"
.
.
एक दिवस असच सगळ्यांचं जेवण झाल्यावर ती एकटीच किचन मध्ये जेवायला बसली होती. तेवढ्यात तिच्या सासूबाई तिथे आल्या, तिला जेवताना पाहून तर त्यांना अजूनच संताप आला.
"आता हिला कसल्या भुका लागतात? आमच्या घरातलं सुख गिळलं ना? तेवढं पुरेसे नाही झालं वाटत. डोळ्यासमोर पण नको वाटते ही अवदसा"
असं म्हणून त्या तणतण करत तिथून शतपावली करायला निघून गेल्या.
त्यांना जाताना पाहून नीलिमा तिथे आली. इकडे तिने ते ऐकून भूक असून सुद्धा नमस्कार करून ते ताट बाजूला करून ठेवलं. नीलिमा ती एकच तर होती त्या घरात, तिला समजून घेणारी. तिला तिचे हाल बघवायचे नाही.
नीलिमाने तिच्याजवळ जाऊन आधी तिचे अश्रू पुसले आणि तिने लिना नाही म्हणत असताना देखील जबरदस्तीने जेवण भरवायला सुरुवात केली.
" ताई, का हे सगळं सहन करता? आता तरी ह्यातून बाहेर पडा. "
ती एक एक घास भरवत तिला समजावत होती.
"काय करू ग नीलिमा मी तरी?"
बाहेर पाडा, जॉब शोधा. स्वतःच्या पायावर उभ्या राहा. पण इथे असं खितपत पडू नका.
"पण मला कोण देईल आता जॉब? एवढ्या वर्षाचा अंतर पडलाय. आत्मविश्वास सुद्धा गेलाय. "
" ताई, मी आधीच दादाच्या मित्राच्या ऑफिस मध्ये विचारलंय, हा पत्ता आहे तिथला. उद्याच तिथे जाऊन interview देऊन या. बाकीचं बघू "
तसं लीनाने नीलिमाला मिठी मारली. थोडा वेळ गप्पा मारून तिला चार समजुतीच्या गोष्टी शिकवून सासूचा कानोसा लागल्यामुळे नीलिमा पटकन आपल्या रूम मध्ये गेली.
त्याच रात्री खूप रडून घेतल्यानंतर तिने स्वतःलाच प्रश्न विचारला, "मी आयुष्यभर फक्त रडतच राहणार का? न केलेल्या गोष्टींची शिक्षा भोगत राहणार आहे का?" बस झालं आता हे शेवटचं रडणे, आता यापुढे मी नाही रडणार. माझ्या आकाशला सुद्धा मी रडलेले नाही आवडायचं. मी आता स्वतःच्या पायावर उभी राहणार आणि ह्यातून बाहेर पडणार.
दुसऱ्याच दिवशी सकाळी फक्त नीलिमाला सांगून ती एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तिने दिलेल्या पत्यावर तिथे असलेल्या ऑफिसमध्ये अगदी वेळेवर पोहोचली. आत जाताना तिच्या मनात भीती होती, पण तिथलं ओळखीचं वातावरण पाहून तिला थोडा आधार वाटला.
तिच्या बॉसने, जो नेमकी आकाशचा चांगला मित्र निघाला तिला पाहिलं आणि आश्चर्याने विचारलं,
"लीना वाहिनी! इतक्या दिवसांनी! कशी आहेस?"
" मी ठीक आहे.. "
एवढंच ती बोलू शकली.
त्यावर त्याने डायरेक्ट तिला म्हंटल,
"लीना अजितेश मला म्हणाला, माझ्याकडे तशीही vacancy आहेच, तुलाही नोकरी हवी आहे? तुला काही हरकत नसेल तर तू उद्यापासून जॉईन करू शकतेस का?"
ती काही बोलणार तेवढ्यात तोच पुढे म्हणाला,
"अहं... उपकार नको समजूस हा. मी तुझं काम पाहिलं आहे म्हणून म्हणतोय."
