Login

ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं भाग दोन

ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं
ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं भाग दोन

“अरे मोहन तुझ्या बायकोला चित्राला थोडं जरी व्यवहारी ज्ञान असतं ना तर तिने हा निर्णय घेतला नसता, पण जाऊ दे मी ही एका लेकीचं मन समजू शकते पण निदान तू तरी तिला काही समजावून सांग! तिचं वय तरी असं कितीसं आहे? वयाच्या चाळीशीत ती तिची किडनी तिच्या वडिलांना देईल आणि पुढे चालून काही शारीरिक गुंतागुंत निर्माण झाली, तीला काही आजार झाले किंवा इतरही काही वाईट परिस्थिती निर्माण झाली तर आपण काय करायचं? आयुष्यात कधीही काहीही होऊ शकतं. काळाच्या उदरात काय दडुन बसलेलं आहे आपल्याला माहिती नसतं. तू तुझ्या बायकोला समजून सांगण्याचा प्रयत्न कर.” चित्राची सासू चित्राच्या नवऱ्याला, चित्राने तिच्या वडिलांना किडनी देऊ नये याकरिता समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा असं सुचवत होती.

“अग आई, आपली चित्रा तिच्या वडिलांविषयी किती हळवी आहे तुला माहिती आहे ना! आणि तू एक विसरते आहेस ती स्वतः पेशाने डॉक्टर आहे त्यामुळेच तिने हा निर्णय घेतला आहे.” चित्राच्या नवऱ्याचा चित्राच्या निर्णयाला पूर्णपणे पाठिंबा होता.

“तुझं सगळं म्हणणं बरोबर आहे बाबा! पण तरीही शेवटी चित्राबाईची जात आहे. तुला काय माहिती बायकांच्या शारीरिक व्याधी आणि रजोनिवृत्तीनंतरच्या समस्यांविषयी, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट चित्रा तिच्या वडिलांना किडनी देते आहे हे चांगलंच आहे पण चित्राच्या भावानेही थोडसं वडिलांकडे लक्ष द्यावं. दोन दोन कारखाने, दोन फॅक्टरी, पन्नास एकर जमीन, संत्र्याच्या आणि द्राक्षांच्या बागा स्वतःकडे ठेवून हा काय फक्त त्याच्या वडिलांची दवाखान्याची बिल भरणार आहे का?” नाही म्हटलं तरी चित्राच्या माहेरची संपत्ती तिच्या भावानेच बळकावली हे चित्राच्या सासूच्या नजरेतून सुटलं नव्हतं, आणि ते त्यांना पटलं ही नव्हतं. पण मुळातच चित्रा समजूतदार असल्याने आणि स्वतःच्या वैद्यकीय व्यवसायात यशस्वी असल्याने तिने माहेरच्या संपत्तीचा कधीही लोभ धरला नव्हता, आणि पुढे मागे आपल्या वडिलांच्या संपत्तीतला थोडाफार वाटा आपल्याला मिळावा अशी तीला जराही अपेक्षा नव्हती.

“अग आई आयुष्यात प्रत्येकच गोष्ट केवळ संपत्ती आणि पैशात मोजून चालत नाही! नातेसंबंध, रक्ताची नाती आणि सर्वात आधी माणुसकी म्हणूनही काही गोष्टी माणसाने करायच्या असतात!”

“घे! तू ही बायकोचीच बाजू घे! जाऊदे मला मेलीला काय करायचं आहे? तुम्ही जाणो आणि तुमचा व्यवहार, डोळे असूनही तुम्ही दोघांनी डोळ्यावर आंधळ्या प्रेमाची पट्टी बांधली आहे त्याला मीही काही करू शकत नाही.” चित्राची सासू वैतागून बोलत होती.

“अग आई, यात आंधळं प्रेम कसलं? चित्राच्या भावाला शुगर आहे, तिच्या दोन्हीही बहिणींचा रक्तगट तिच्या वडिलांच्या रक्तगटाशी जुळला नाही, म्हणूनच शेवटी वडिलांचे प्राण वाचवण्याकरिता चित्राने किडनी देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या वडिलांनी जन्म दिला त्यांचाच जीव वाचवण्यासाठी किडनी दिली तर काय चूक आहे त्यात?” मोहनच्या या प्रति प्रश्नाने चित्राची सासू त्यावेळी गप्प बसली पण तरीही तिला चित्राचा निर्णय अजिबात आवडला नव्हता.

©® राखी भावसार भांडेकर. नागपूर

सदर कथा हि संपूर्णतः काल्पनिक असून या कथेतील घटनांचा आणि पात्रांचा वास्तवात कुणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा, तसेच ही कथा राखी भावसार भांडेकर यांची असून प्रकाशनाचे सर्व हक्क लेखीकेकडे राखीव आहे. या कथेचे व्हिडिओ बनवण्यास परवानगी नाही.


0

🎭 Series Post

View all