तगमग भाग एक
आयुष्य हे त्याच्या वळणानंच जातं. कित्येकदा आपण स्वप्नांचे इमले बांधतो, मनाशी काहीतरी ठरवतो पण तसं होत मात्र नाही. रोजची नवी पहाट माणसाच्या मनात नवी आशा घेऊन येत असते, आयुष्यात ध्येयामागे धावताना, आपलं लक्ष पूर्ण करताना जो आनंद होतो तो शब्दातीत असतो. आयुष्य जणू एक प्रवास आहे. सगळेच हा प्रवास करत असतात. कुणाचा थांबा आधी येतो कुणाचा नंतर, काही काहींचा तर ध्येय गाठण्या आधीच. विचारांची अनेक आवर्तन रमाच्या मनात सुरू होती.
‘आयुष्य इतकं सुंदर कधीच नव्हतं, जितकं मला ते आता वाटते आहे. एक व्यक्ती अचानक आयुष्यात येते काय? मला मी असल्याची आणि माझ्यावर खूप खूप प्रेम असल्याची जाणीव ती करून देते काय! आणि जबाबदाऱ्यांपलीकडेही एक सुंदर आयुष्य असतं आणि ते जगण्याचा अधिकार देवानं प्रत्येकालाच दीलेला असतो असं मला अगदी प्रेमळ आणि अधिकार वाणीनं समजून सांगते काय! आणि मग मलाही ते सगळं पटायला लागतं. अगदीच अनपेक्षित!!! काही गोष्टी या केवळ कथा कादंबऱ्यांमध्येच नव्हे तर खऱ्या-खुऱ्या आयुष्यातही घडत असतात. आपण आपल्या माणसांसाठी जे काही करत असतो त्याची नोंद कोणीतरी नक्कीच ठेवत असावं आणि मग आपल्या आयुष्यातलं रितेपण भरून काढायला, आपल्यावर अखंड प्रेम करणारी एक समंजस व्यक्ती आपल्या आयुष्यात येते आणि संपूर्ण आयुष्य तीनशे साठ अंशाच्या कोनातून बदलून जातं. माझ्याजवळ सगळं होतं, नाव, पैसा, कामातून मिळणार समाधान, जीवनात नव्हतं ते फक्त प्रेम. ते प्रेम आता मला मिळणार आहे आणि माझा आयुष्य पूर्णत्वास जाणार आहे.”
तीन दिवसांनी होणाऱ्या आपल्या लग्नासाठी रमा खास गाडीने अकोल्याहून नागपूरकडे निघाली होती. कारच्या मागच्या सीटवर बसून खिडकीतून, गाडीच्या सुसाट वेगासोबत धावणारी झाड, डोंगर कपारी, आकाशातले पांढरे ढग, आणि पर्वतावरून अधेमधे हळूहळू वाहणारे ओहोळ आणि झरे, तीचं मन मोहवुन टाकत होते. ती आजूबाजूचा परिसर न्याहाळत होती. तिचं आतापर्यंतचं आयुष्य, तिच्यासमोर जणू फेर धरून नाचत होतं, ‘जीवनाकडे तू इतक्या अलिप्तपणे का बघत होतीस?’ असंच जणू तिला ते विचारत उभं होतं.
दिसायला सर्वसाधारण असूनही मराठी भाषेवर तिचं चांगलंच प्रभुत्व होतं. एम. ए. मराठीत तीला गोल्ड मेडल मिळालं होतं आणि बी.एड.ला तर ती विद्यापीठातून प्रथम आली होती, ज्युनियर कॉलेजला मराठी विषय शिकवतानाच, अधून मधून ती स्थानिक आकाशवाणी केंद्रावर तिचे निबंध आणि कधी कधी कथा वाचनाचे कार्यक्रमही करी.
घरी भावंडांमध्ये तिचा नंबर मधला. मोठा भाऊ लग्न करून स्वतःच्या वैवाहिक आयुष्यात रमला तर लहान बहिणीला नाटक, सिनेमाचं प्रचंड वेड होतं. त्यापायी तीनं घरदार सोडून मुंबईकडे कधीच प्रस्थान केलं होतं.
