खेळ नियतीचा भाग तीन

कथा मालिका अबाऊट लव्ह


कथेचे नाव : खेळ नियतीचा.

भाग : तीन

 संकेटच्या आयुष्यातून प्रिया निघून गेली याला दोन वर्षे पूर्ण झाली होती. आज प्रिया ऑफिसमध्ये निघाली होती.आज तिच्या ऑफिसची दुसरी ब्रांच सुरू झाली होती आणि तिकडेच तिला जॉईन व्हायचे होते.बस वेळेवर येत नव्हती,खूप वाट पहावी लागली तेंव्हा कुठे बस आली, ती घाईने चढायला लागली आणि कोणालातरी धडकली,तिने सॉरी म्हणत त्याच्याकडे पाहिले तर तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वास बसेना,सगळं भूतकाळ चुटकीसरशी डोळ्या पुढून गेला,तो तिचा नवरा संकेत होता.बसच्या धक्क्याने प्रिया त्याच्या अंगावर पडली.त्याने तिच्याकडे पाहून स्माईल दिले पण तिने स्वतःला सावरत सिट पकडली. तो ही तिच्याच रांगेत जाऊन बसला,तो तिच्याकडे पहातच होता,प्रिया मात्र खूप गोंधळली होती,मी इथे पुण्यात असूनही याला कसे समजले,इतकी वर्षे काय मला शोधत होता का हा ?? आणि आजच अशी आमची पुन्हा भेट का घडून यावी ?? मी तर सगळे सोडून आले होते ना मग हा पुन्हा पुन्हा माझ्या आयुष्यात का येतो आहे ?? 

प्रियाचे स्टॉप आला आणि ती उतरली,तिच्या मागोमाग संकेत सुद्धा उतरला.आता तिला खूप राग आला,ती सरळ संकेत जवळ गेली आणि म्हणाली,काय पाठलाग करताय मागा पासून माझा,मी तुमच्यामुळे नाशिक सोडून इथे आले तर तुम्हीही इथे आलात,झालं तेवढं पुरे झालं नाही का ?? अजून काय हवे आहे म्हणून पाठलाग करताय ?? प्रिया मी तुझा पाठलाग करत नव्हतो अग संकेत म्हणाला. हो,पाठलाग नाही हा ?? माझ्याच बस मध्ये आलात,मी उतरले तिथेच उतरलात वर म्हणताय पाठलाग नाही करत.प्रिया जरा हळू बोलशील का,लोक बघतायत अग.प्रियाने इकडे तिकडे पाहिले तर लोक खरंच बघत होते तिच्याकडे,ती जरा गडबडली.संकेत म्हणाला मी आपल्या व्यवसायाची,आपल्या मानल्यामुळे प्रियाने त्याच्याकडे पहिले,नाही म्हणजे व्यवसायाची नवीन शाखा सुरू केली आहे आणि त्याचे ऑफिस इथेच आहे,त्यामुळे मी बस मध्ये चढलो आणि इथेच ऑफिस असल्यामुळे इथे उतरलो.

प्रियाने समोरच्या कंपनीकडे पाहिले तर त्यावर संकेतच नाव होते,मग तिने माफी मागितली आणि ती तिच्या ऑफिसमधे गेली.या सगळ्या प्रकारात तिला उशीर झाला होता,ती जॉईन झाली पण तिचे कामात लक्ष लागेना,तिचे आणि संकेतच ऑफिस अगदी एकमेकांना चीटकुन होते, आणि त्यामुळे रोज भेट गाठ होणे स्वाभाविक होते,त्यात संकेत आता बसने आला होता,त्याच्या एवढ्या गाड्या होत्या त्या कुठे गेले,घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी गाडी होती,तरीही हा बसने का आला असेल.बीचारीचे डोके विचार करून दुखायला लागले होते.दुसरीकडे नोकरी मिळणे कठीण होते हीच नोकरी मोठ्या कष्टाने मिळाली होती तिला.त्यामुळे नोकरी कधी सोडावी हे तिला समजत नव्हते.

दिवस संपला आणि रूमवर जाण्यासाठी ती पुन्हा बस स्टॉप वर आली,तिथे संकेत उभा होताच.दोघांची नजरानजर झाली तशी ती पुढे जाऊ लागली,संकेत ने तिला थांबवले आणि मला तुझ्याशी महत्वाचे बोलायचे आहे म्हणाला.

प्रिया खरतर त्या दिवशी काहीच ऐकुन घेण्याच्या मनस्थितीत नव्हती.एकतर दोन वर्षानंतर अचानक संकेत समोर आल्यामुळे विसरण्याचा प्रयत्न करूनही विसरू न शकणारा भूतकाळ पुन्हा समोर उभा राहिला होता,मनातल्या कित्येक प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती आणि तिला जाणून घेण्यात कसलाही रस राहिला नव्हता.संकेत म्हणाला अग प्रिया कुठे हरवली आहेस,मला बोलायचे आहे तुला.आपण एखाद्या ठिकाणी बसून बोलुयात का ?? नाही,नको मला काहीच बोलायचे नाही तुमच्याशी आणि हो इथून पुढे माझी वाट अडवण्याचा प्रयत्न करू नका.आपल्या वाटा आता वेगळ्या आहेत.

काही दिवस होऊन गेले पण तिच्या मनाची तगमग काही कमी होईना. तिला त्यानंतर संकेत कुठेच रस्त्यावर किंवा बस स्टॉप वर दिसला नाही.पण संकेत भेटल्या पासून ती अस्वस्थच होती.तिला असेच अस्वस्थ वाटू लागले की ती पार्वतीवर जाऊन बसायची.आज सुट्टी असल्यामुळे ती निवांत होती,सकाळीच पार्वतीवर जाऊन बसू या विचाराने ती तिथे आली होती.लांबच लांब पर्वत रांगा आणि तिथली शांतता तिचे मन शांत करत असे,तिला इथे आल्यावर वेगळेच समाधान मिळत असे.दुपारची संध्याकाळ झाली तरी तिची तंद्री गेली होती,तिथली भयान शांतता ती डोळे मिटून अनुभवत होती.आता थोड्याच वेळात अंधार होईल म्हणून ती तिथून निघाली,थोडे पुढे गेल्यावर तिला संकेत दिसला,त्यानेही तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला कृपा करून तू पुन्हा काही गैरसमज करून घेऊ नकोस,मी इथे तुझा पाठलाग करत आलो नाही,मला माहित सुद्धा नव्हते तू इथे आली आहेस नाहीतर मी इथे आलोच नसतो.माझ्यावर चिडू नकोस,मी जातो इथून तू थांब इथेच.संकेत पुन्हा प्रियाला भेटल्या पासून त्याच्यातला बदल तिला जाणवत होता.ती म्हणाली नाही मी काही आरोप करणार नाही,मी जातच होते इथून तुम्ही थांबा,उशीर होईल मला.

संकेत म्हणाला खालपर्यंत तुला सोबत दिली तर चालेल का ?? प्रियाने मानेनेच मुक संमती दिली आणि दोघेही खाली उतरू लागले.बराच वेळ दोघांमध्ये अबोल शांतता होती,तुझा जॉब कसा सुरु आहे ? संकेतने विचारले.छान आहे.तू इकडे पुण्यात कधी आणि कशी आलीस,कुठे रहात आहेस ?? संकेत ने विचारले.का माझी चौकशी करतोस का ? प्रियाने विचारले.नाही मी अगदी सहज विचारले.तुला नसेल सांगायचे तर माझी काहीच हरकत नाही,तसेही आता आपल्या वाटा वेगळ्या आहेत याची मला जाणीव आहे.

तेवढ्यात चालता चालता तिचा तोल गेला,आणि संकेतने तिला सावरले.दोघांची नजरानजर झाली,श्वास एकमेकांत गुंतले गेले,आज पहिल्यांदा संकेतच स्पर्शाने प्रियाचे अंग मोहरले होते.काही क्षणात दोघेही सावरले,मी घर सोडून बाहेर पडले तेंव्हा,कुठे जावे,काय करावे बरेच प्रश्न होते समोर,आई बाबा कडे मी कधीच जायचे नाही,हे ठरवूनच घर सोडले होते,मला तिथे माझी मैत्रीण भेटली,तिने मला तिच्या घरी राहायला लावले.माझे शिक्षण अर्धवटच राहिले होते त्यामुळे नोकरी मिळणे कठीण होते,मग मी काही दिवसांनी नाशिक सोडण्याचा निर्णय घेतला.तेंव्हा पण तिनेच मला खूप मदत केली.तिच्याच ओळखीने मी पुण्यात आले,हॉस्टेलवर राहण्याची सोय झाली आणि नोकरी सुद्धा मिळाली.प्रियाने सांगितले.

पण तुम्ही नाशिक सोडून इथे कसे ?? आपल्या बद्दल संगले सांगितल्यावर प्रियाने संकेतल विचारले.तू माझ्या घरातून,आयुष्यातून निघून गेलीस आणि माझ्या जगण्याला काही अर्थच उरला नाही प्रिया,मी इतका निराश आणि अस्वस्थ होऊन गेलो होतो,की त्या दिवशी मी माझ्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला,पण माझे नशीब बघ,त्याच वेळी आई खोलीत आली होती आणि सगळ्यांनी खूप प्रयत्न करून मला वाचवले.मी जगत तर होतो पण मन मात्र कधीच मेले होते,माझ्या हातून नकळत झालेल्या चुका मला विसरता येत नव्हत्या आणि जगुही देत नव्हत्या,त्या अपघाताच्या दिवशी च सगळा प्रसंग पुन्हा पुन्हा दिसत होता,त्या वेळी काय झाले हे मला तुला सांगायचे होते पण तू ती संधीच मला दिली नाही,माझी तगमग वाढतच होती.म्हणून मी स्वतःला कामात झोकून दिले,दिवस रात्र काम आणि कामच करत होतो,तिथे मात्र नशिबाने माझी साथ सोडली नाही,मला खूप यश मिळाले आणि नाशिकमध्येच नव्हे तर बेंगलोर आणि पुणे इथे सुद्धा आपल्या व्यवसायाची उत्पादने पोहचली.काम इतके वाढले की मला इथे कंपनी सुरू करून इथले काम बघण्यासाठी यावे लागले.पण मग तुम्ही बसने प्रवास का करताय,तो अपघात माझ्याकडून झाल्या पासून मी गाडीला हात नाही लावला.

त्यांचे बोलणे होई पर्यंत ते खाली आले होते.मी निघते आता असे म्हणून प्रिया वळली,तेवढ्यात संकेत म्हणाला अपघाताच्या दिवशी नेमके काय घडले हे जाणून घ्यायचं नाही का प्रिया तुला ?? ते ऐकून प्रणव परत तर येणार नाही ना ?? प्रियाचे हे बोलणे ऐकून संकेत खूप कासावीस झाला,तो जसा तुझा प्रियकर होता तसाच माझा बालमित्र होता प्रिया.त्याच्या जाण्याचा जितका त्रास तुला झाला त्याहीपेक्षा तो मला झाला,कारण तू फक्त एका प्रणव ल गमावले पण मी त्याच्या सोबत तुलाही गमावले आहे.मला तुला इतकेच सांगायचे आहे की मी मुद्दाम त्याला मारले नाही,तसा विचारच माझ्या मनात कधी आला नाही,जे काही घडले तो केवळ एक अपघात होता प्रिया.


मला जुन्या गोष्टींचा अजूनही तितकाच त्रास होतो संकेत,आपण यावर नको बोलूया,असे म्हणून ती जायला निघाली पण तिला ओढून संकेत ने तिला थांबवले,तुला ऐकावं लागेल प्रिया,एकदा ऐकावच लागेल,मी गेली दोन वर्षे देवाला हेच मागतोय एकदा मला घडलेले सगळे काही प्रियाला सांगायचे आहे,त्यासाठी एकदा आमची भेट घडवून येऊदे.माझ्या मनात या गोष्टी दोन वर्षांपासून साठलेल्या आहेत,त्यांचं ओझ आता मला सहन होत नाही.त्या दिवशी मी गाडीवरून जात होतो, माझ्या मनात तुझे आणि प्रणवचे विचार चालू होते,त्या तंद्रीत माझ्या गाडीचा धक्का एका माणसाला बसला त्याला बघण्यासाठी मी उतरलो तर तो प्रणव होता,त्याला मी लिफ्ट दिली आणि त्याने तुमच्या नात्याबद्दल मला सांगायला सुरुवात केली,पण मी त्याला म्हणालो मला सगळे काही माहीत आहे प्रणव.त्यावर त्याने मला खूप समजावले,प्रियाला थोडा वेळ दे आणि तुमच्या वैवाहिक आयुष्यात काही अडचण येऊ नये म्हणून मी नाशिक सोडून जात आहे असे म्हणाला,त्यावर मी त्याला म्हणालो तू हे शहर सोडून कुठेही जाणार नाहीस,माझ्या मनात तुझ्या बद्दल राग किंवा तक्रार नाही.या सगळ्यात माझ्याकडून चुकून वेग वाढला आणि कार ट्रकला जाऊन धडकली.बस इतकेच होते,माझ्याकडून वेग वाढला प्रिया पण मी मुद्दाम त्याला मारण्याचा प्रयत्न केला नाही,तसे जर असते तर मी आधीच गाडीतून उडी मारून बाहेर पडलो नसतो का ?? 

संकेतच हे सगळं ऐकून प्रिया सुन्न उभी राहिली.पुन्हा डोळ्यातून आसवे बाहेर पडू लागली.मला मान्य आहे प्रिया मी चुकलो,खूप चुकलो पण मी जेंव्हा तुला पहिल्यांदा पाहिले तेंव्हाच तू माझ्या मनात घर करून बसली होतीस,तुझे कोणावर तरी प्रेम आहे हे कळूनही मी तुझ्यासोबत लग्न केले कारण मला वाटले कॉलेज मधे शिकणाऱ्या मुलांचे प्रेम आहे हे,मी पण कॉलेज लाईफ मध्ये असे खूप किस्से पाहिले आणि ऐकले.तुझेही प्रेम तसेच असेल,काही दिवसात तू सगळं विसरून जाशील आणि माझा स्वीकार करशील असे वाटले होते मला.पण याचे असे काहीतरी भयंकर परिणाम होतील याची कल्पनाही नव्हती प्रिया.

तू देशील ती शिक्षा मला मान्य आहे पण अशी तुटक वागू नकोस,तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेम पाहायला आतुर झालो होतो मी, पण आता मला कसलीही अपेक्षा नाही आणि तुझ्या मनाविरुद्ध काहीच करत हे नाही.मला जे बोलायचे होते,ते मी बोललो आहे.इथून पुढे मी तुझ्या आयुष्यात पुन्हा कधीही येणार नाही,तुला दिसणार पण नाही.मी उद्याच पुणे सोडतो आहे.पण एक सांगतो,मी जसा आधी तुझ्यावर प्रेम करत होतो,तसेच किंबहुना त्याहून जास्त प्रेम आताही तुझ्यावर करतो आणि कायम करत राहीन.

रात्रभर प्रिया विचार करत राहिली.सगळ्याच गोष्टी पुन्हा पुन्हा पडतलात राहिली आणि प्रत्येकवेळी एकाच निर्णयाशी येऊन थाबु लागली.सकाळी संकेत उठला आणि सगळी कामे मॅनेजर कडे सोपवून बस स्टँड वर आला.बस लागलेली होती,तो बसमध्ये चढला आणि एका सीटवर जाऊन बसला,त्याच्या शेजारची व्यक्ती पेपर तोंडासमोर धरून वाचत बसली होती,इथे मला एकटीला सोडून जात आहात का तुम्ही ? तो आवाज त्याच्या ओळखीचा होता, त्याने पेपर बाजूला केला तर ती प्रिया होती,मला नाही घेऊन जाणार तुमच्या सोबत नाशिक ल ?? थकले मी आता एकटी लढून.तिचे ते बोलणे ऐकुन संकेत चे डोळे आनंदाने भरून आले,त्याने पटकन तिला मिठीत घेतले आणि इथून पुढे मला कधीही सोडून जायचं नाही, मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही असे म्हणाला.आता खऱ्या अर्थाने नियती त्यांच्या बाजूने खेळ खेळत होती.

लेखिका : अपर्णा कुलकर्णी.