Login

तिचं कर्तव्य आहे ते अंतिम भाग

सौम्या स्वतःच्या हक्कासाठी उभी राहिली

तिचं कर्तव्य आहे ते - अंतिम भाग

मागील भागात आपण पाहिलं कि नेहा सौम्याच्या नावावरच्या जमिनीची मागणी करते


संध्याकाळी सौम्या ऑफिसमधून लवकर घरी आली होती, कारण तिला ट्रिपची तयारी करायची होती.
सागर, सुनंदा काकू आणि नेहा हॉलमध्ये बसलेले.

सागरने विषयाला हात घातला,

"ताई, सौम्या दोन दिवस बाहेर जाणार आहे. तू आहेस ना इकडे? आईच आणि आर्याचं पाहशील ना?"

नेहा लगेच हात वर करत म्हणाली,

"सागर, अरे मला कसं शक्य आहे? माझीही कामं आहेत, मी थोडीना बसू शकते एवढे दिवस."

सागरने शांतपणे विचारलं,

"पण ताई, फक्त दोन दिवस आहेत, थोडं बघशील तर बरं होईल.मी मदतनीस पण ठेवेन. "

"अरे तस नाही पण मी माझ्या मित्रमैत्रिणींसोबत  आधीच प्लॅन केला आहे. मला हे काही जमणार नाही. तू आधीच बोलायचं ना???"


नेहा ठामपणे म्हणाली. सागर ह्यावर गप्प बसला,सौम्याला सुद्धा खूप टेन्शन आलं. पण तेवढ्यात सुनंदा बाई म्हणाल्या,

" ते जाऊदे, त्यावर बोलू काहीतरी.... मला दुसरं बोलायचं आहे....सौम्या, जरा ये इकडे. "


ती गेली तेव्हा नेहा हातात काही कागदपत्रं घेऊन बसली होती.


"सौम्या, तुझ्या नावावर जी जमीन आहे ती मला नेहाच्या नावावर करून हवी आहे, ह्या कागदावर सही कर.तिला तातडीचं काम आहे. तू तर त्या ट्रीपला गेलीस तर राहून जाईल.कर पटकन सही."


सौम्या क्षणभर शांत राहिली, तिने सागरकडे पाहिलं तो सुद्धा आईच बोलणे ऐकून आवाक झालेला.

"ताई,  त्या जमिनीवर माझा हक्क आहे. आणि सध्या मी ती देऊ शकत नाही."

नेहा कपाळावर आठ्या घालत म्हणाली,

"मला पैशाची गरज आहे.. म्हणून मागते आई बघ ना... आता माझा एवढा पण हक्क नाही का?"


तशी ती रागात सगळ्यांकडे पाहत म्हणाली,


"म्हणजे ताई, माझ्या दोन दिवसांच्या ट्रिपसाठी थांबायला तुला वेळ नाही, पण माझ्या जमिनीचे कागद घ्यायला मात्र वेळ आहे, बरोबर?"

नेहा थोडी गोंधळली, "अगं ते वेगळं आहे…"

"काय वेगळं आहे? आई जेव्हा आजारी पडल्या होत्या, तेव्हा तू ट्रिपला गेलीस. मी दिवस-रात्र आई-बाबा, घर, मुलगी, ऑफिस सगळं सांभाळलं. तेव्हा तुला वेळ नव्हता.
आणि आता पण नसेल. पण हक्क मात्र तुम्हाला हवा, बरोबर?"

सौम्या थोडा थांबली, तिच्या डोळ्यांत पाणी दाटत असूनही आवाज अजून कडक झाला.


"आई-वडील तुझे आणि सागरचे आहेत ना? मग त्यांचं सगळं करायचं कर्तव्य कुणाचं आहे… तुमचं दोघांचं की माझं??  घर हे फक्त माझं जबाबदारीचं ओझं आहे, आणि हक्क मात्र सगळ्यांचे? असं कधीपर्यंत चालणार? माझ्या आईवडिलांच मी करणे मी माझा हक्क समजते पण तुमच्याकडून तस काहीच जाणवलं नाही मला."


नेहा गप्प बसली. सुनंदा काकूंचा चेहरा उतरला होता.

सागर तिच्याकडे बघत होता, आज त्याला जाणवलं, सौम्या पहिल्यांदाच स्वतःसाठी उभी राहते आहे.त्याला खूप बरं वाटलं.


" मग काय सून म्हणून तुझी काहीच कर्तव्य नाहीत का??"

तरी सुद्धा सुनंदा बाई मध्येच बोलल्या.

" आहेत ना... आणि मी त्यापासून कधीच दूर पळाली नाही हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला ठाऊक आहे. याआधी झालं ते झालं, यापुढे मी माझे हक्क मागून घेणार.. ताई तुम्हाला पैशाची खूप गरज आहे तर तुमच्या आईवडिलांकडून, भावाकडून किंवा माझ्याकडून पण मागू शकता तुम्ही.. पण हे असं माझीच जामीन माझ्या कष्टाची असून तुम्ही म्हणता माझा तिच्यावर अधिकार नाही तर ते मला चालणार नाही. "

नेहासुद्धा तिच्याकडे बघतच राहिली, कधीही न बोलणारी आज खूप काही बोलून गेली होती.


"आणि हा सागर तुम्ही मदतनीस ठेवा, दोन दिवस ती करेल मी उद्याच जात आहे...."


सागरने त्यावर मान डोळावली तर सुनंदाबाई तिच्याकडे पाहतच राहिल्या.


हा सौम्याचा एवढ्या वर्षाचा साठलेला उद्रेक होता. तो
वेळीच बाहेर पडला नाहीतर तिला घुसमटून जगायला लागलं असत.
म्हणून योग्य वेळी बोलणे महत्वाचं आहे.


समाप्त
0

🎭 Series Post

View all