लहानीवर आई-बाबा दोघांचाही फार जीव होता. धाकली दिसायलाही सुंदरच होती. शेंडेफळ आणि दिसायला सुंदर म्हणून आई-बाबांची अधिकच लाडाची. त्याच अति लाडांनं तीचा घात केला आणि धाकटी मीरा, सिनेमात नशीब आजमावयाला एका संध्याकाळी मैत्रिणीकडे जाते असं सांगून, घरी कुणालाही, कुठलाच पत्ता लागू न देता, न सांगता मुंबईला एकटीच पळून गेली.
मीराचं असं घरातून पळून जाणं रमाच्या वडिलांना जिव्हारी लागलं. त्यांना जबरदस्त हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच ते गेले. लहान मुलगी घरातून पळून गेली, नवऱ्याचा अचानक झालेला मृत्यू त्यामुळे रमाच्या आईच्या डोक्यावर परिणाम झाला. नवरा गेला हे ती मान्यच करायला तयार नव्हती. अजूनही ती सवाष्ण बाई सारखीच सौभाग्याची सर्व लेणी अंगावर मीरवत होती.
रमाच्या आईने आता स्वतःचं एक वेगळं काल्पनिक विश्व बनवलं होतं. आपल्याच विश्वात ती जगत राही. दाराच्या उंबरठ्यात तासंतास उभे राहून तिच्या वडिलांची वाट पाही. रमा कॉलेजमधून घरी आली की तिला एकच प्रश्न विचारून भंडावून सोडे. ”मीरा आली नाही अजुन घरी, जरा तिच्या मैत्रिणीकडे विचारपूस कर ना!” रमा तिला बळेबळेच हो म्हणे.
घरात इतकी उलथापालथ झाली, स्वतःच्या आईच्या डोक्यावर परिणाम झाला, तरीही रमाचा भाऊ, वडिलांचं दिवस कार्य संपल्या नंतर, एक दिवसही त्या घरात थांबला नाही आणि आल्या वाटेने, आपल्या मुलाबाळांसह परत नोकरीच्या गावी निघून गेला. घरातला मोठा मुलगा असूनही त्यानं कधीच घराची किंवा आई-वडिलांची किंवा आपल्या बहिणी कुठलीच जबाबदारी कधीच घेतली नव्हती.
लहान असताना रमाच्या आई-वडीलांना आपल्या एकुलत्या एका मुलाचं फार कौतुक होतं. वंशाचा दिवा, घराण्याचा वारस म्हणून त्याचे अतिलाड झाले. त्यानेही आपल्या आई-वडिलांची मानसिकता ओळखून, स्वकेंद्रीत आयुष्य जगायचं ठरवलं आणि तसं करूनही दाखवलं. त्याला शक्य असूनही त्यांनं कधीच आपल्या गावी स्वतःची बदली करून घेतली नाही. बायकोही अगदी गर्भ श्रीमंत घरातील शोधली. तिचं स्वतःच्या सासरी तडजोड करून राहणं शक्यच नव्हतं.
घरचं काम, बाहेरचे पैश्यांचे, बँकेचे व्यवहार, किराणा, वाण सामान, भाजीपाला, आईचं औषध पाणी, मध्येच बळवणारं तिचं आजारपण, स्वतःची नोकरी, या सगळ्या वर्तुळातच रमाचं आयुष्य फिरायला लागलं. स्वतःसाठी काही करावं, मनाप्रमाणे दोन दिवस तरी जगावं असं तिला मनातून फार वाटे पण भूतकाळ आठवला की, आईची अवस्था बघून सर्व धीर एकवटून ती पुन्हा केवळ दुसऱ्या दिवसाच्या तयारीला लागे.
जेवढ्या वेगाने रमाची कार समारंभ स्थळी जाण्यासाठी धावत होती तेवढ्याच वेगाने तिच्या मनात भावनांची आंदोलन आणि डोक्यात विचार चक्र फिरत होतं. आणि मनात तिला थोडीशी धाकधूक, आणि हुरहुरही वाटत होती.
पुढल्या भागात बघूया रमाच लग्न होतं की त्यात काही विघ्न येत आहे.
©® राखी भावसार भांडेकर. नागपूर
सदर कथा हि संपूर्णतः काल्पनिक असून या कथेतील घटनांचा आणि पात्रांचा वास्तवात कुणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा, तसेच ही कथा राखी भावसार भांडेकर यांची असून प्रकाशनाचे सर्व हक्क लेखीकेकडे राखीव आहे. या कथेचे व्हिडिओ बनवण्यास परवानगी नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा