जॉब हजार्डस -एक थरार
साधारण १९७५ च्या आस पास ची घटना असेल. त्या वेळेस मी तारापूर MIDC मधे एका मिनी स्टील प्लांट मधे इंजीनियर म्हणून कार्यरत होतो. स्टील प्लांट मधे एक फरनेस म्हणजे भट्टी असते. त्यात लोखंड आणि पोलंदाचं भंगार वीतळवून फ्रेश स्टील चं उत्पादन केलं जातं. आमच्या प्लांट मधली भट्टी १५ टनांची होती, म्हणजे त्यात १५ टन स्टील तयार होत होतं. आता ही भट्टी म्हणजे एक गोलाकार भांड असतं ज्याचा व्यास १५-१६ फुट असावा. याला आतमधून उष्णता रोधक विटांचं लायनिंग म्हणजे अस्तर असतं.
ही एक प्रकारे रिसायक्लिंग प्रक्रियाच असते. भट्टीला पक्क बसणारं एक गोलाकार छप्पर पण असतं ज्यात त्रिकोणाच्या तीन बिंदुवर ३ दीड फुट व्यासाची भोकं असतात, हे रूफ सुद्धा आतून उष्णता रोधक विटांनी कवर केलं असतं. तीन छिद्रातून तीन १ फुट व्यासाचे तीन इलेक्ट्रोड खाली वर होतात. हे इलेक्ट्रोड हाय पॉवर ट्रान्सफॉर्मर ला जोडलेले असतात.
आता भट्टीत स्क्रॅप टाकल्यावर भट्टी चालू करतात. तिन्ही इलेक्ट्रोडस खाली येतात आणि त्यांचा स्क्रॅप शी संपर्क होऊन आर्क तयार होतो. हा आर्क आपण नेहमी जे वेल्डिंग पाहतो, त्याच्या १०० पट असतो. उघड्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहता येत नाही. या आर्क मुळे जी उष्णता तयार होते, त्यामुळे स्क्रॅप वितळायला लागतं आणि भट्टीच्या तळाशी हा स्टीलचा रस जमा व्हायला लागतो. अंदाजे टेंपरेचर ११०० ते १२०० च्या आसपास असतं. संपूर्ण स्क्रॅप वीतळून पूर्ण १५ टन जमा झालं की त्यावर प्रक्रिया केली जाते.
त्या दिवशी माझी नाइट शिफ्ट होती. रात्रीचे दोन सव्वादोन वाजले असतील. भट्टी नुकतीच सुरू झाली होती. लोखंड पूर्ण वितळायला एखादा तास लागतो. भट्टीवरची ८-१० माणसं आणि आम्ही चार शिफ्ट इंजीनियर तिथेच समोर उभं राहू कामाचं बोलत होतो. स्क्रॅप वितळतांना कधी कधी आपसात वेल्डिंग होऊन चिकट्तं आणि त्याचा एक पुंजका तयार होतो. अश्या वेळेस भट्टीवरची माणसं मोठी लांब पहार घेऊन भट्टीच्या दरवाजातून त्याला ठोकतात आणि त्याला तोंडतात. स्क्रॅप खाली पडतं आणि वितळण्याची क्रिया पुन्हा सुरू होते. आता त्या दिवशी अर्ध अधिक स्क्रॅप वितळून तळाशी मोल्टन मेटल म्हणजे लिक्विड स्टील जमा झालं होतं. आणि त्याच वेळेस वरती वेल्डिंग होऊन स्क्रॅप चा पुंजका तयार झाला होता. त्या पुंजक्याला तोंडणं आवश्यक होतं. हे नेहमीचंच होतं यात विशेष काहीच नव्हतं. मेल्टरने आणि शिफ्ट इंजीनियरने गडद काळ्या रंगाचे चष्मे लाऊन भट्टीच्या दरवाज्यातून निरीक्षण केलं, आणि त्या पुंजक्याला तोडण्याचा निर्णय घेतला. पहारीने पुंजक्याला ठोकणारे ४-५ लोक सोडून बाकीच्यांना भट्टी पासून दूर व्हायला सांगितल, आणि तोडा असा आदेश दिला. जेंव्हा तळाशी मोल्टन मेटल असतं आणि वरचा स्क्रॅपचा पुंजका खाली पडतो तेंव्हा ४-५ सेकंद भट्टीच्या दरवाजाच्या बाहेर एक दोन फुट आगीचा लोळ येऊ शकतो, म्हणून बाकी सर्व लोकांना बाजूला व्हायला सांगितलं होतं. आणि हे इतकं सवईचं झालेलं असतं की पहार मारणाऱ्या लोकांना लगेच कळतं की स्क्रॅप आता खाली पडणार आहे म्हणून. आणि ते लोकं पहार सोडून आजू बाजूला पळून जातात.