ते ऐकून तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. कित्येक दिवसांनी कोणीतरी तिला तिच्या अस्तित्वासह स्वीकारत होतं.
तिने लगेचच त्याला होकार भरला आणि ती तिथून काही फॉर्मॅलिटी पूर्ण करून निघून आली. ती खूपच आनंदात होती पण अजून एक मोठा अडथळा तिला पर करायचा होता ते म्हणजे सासूबाई!
जेव्हा तिने घरी सांगितलं, तेव्हा नेहमीप्रमाणे वादळ उठलं.
"ह्या घराशी नोकरी करणाऱ्या बाईचा काही संबंध नाही. लोक काय म्हणतील? तुला बाहेर पायही टाकायचा नाही. घरची कामे काय तुझा बाप करेल का? आणि तिकडे जाऊन कुणाचा हात धरून गेलीस तर?? काय माहित बाहेर काय रंग उधळशील."
सासूबाई तोंडाला येईल ते बोलत होत्या. आता मात्र तिला अजिबातच सहन झालं नाही. तिच्या चरित्र्यावर उडणारे शिंतोडे तिला बिलकुल मान्य नव्हते.
लीनाने पहिल्यांदा त्यांच्या डोळ्यांत डोळे घालून पाहिलं. आयुष्यात पहिल्यांदा तिला त्यांच्या विषयी वाटणारी भीती नाहीशी झाली होती. तिने त्यांना सडेतोड उत्तर दिल.
"आई, तसही ह्या घरात मी तुम्हाला नको होती. आकाश नंतर किंवा आधीही माझ्या आयुष्यात कोण नव्हतं. माझ्यासाठी ही नवी सुरुवात आहे. तुम्ही मला अडवू शकत नाही.'
तिचं ते उत्तर ऐकून आता तिच्या सासूलाच आश्चर्य वाटलं.
" मग चलती हो ह्या घरातून. "
लीनाने ही जास्त काही न बोलता तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. अजून तिला तिची घुसमट होऊन द्यायची नव्हती.
तिने घरभर एक कटाक्ष टाकला. तिला खूप भरून आलं होत. नीलिमा आणि गुड्डूचा निरोप घेऊन तिने आपल्या सामानाची बॅग उचलली आणि बिनधास्त दाराच्या बाहेर पडली...
...नव्या भविष्याच्या दिशेने!
ती आपल्या ऑफिसमध्ये मनापासून काम करू लागली. मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर तिने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. काही वर्षांतच तिने स्वतःचा एक व्यवसाय सुरू केला आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली.
पण तिच्या मनात सतत एक विचार येत होता. मला आता ह्या जन्मात बाळ होणे शक्य नाही पण ज्या मुलांना कोणीच नाही, त्यांच्यासाठी काही करायचं आहे. आकाशलाही लहान मुलं खूप आवडायची. त्याचं हे अपूर्ण स्वप्न तिने पूर्ण करायचं ठरवलं.
तिने शहराच्या बाहेर एक आकाश च्या नावाने अनाथाश्रम सुरू केला. सुरुवातीला काहीच मुलं होती, पण हळूहळू तिथे एक आनंदी कुटुंब तयार झालं. लीना केवळ त्यांच्या शिक्षणाची आणि राहण्याची सोय करत नव्हती, तर त्यांना एक आईसारखं प्रेमही देत होती.
काही वर्षातच तिचं नाव सगळीकडे झालं. पेपर मध्ये सुद्धा तिचा फोटो छापून आला होता. तिला त्या वर्षीचा समाजसेविका चा पुरस्कार जाहीर झाला तसं तिच्या सासूचे डोळे उघडले. पण आता खूप उशीर झालेला त्या तिच्या जवळ परत जाऊ शकत नव्हत्या की लिना आता मागे फिरणारी नव्हती. वांझोटी म्हणून हिनवणाऱ्या लीनाला आज 100 मुलांची आई म्हणून ओळखले जात होते. तिने मागे न फिरता उंच भरारी घेतली होती.
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा