेळ गाडीच्या बाहेर उभे राहून शेवटी नाईलाजाने पर्णला गाडीत समरच्या बाजूला जावून बसावं लागलं.

इकडे प्रिया आणि राजने काहीतरी ठरवलं, आणि मग राज समरला म्हणाला,” तुम्ही ट्रॅव्हल्सने जा मी आणि प्रिया तुम्हाला बुलेटवर फॉलो करतो.” एवढं बोलून राजने समरला डोळा मारला. काय वेडी लोकं आहेत ही! असा मनात विचार करून समरने हलकेच नकारार्थी मान हलवली आणि गाडी सुरू झाली.

जिंदगी मे दो ही वक्त गुजरे है कठीन
एक तेरे आने से पहले एक तेरे जाने के बाद

पर्णचं ते आरसपानी सौंदर्य बघून समरच्या हृदयाच्या तारा छेडल्या गेल्या होत्या.

पुढल्या भागात बघूया आता तरी पर्ण आणि समर एकमेकांशी बोलणार की नाही?

©® राखी भावसार भांडेकर.


हे कथानक संपूर्णता काल्पनिक असून याचा वास्तवात कुणाशीही कुठलाही संबंध नाही.