Login

माझिया मना जरा थांब ना भाग २ विषय - तिचे भावविश्व

एका मुलीची कथा
डायरी - माझिया मना जरा थांब ना…भाग २

विषय - तिचे भावविश्व

मागील भागावरून पुढे…

२०/५/२००६

काल संध्याकाळी साहेब केबीनबाहेर आले तेव्हा सगळेच घरी जाण्याची तयारी करत होते.साहेब अनिताच्या डेस्क पाशी जात अनीताला म्हणाले

" मिस अनीता ऊद्या आपल्या ऑडीटच्या लोकांना ब्रेक फास्टला घेऊन जायचय. तुम्ही यावं अशी जोगळेकर मॅडमची इच्छा आहे. तसा त्यांचा मला आत्ताच फोन आला. तुम्ही जा शुभंकर हाॅटेलला. मला एवढ्या सकाळी येणं जमणार नाही. ठीक आहे?"

साहेबांनी विचारलं

"ठीक आहे साहेब जाईन मी. घरी गेल्यावर जोगळेकर मॅडमशी बोलते."

"ठीक आहे "

म्हणत साहेब ऑफीस बाहेर पडले.


आपल्याकडे रोखलेल्या नजरांना विशेषतः पेडणेकर आणि कुळकर्णी यांना फारसं महत्व न देता अनीता आपलं डेस्क आवरून ऑफीस बाहेर पडली.

बाहेर पडल्यानंतर अनिताच्या शरीराचा कण न् कण रागाने चिडून उठला. किती घाणेरडे विचार असतात लोकांचे. बाई म्हणजे फक्त भोग वस्तू यापलिकडे तिच्या ना बुद्धीला किंमत ना तिच्या काम करण्याच्या क्षमतेची किंमत.

अनिताने एकटीने बंड करून काय साधलं असतं? त्यापेक्षा आपल्या पुरतं या विकृत माणसांचं जंगल छाटून टाकायचं तिने ठरवलं.


****

पार्कींग मधून आपली स्कूटी काढून अनीता रस्त्यावर आली आणि आपल्या घराच्या दिशेने निघाली.

घरी जाता जाता तिने मध्येच थांबून भाजी घेतली. हल्ली अनीताच्या आईचं गुडघ्यांचं दुखणं वाढलं होतं. बाबांचही वय झालं.

दोन्ही भावांनी वैभव आणि श्रेयसनी त्यांच्या बायकांबरोबर स्वतंत्र चूल बोळकी मांडली. बहीण कल्पना तर आपल्या घरट्यात आनंदात होती. माहेरी आपण आता काही देणं लागत नाही असं तिने ठामपणे सांगीतल्यामुळे तोही प्रश्न मिटला.

अनीताची जबाबदारी त्यामुळे वाढली. अनीताला मात्र या जबाबदारीचा त्रास नव्हता वाटला कधीच.

अनीता मुळातच समजूतदार असल्याने आईबाबांनी जबाबदारी म्हणजे दोघं भाऊ आणि बहिण यांचं शिक्षण आणि लग्न करून दिलं याचं तिला खूप समाधान मिळालं. आता ती तिचं आयुष्य आईबाबांबरोबर आनंदाने व्यतीत करत होती.

रोज उगवणारा दिवस वेगळा आहे आणि तो मला खूप मजेत घालवायचा आहे हे तिचं तत्व ती छान सांभाळायची.

३०/६/२००६

काल आईचा वाढदिवस खूप छान साजरा झाला. अपेक्षा नसताना दोघेही भाऊ भावजया आणि बहीण आईला शुभेच्छा द्यायला आले याचं अनिताला खूपच आश्चर्य वाटलं पण तिने उलट आनंदाने सगळ्यांचं स्वागत केलं.

आईला मात्र खूपच आश्चर्य वाटलं ती हळूच तिच्या बाबांच्या कानात म्हणाली,

“ माझ्याजवळ आता तर काही देण्यासारखं नाहीये मग कसे काय आले हे सगळे लोक?”

यावर अनिता तिला म्हणाली,

“ आई तू बाबांच्या कानात सांगत असलीस तरी जोरातच बोलते. बाबांना ऐकू येत नाही म्हणून. तू जरा शांत बस.”

अनिताने असं सांगितल्यामुळे आई पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत शांत बसली.

अनिताने खूप मस्त केक तिच्यासाठी आणला होता. तिच्या भावांनी आणि भावजयींनी खूप भारी पैकी साडी आईसाठी आणली होती. बहिणीने खूप छान पद्धतीचा नेकलेस आईला आणला होता.

आईला समजेना आपल्याला एवढं का हे सगळं करतात आहे .ती चुळबुळ करत होती ते बघून अनिता म्हणाली,

“ आई अग तुझ्या प्रेमापोटी आले हे सगळे जण आणि या भेटवस्तू आणल्या आहेत त्या पण प्रेमापोटी दिल्या आहेत.”


