ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं भाग एक
“माझ्याकडून तर मोठेच पाप घडलं आहे. मी माझं कुटुंब, माझी मुलं, नवरा, घर संसार, कशाचाही, कुणाचाही विचार केला नाही. आणि त्याचं आज मला हे असं फळ मिळतं आहे. ती म्हण आहे ना ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं ती अगदी योग्य आहे.” चित्रा आसवं गाळत, स्फुंदत, स्फुंदत जीवाचा त्रागा करून अतिशय वैतागाने बोलत होती.
हॉलच्या मधोमध असलेल्या, चित्राच्या समोरच्या बाजूच्या सोफ्यावर तिचे वडील डोक्याला हात लावून खाली मान घालून बसले होते तर तिच्या वडिलांच्या बाजूच्या सोफ्यावर, भाऊ-रमेश मात्र वेगळ्याच ताठ्यामध्ये चेहऱ्यावर ‘काय हा वैताग’ असले भाव आणून बहिणीकडे ‘खाऊ का गिळु’ या नजरेने बघत होता.
“ताई पुरे कर तुझा हा कांगावा! तुला काय वाटलं प्रत्येक वेळी तू रडून तुझं म्हणणं खरं करशील? अग निदान दुनियेला नाही तर देवाला तरी घाबर. माणसाने जनाची नाही तर निदान मनाची तरी लाज ठेवावी! तुला काय वाटलं तू कसंही बोलशील, काहीही बोलशील, आणि मी प्रत्येक वेळी मूग गिळून सगळं ऐकत बसू? तू घरात भावा बहिणींमध्ये मोठी आहेस, माझी बहीण आहेस आणि पप्पांची लाडाची लेक म्हणून आज पर्यंत सगळं सहन केलं पण यानंतर नाही. आपण काय बोलतो आहोत? काय वागतो आहोत याचा निदान सारासार विचार तरी कर!”
“बघितलं पप्पा हा लहान असून तुमच्यासमोर सुद्धा मला कसं घालून पाडून बोलतो आहे? पप्पा खरं सांगा मी आज पर्यंत जे काही तुमच्यासाठी केलं त्यामागे माझा काही स्वार्थ असेल असं तुम्हालाही वाटतं का?”
चित्राच्या या प्रश्नावर आप्पासाहेब काहीच बोलले नाही. खरं तर काय बोलावं हेच त्यांना सुचत नव्हतं. त्यांचं त्यांच्या सर्वच मुलांवर जीवापाड प्रेम होतं पण सध्या त्यांच्यासमोर जे आलं होतं त्यामुळे कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणावर नाही हेच त्यांना कळत नव्हतं.
आपल्या वडिलांच्या अशा गप्प बसल्यामुळे चित्राला आज तिने केलेल्या त्यागाचा मनोमन पश्चाताप होत होता. तिच्यासाठी तिचे वडील अगदी देवासमान होते आणि म्हणूनच आपल्या प्राणांपेक्षा प्रिय वडिलांकरिता तिने मागचा पुढचा कुठलाही विचार न करता स्वतःची एक किडनी त्यांचा जीव वाचवण्याकरिता दिली होती, आणि तिचा भाऊ तिच्यावरच स्वार्थी, मतलबी, आणि संधी साधू अशा प्रकारचे अपशब्द वापरून, तिला अपमानित करीत होता. आपल्या वडिलांकरिता तिने केलेला त्याग तिला फार मोठा किंवा महत्त्वाचा वाटत नव्हता पण तिच्या भावाने तिच्यावर केलेल्या या अपमान जनक आणि धादांत खोट्या आरोपांमुळे चित्रा मनोमन दुखावली तर होतीच पण उन्मळून सुद्धा पडली होती आणि त्यावर कळस म्हणजे तिचे वडील त्यावर काहीही एक बोलत नव्हते.
©® राखी भावसार भांडेकर. नागपूर
सदर कथा हि संपूर्णतः काल्पनिक असून या कथेतील घटनांचा आणि पात्रांचा वास्तवात कुणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा, तसेच ही कथा राखी भावसार भांडेकर यांची असून प्रकाशनाचे सर्व हक्क लेखीकेकडे राखीव आहे. या कथेचे व्हिडिओ बनवण्यास परवानगी नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा