ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं अंतिम भाग
आपल्या वडिलांवरच्या प्रेमामुळे चित्राने तिच्या वडिलांना किडनी दिली. त्यामुळे चित्राच्या वडिलांचे प्राण वाचले. लेकीच्या या त्यागामुळे चित्राचे वडीलही भारावून गेले होते. त्यामुळे त्यांनी स्वतःची एक फॅक्टरी चित्राच्या नावे करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय चित्राच्या भावाला रमेशला मात्र अजिबात रुचला नव्हता. रमेशने दिवसरात्र मेहनत करून स्वतःच्या वडिलांचा कृत्रिम धाग्यांचा व्यवसाय नावारूपाला आणला होता. चित्रा मात्र आधीपासूनच अभ्यासू असल्याने तिने वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन त्यातच स्वतःचं करिअर केलं. वडिलांच्याच मित्राच्या मुलाशी मोहनशी अप्पासाहेबांनी चित्राचं लग्न लावून दिलं होतं.
मोहनही त्याच्या वकिलीच्या व्यवसायात नावारुपाला आला होता. दोन्हीही घर सधन असल्यामुळे चित्राने कधीही माहेरच्या संपत्तीचा लोभ धरला नव्हता आणि मोहनलाही सासरच्या संपत्तीची ओढ नव्हती. पण आप्पासाहेबांच्या चित्राला फॅक्टरी देण्याच्या निर्णयाने रमेश मात्र बिथरला होता. त्यातच आता वय झाल्याने आप्पासाहेबांची तब्येत अधे मधे बिघडत होती आणि दिवसेंदिवस ढासळत चालली होती. याच गोष्टीचा फायदा उचलून रमेशने चित्रावर खोटेनाटे आरोप करणं सुरू केलं होते.
“ताई दुनियेला मारे तू बनाव केला असशील की वडिलांसाठी तू किडनी दान केली आहेस पण हे तुला आणि मलाच माहिती आहे, की तू तुझी खराब किडनी पप्पांना दिली आहेस. कदाचित त्या बदल्यात तू त्यांना फॅक्टरी मागितली असशील.” रमेश मनाला वाटेल ते बरळत होता, आणि तब्येतींच्या सततच्या कुरबुळींमुळे अप्पासाहेबही वैतागून गेले होते. किडनी ट्रान्सप्लांट केल्यानंतर दोन-तीन वर्ष त्यांची तब्येत ठीक होती परंतु आता त्यांनाही अनेक व्याधी जडल्या होत्या आणि त्याचं कारण त्यांना त्यांची केलेली किडनी ट्रान्सप्लांट वाटत होती.
आपला सख्खा लहान भाऊ आपल्यावर असे लांच्छनास्पद आरोप लावतो आहे आणि आपले वडील काहीही बोलत नाही हे बघून चित्राला रडू आवरत नव्हतं. आपल्या वडिलांनी काहीतरी बोलावं असं तिला मनापासून वाटत होतं.
“हे बघ चित्रा तू माझ्यासाठी जे काही केलं त्याबद्दल मी खरच तुझा ऋणी आहे पण रमेश काही खोटं बोलत नाही. तू किडनी दिल्यानंतर दोन-तीन वर्ष माझी तब्येत ठीक होती पण आजकाल मात्र माझ्या तब्येतीच्या तक्रारींची वारंवारता वाढली आहे. आणि आता मलाही कुठेतरी असंच वाटतं आहे की………..”आप्पासाहेब त्यांचं म्हणणं पूर्ण करू शकले नाही.
“काय वाटतं पप्पा तुम्हाला? की मी खरंच, हेतू पुरस्सर, तुम्हाला खराब किडनी दिली? पप्पा माझ्या तर स्वप्नातही असा विचार कधी आला नाही आणि आज तुम्हीच……….” चित्राला पुढचं काही बोलवत नव्हतं. आपल्या वडिलांसाठी आपण स्वतःचा, मुलांचा, कुटुंबाचा विचार न करता त्यांना किडनी दिली आणि त्यांनीच आपल्यावर अविश्वास दाखवला, त्यावेळी चित्राच्या मनात एकच बाब सतत घुमत होती की ‘ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं.’
पण त्याचवेळी चित्राची आई तिथे आली आणि तिने चित्राच्या वडिलांची आणि तिच्या भावाची चांगल्या कडक शब्दात कान उघडणी केली. आणि त्यांना खरमरीत शब्दात समज दिली. चित्राच्या दोघी बहिणीही तिच्या बाजूने उभ्या राहिल्या होत्या पण आता पुलाखालून खूप पाणी निघून गेलं होतं.
रक्ताच्या नात्यांमध्ये संपत्ती आणि पैशामुळे गैरसमज निर्माण झाले होते आणि या गैरसमजाच्या जाळ्यात आप्पासाहेब अलगद अडकले होते, आणि चित्राचा मात्र आता रक्ताच्या नात्यांवरचा विश्वास उडाला होता.
रक्ताच्या नात्यांमध्ये संपत्ती आणि पैशामुळे गैरसमज निर्माण झाले होते आणि या गैरसमजाच्या जाळ्यात आप्पासाहेब अलगद अडकले होते, आणि चित्राचा मात्र आता रक्ताच्या नात्यांवरचा विश्वास उडाला होता.
©® राखी भावसार भांडेकर. नागपूर
सदर कथा हि संपूर्णतः काल्पनिक असून या कथेतील घटनांचा आणि पात्रांचा वास्तवात कुणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा, तसेच ही कथा राखी भावसार भांडेकर यांची असून प्रकाशनाचे सर्व हक्क लेखीकेकडे राखीव आहे. या कथेचे व्हिडिओ बनवण्यास परवानगी नाही.