यावर तिचा भाऊ म्हणाला आई अगं आम्हाला दरवर्षी येता येतच असं नाही ना. त्यामुळे ज्या वर्षी जमतं त्यावर्षी आम्ही येतो. यावर्षी आम्ही अगदी ठरवलं होतं की तुझ्या वाढदिवसाला यायचं. यावर सून लगेच मम म्हणाली.

“ हो ना म्हणून तर आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि छान भेटवस्तू आणल्या. अनिता ताई तुम्ही काय घेतलं आईसाठी ?”

लगेच तिने विचारून घेतलं. अनिता मनातच हसली.ती म्हणाली,

“ मी अजून काही घेतलं नाहीये पण माझ्या मनात आहे .”

“आज वाढदिवस आहे नुसतं मनात आणून काय उपयोग आजच घ्यायला हवं होतं ना!”

सुनबाई म्हणाली यावर आई चटकन म्हणाली,
“घेतलं हो अनिताने. मला छान मला बोरमाळ केली गळ्यातली.”

“ बोरमाळ किती तोळ्यांची एक तोळ्यांची की काही ग्रॅमची?”

मधल्या सुनेने आपली अक्कल पाजळली. त्यावर आई म्हणाली,

“ एक तोळ्यांच्या वरच केली हो !”

त्याबरोबर सगळ्यांची डोळे पांढरे फट्ट पडायचीच वेळ आली होती.

“खरंच अनिताताई तू एवढा तोळ्यांची केलीस बोरमाळ ?”

बहिणीने आश्चर्याने आणि अनिताला विचारलं. अनिता म्हणाली,

“ अगं हो त्यात काय ? आईचा वाढदिवस किती तारखेला असतो हे निश्चित आहे. मग त्या दृष्टीने मी प्लानिंग केलं. थोडे थोडे पैसे साचवले आणि घेतली बोरमाळ. आईची खूप दिवसांची इच्छा होती बोरमाळ घालायची म्हणून केली.”

यावर काय बोलणार बहीण गप्प बसली आणि राग रागाने मात्र आपल्या नव-याकडे बघत होती. तिला चिडवायची अनिताला लहर आली. ती म्हणाली,

“ का ग आपल्या नवऱ्याकडे का रागाने बघतेस ?”

“नाहीतर काय ग ? मी दोन वर्ष मागे लागलेली आहे की मला दिवाळीत घालायला बोरमाळ हवी. कसलं काय आणि कसलं काय. अजिबात केली नाही त्यांनी.”


यावर तिचा नवरा ही डाफरला.


“ बोरमाळेचं काय घेऊन बसलीस ? तुला चांगली मोठी गाडी घेऊन दिली ना ! त्याचं काही नाही का ?”


“अगबाई कधी घेतली हो गाडी?”

लगेच मधल्या सुनेने आश्चर्याने विचारलं. त्यावर बहीण म्हणाली,

“ हे काय वाहिनी मी त्या दिवशी नाही का तुला फोन करून सांगितलं. तू म्हणाली पेढे द्यायला घरी ये पण मला ना तर ड्रायव्हिंग शिकण्याच्यात वेळच नाही मिळाला.”


अनिताला त्या सगळ्यांचे ऐकून मनातलं मला हसू येत होतं. तिला वाटत होतं हे सगळे लग्न करून आपले संसार करतायेत तरी सुखी नाही. एवढा पैसा कमवताय तरी सुखी नाही. एवढं सगळं घरात घेतात तरी सुखी नाही. मग सुख कशाला म्हणायचं? हे तरी यांना कळतंय का?

अनिता कितीतरी वेळ आपल्या विचारात रमली असती पण तेवढ्यात आईनं तिला म्हटलं,

“ अनिता अगं काय केलंय फराळाचं आणतेस ना?”

त्यावर अनिता म्हणाली,

“ हो हो आणते.”

त्यांना सगळ्या डिशेस सजवण्यापासून आणि अनितालाच करायचं होतं. तिला माहिती होतं तिच्या दोघी भाऊजया आणि तिची बहीण तिघी पण जागेवरनं उठणार नाही किंवा त्यांचे अहो उठवणार पण नाही. त्यामुळे तिने पटापटा सगळ्यांना प्लेट्स सर्व्ह केल्या.

सगळे निघून गेल्यानंतर अनिता शांतपणे खुर्चीत बसली होती्. आई आली आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली,

“ अनिता किती करशील ग? कधीतरी मी एकदा बोरमाळ्याबद्दल बोलली होती आणि तेच तू लक्षात ठेवून आज केलीस.”


यावर आईचा हात हातात घेऊन अनिता म्हणाली,

“आई आम्ही मोठे होईपर्यंत तू किती कष्ट घेतले. आमची प्रत्येक इच्छा पूर्ण केली ती करताना तुम्ही दोघांनी आपल्या इच्छा बाजूला ठेवल्या. मग एक तुझी छोटीशी इच्छा पूर्ण करू शकणार नाही का?”

यावर तिच्या आईला हुंदका फुटला.
__________________________

क्रमशः
लेखिका…मीनाक्षी वैद्य

🎭 Series Post

View all