जिया धडक धडक जाये अंतिम भाग

रागानंतर बहरणारं प्रेम
जिया धडक धडक जाये
अंतिम भाग

संपूर्ण रस्ता समर गाडीत केवळ पर्णलाच बघत होता. पण पर्णने एकदाही समर कडे बघितलं नाही. तिच्या देहबोलीकडे बघून असं वाटत होतं की जणू ती मोठ्या प्रयासाने स्वतःला समरकडे बघायचं नाही याकरिता रोखून धरते आहे.

प्रवासात मध्येच समरचे बाबा पर्णला तिच्या नवीन कामांविषयी काही बाही विचारत होते आणि पर्णही जेवढ्यास तेवढेच उत्तर देत होती. समरचं मात्र पर्णच्या प्रत्येक उत्तराकडे अगदी बारीक लक्ष होतं.

एखाद तासाच्या प्रवासानंतर सगळेजण पिकनिकच्या ठिकाणी पोहचले. राज आणि प्रिया सेल्फी काढण्यात दंग होते तर पर्ण टेकडीच्या एका कोपऱ्यावर उभी राहून आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य न्याहाळत होती. आणि समर तिला न्याहाळत होता. समरचे बाबा त्या दोघांना बघत होते.

बाकी सगळी मंडळी आंधळी कोशिंबीरचा खेळ खेळत होते. प्रियाने, सायलीला डोळा मारला आणि सायली पर्णला ओढत ओढत खेळाण्यासाठी घेऊन आली. अबोलीने पर्णच्या डोळ्यावर रुमाल बांधला आणि आंधळी कोशिंबिरीचा खेळ सुरू झाला. पर्ण कितीतरी वेळ हात समोर करून कुणालातरी पकडण्याचा प्रयत्न करत होती आणि इथे तिथे जातांना खेळता खेळता एकदम तिचा हात समरला लागला. समरने चमकून मागे वळून पाहिलं आणि त्याचवेळी पर्णने डोळ्यावरची पट्टी काढली. त्या एका स्पर्शाने दोघांनाही एक क्षण काय झालं ते कळलच नाही, जणू सगळं जग थांबलं होतं आणि ती दोघंच एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेली होती. समरला तर त्याचा शोध संपल्याची जाणीव झाली, आणि आयुष्याचा जोडीदार मिळाल्याची भावना त्याच्या मनात चमकून गेली तर पर्णच्या अंगावर एक गोड शिर शिरी उठली, क्षण दोन क्षण दोघांची नजरा नजर झाली, तिला वाटलं आयुष्यभर समरच्या त्या काळ्याभोर खोल डोळ्यात असंच बघत राहावं. तेवढ्यात सगळ्यांनी जोरदार गलका केला आणि पर्णने चटकन मान वळवली तर समर तिच्याकडे पाठ फिरवून दुसरीकडे निघून गेला.


समर आणि पर्ण मध्ये काय सुरू आहे हे समजायला समरच्या बाबांना वेळ लागला नाही. पर्णच्या डोळ्यात समर विषयीचे प्रेम अगदी ओसांडून वाहत होतं पण समरने प्रेमाचा कबुली जवाब दिल्याशिवाय पर्ण कधीही पुढाकार घेणार नाही हे समरच्या बाबांना माहिती होतं, म्हणूनच मग प्रिया, राज आणि समरच्या बाबांनी परत एक कट रचला.

दुपारी सगळ्यांची जेवणं झाली. सगळेजण इथे तिथे काही बाही बोलत, गप्पा मारत, एकमेकांची मस्करी करत छान वेळ घालवत होते. तेवढ्यात राजने पर्णला म्हंटल, “चल मी तुला बुलेट शिकवतो.” पर्णने हातातलं पुस्तक बाजूला ठेवून डोळे बारीक करून ती त्याच्याकडे बघू लागली.

“पर्ण चल ना आपण माझ्या बुलेटवर मस्त एक राउंड मारून येवू. अग आजचा दिवस बघ किती आल्हाददायक आहे आणि ही झुळझुळ वाहणारी ताजी हवा.” राज पर्णला बाईकवर बसण्यासाठी गळ घालत होता.

“मिस्टर राज, प्रिया इथेच आहे. तिला घेऊन जा ना राउंड मारायला. मला बाईकवर बसायला अजिबात आवडत नाही.” पर्णने राजचं म्हणणं अगदी उडवून लावलं.

“अगं असं काय करते आहे पर्ण, साधी एक चक्कर तर मारायची आहे, आज जर तू राजच्या बाईकवर बसली नाहीस ना तर हा मला आयुष्यभर चिडवेल, तुझ्या मैत्रिणीला फक्त भांडता येतं, जिच्यामध्ये गाडीवर बसण्याची हिंमत नाही तिच्या वायफळ बडबडीला काय अर्थ?” प्रिया पर्णला गाडीवर बसण्यासाठी उगाचच भरीस घालत होती.

पर्ण प्रियाकडे बघून मिश्किल हसली आणि ती राजच्या बुलेटवर एक राउंड मारायला तयार झाली.

राज बुलेट सुरू करत म्हणाला, “बघ हां मला घट्ट पकडून बैस नाहीतर पडशील खाली.”असं म्हणून त्याने बुलेटचा वेग हळूहळू वाढवला.

बुलेटने वेग घेतल्यावर पर्ण घाबरून जोरात ओरडायला लागली. पर्णच्या त्या ओरडण्याने राज ही दचकला त्याने गाडीचा वेग कमी केला,पण तरीही त्याचा बुलेटवरचा ताबा सुटला. एकीकडे राज आणि त्याच्या विरुद्ध दिशेला पर्ण खाली पडले होते, तर बुलेट समोर झाडाला जाऊन धडकली होती.

बुलेट वरून खाली पडताना पर्ण घाबरून जोरात आई गं म्हणून किंचाळली. पर्णच्या ओरडण्याचा आवाज ऐकून समर धावतच तिथे आला, त्याच्या मागोमाग बाकी मंडळी ही आली. पर्णच्या पायाला दुखापत झाली होती आणि तिचा हातही मुरगळला होता. पडल्या जागेवरून तिला हालचाल करणे कठीण झाले. पर्णला बऱ्यापैकी मुका मार लागला होता.

पर्णचा वेदनेने भरलेला रडवेला चेहरा बघून समर राजवर गरजला,”काय गरज होती तुला नसत्या उचापत्या करायची? ती नाही म्हणत होती, तरीही तिला बुलेटवर का बसवलंस? वरून खाली ही पाडलंस?”

“तुला किती वेळा म्हंटलं आहे स्वतःची काळजी घेत जा. बुलेटवर बसताना तू राजला घट्ट का पकडलं नाही?” आता समर पर्णवर चिडला होता. जखमा जरी पर्णला झाल्या होत्या तरी वेदना मात्र समरच्या हृदयात उठत होत्या.

समर पर्णला उचलायला खाली वाकला तेवढ्यात समरचे बाबा तिथे आले आणि हळूच त्याला म्हणाले, ”स्वतःची काळजी घेत जा हे तू कधी आणि केव्हा म्हटलं रे पर्णला?” आपल्या वडिलांच्या या अनपेक्षित प्रश्नाने समर एक क्षण भांबावला. तेवढ्यात प्रिया तिथे आली.

“खूप लागलं का ग तुला? मिस्टर समर प्लीज तुम्ही पर्णला उचला ना, तिला धड उठताही येत नाही आहे. तो राज तिकडे जाऊन धडपडलाय.” पर्ण वेदनेने कळवळत होती आणि प्रिया राज वर चिडली होती.

शेवटी समरच्या वडिलांनी पर्णला उचलण्यासाठी समरला सांगितलं, समरने आपल्या दोन्ही हातात अगदी अलगद पर्णला उचलून घेतलं. गाडीकडे जाताना पर्णला समरच्या हृदयाचे वाढलेले ठोके अगदी सहज ऐकू येत होते. त्याला आपल्या इतक्या जवळ बघून तिच्याही हृदयाच्या तारा छेडल्या गेल्या. कधी नव्हे ते तिच्या पोटात फुलपाखरं उडायला लागली. समरने आपल्याला नेहमी करताच असं बाहुपाशात उचलून घ्यावं असं तिला वाटून गेलं. समरची ती उबदार मिठी तिला हवीहवीशी वाटायला लागली. कितीतरी वेळ ती समर कडे एकटक बघत होती.

इकडे पर्णचा वेदनेने भरलेला चेहरा बघून समरच्या जीवाची कालवा कालव झाली. तो पर्णला हलकेच सांभाळत होता. आपल्याला आवडणारी व्यक्ती तिच्या वेदनेच्या वेळी आपल्या अगदी जवळ आहे हे त्याला आवडत होतं. आयुष्यभर पर्णची अशीच साथ मिळावी याकरिता त्याने मनोमन देवाकडे याचना केली.

समरने पर्णला गाडीत व्यवस्थित बसवलं आणि सगळे घरी परतले.

प्रियाच्या घरी समर पर्णला उचलून पलंगाजवळ घेऊन गेला, पर्णला पाय ही हलवता येईना. समरने तिचे पाय गादीवर ठेवले. हाताला बऱ्यापैकी सूज आली होती त्यावर मलम लावलं.


समरच्या बाबांनी डॉक्टरला बोलावलं. त्यांनी पर्णला वेदनाशामक इंजेक्शन देऊन, एक झोपेची गोळी दिली. प्रिया तिकडच्या खोलीत राजची काळजी घेत होती आणि इकडे पर्णच्या उशाशी समर बसला होता.

पर्णला काही वेळाने झोप लागली. समरही तिच्या पलंगाच्या बाजूच्या खुर्चीत तिच्या हातावर हात ठेवून झोपी गेला.

आतापर्यंत पर्णशी भांडणारा समर तिच्या तब्येतीसाठी जीवाचं रान करत होता. पर्णलाही त्याच्या उबदार मिठीचा विसावा हवा होता.

सकाळी समरच्या वडिलांनी पर्णच्या घरच्यांशी बोलून त्या दोघांच्या लग्नाच्या पुढल्या गोष्टी ठरवून टाकल्या.

नवविवाहिता पर्णकडे बघून समर मनातल्या मनात म्हणत होता,


एक लफ्जे मोहब्बत का आदनासा फसाना है सिमटे तो दिले आशिक फैले तो जमाना है
ये इश्क नही आसान बस इतना समझ लीजिए एक आग का दरिया है और डुब के जाना है

©® राखी भावसार भांडेकर

सदर कथानक हे संपूर्णतः काल्पनिक असून त्याचा वास्तवात कुणाशी कुठलाही संबंध नाही. तसा तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.


समाप्त


**************


🎭 Series Post

View all