पण त्या दिवशी विपरितच घडलं. वरचा पुंजका मोठा होता आणि त्या वजनांनी तो धसकन खाली भट्टीच्या एका कोपऱ्यात पडला. भट्टीच्या एका बाजूला साधारण १० फुटांवर भिंत होती आणि दुसरी बाजू मोकळी होती. भिंतीच्या बाजूचे लोकं धावत जाऊन भिंतीच्या आधाराने उभे राहिले. तशी ती सेफ जागा होती कारण ज्वाला दरवाजातून सरळ बाहेर येते आणि ४-५ सेकंदा मधे वापस भट्टीत जाते. पण आजचा दिवस फार वाईट होता. स्क्रॅप भट्टीच्या एका कोपऱ्यात पडलं आणि आगीचा २ फुट व्यासांचा प्रचंड लोळ तिरपा बाहेर पडला आणि भिंतीला स्पर्श करून वापस गेला. त्या एका क्षणात जे तीन वर्कर भिंतीच्या बाजूला उभे होते, ते त्या आगीत सापडले.
ज्वाला वापस भट्टीत गेल्यावर सगळे परत भट्टी जवळ आले आणि जे आम्ही पाहिलं ते फार भयंकर होतं. तिन्ही मजूर, खाली पडले होते. कोणाच्याही अंगावर एकही कपडा नव्हता, आणि सर्व जण पूर्ण भाजले होते आणि बेशुद्ध झाले होते. कोणी तरी धावत जाऊन भट्टी बंद केली आणि त्या तिघांकडे धावले. दृश्य फार भयंकर होतं. स्टील पलांट मधे थोड्या फार प्रमाणात केंव्हातरी भाजतच, पण इतका भयंकर प्रकार आमच्या सर्वांसाठी सुद्धा हादरवून टाकणारा होता. कोणीतरी जाऊन त्यांच्या पैकी एकाला हाताला धरून उठवण्याचा प्रयत्न केला, पण भाजलेल्या माणसाच्या हाताची कातडी उकडलेला बटाटा सोलावा, तशी निघून उठवणाऱ्याच्या हाताला चिकटली. हे पाहिल्यावर तो आणि आणखी दोघे जण भडा भडा ओकले आणि त्यांनाही चक्कर आली. मामला अतिशय गंभीर होता. रात्रीची वेळ, फॅक्टरी मधे आम्हीच लोक. त्या वेळेस फॅक्टरीत फोन होता, पण पावसाळ्याचे दिवस असल्याने डेड होता, फॅक्टरीत एक व्हॅन होती, ती शिफ्ट च्या लोकांना ने आण करायची. ती सेकंड शिफ्ट च्या लोकांना घेऊन पालघरला गेली होती आणि सकाळी मॉर्निंग शिफ्ट च्या लोकांना घेऊन सकाळी सहा वाजे पर्यन्त आली असती.
जखमी लोकांना हॉस्पिटल मधे तातडीने पोचवणं आवश्यक होतं. त्यावेळेस बोईसरला हॉस्पिटल नव्हतं. फॅक्टरीत गाडी नव्हती. फोन डेड. मदत कुठूनही येण्याची शक्यता नव्हती. काय करायचं? मोठा यक्ष प्रश्न होता. फॅक्टरीतल्या किंचाळ्या ऐकून बाहेर जे दोन- तीन ट्रक उभे होते त्यांचे ड्रायव्हर आत आले. आमच्या पैकी एकाच्या डोक्यात आयडिया आली आणि त्याने ड्रायव्हर लोकांना विनंती केली की विरार च्या हॉस्पिटल पर्यन्त तिघांना घेऊन चला.
“साहेब, उद्या सकाळी माल लोड करून मुंबईला न्यायचा आहे. माल लोड झाल्यावर आम्ही घेऊन जाऊ. माल न घेता जाता येणार नाही. आणि आमच्या जवळ पैसे पण नाहीत डबल डिझेल भरायला.”- ड्रायव्हर
खूप विनंत्या करूनही काही उपयोग झाला नाही. माल लोड करून पाठवणं पण शक्य नव्हत. कारण एक्साइज डॉक्युमेंट नव्हते. बोईसरला आमच्या फॅक्टरीतले दोघं राहत होते, त्यांच्या कडे ट्रक मधूनच दोघं जण गेले, त्यांच्या कडे जेमतेम ५०० रुपये निघाले, तेच ड्रायव्हरला दिले आणि फॅक्टरीत येऊन खाली ताडपत्री टाकली आणि तिघांना त्यावर झोपवलं. पालघर आणि विरारला जाऊन वेळ घालवण्यात काही अर्थ नव्हता कारण जळलेल्या, भाजलेल्या माणसावर उपचार होईल अशी खात्री वाटत नव्हती म्हणून जे दोघे ट्रक बरोबर गेले होते त्यांनी थेट बोरिवली गाठायच ठरवलं. पण बोरीवलीच्या हॉस्पिटल मधे पण ती सोय नव्हती, आता काय करायच? मग एका जवळ अॅडमीन ऑफिसर चा फोन नंबर होता. त्याला फोन केला, आणि सर्व परिस्थिती सांगितली. तो म्हणाला,
“मी अर्ध्या तासा तिथे पोचतो, तुम्ही तिथेच थांबा, हॉस्पिटल मधे प्राथमिक उपचार होत असतील तर तेवढं बघा.”
अर्ध्या तासात तो अॅम्ब्युलेन्स घेऊन आला आणि तिघांनाही KEM हॉस्पिटल मधे घेऊन गेला.
सहा महीने उपचार घेतल्यावर तिघेही पूर्ण पणे बरे झाले होते असं कळलं. एक भयानक अरिष्ट टळलं होतं.
धन्यवाद.
दिलीप भिडे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा