Login

तिने त्याला बिघडवलं

लग्न जुळतांना कुणीतरी भेटलं आणि मग तिच्या प्रेमात त्याचं जिवन बदललं.
संध्याकाळच्या त्या सोनेरी प्रकाशात महालक्ष्मी मंदिराच्या शिखरांवर लालसर झळाळी पसरली होती. मंद वारा वाहत होता, ज्यात अगरबत्तीचा आणि फुलांचा गंध दरवळत होता. मंदिराच्या दाराशी एक अखंड रांग लागली होती. हातात नवनवीन ओटीचं सामान, फुलांचे हार, नारळ, हळदकुंकू, आणि लालचुटूक ओढण्या घेतलेल्या स्त्रिया एकामागोमाग उभ्या होत्या.

दूरवरून घंटानादाचा नाद दुमदुमला की सर्वांची नजर मंदिराच्या दिशेने वळे. त्या प्रकाशात देवीच्या गाभाऱ्यातील दिव्याची रोषणाई सोन्याप्रमाणे चमकत होती.

देविका थोडीशी धापा टाकत आली. हातातल्या ताटात तिने काळजीपूर्वक ओटीचं सामान नारळ, बांगड्या, हळद, कुंकू, आणि साडीचा तुकडा सावरला. तिच्या कपाळावर थोडं घामाचं ओलसरपण, पण डोळ्यांत भक्तिभाव. रांगेतल्या स्त्रियांमध्ये ती शांतपणे सामील झाली.

समोर एक लहान मुलगी आईचा हात धरून देवीचं नाव घेत होती, आणि मागून एक वृद्धा मंद स्वरात मंत्र म्हणत होती. धूपाचा धूर आकाशात चढत होता, आणि त्या संध्याकाळच्या वातावरणात संपूर्ण परिसर भक्तीने ओथंबून गेला होता.

देविकाने एक दीर्घ श्वास घेतला, "आज देवीसमोर काही मागायचं नाही, फक्त आभार मानायचे." असं मनोमन ठरवत ती पुढे सरकली.

ती आपल्याच विचारांत गुंग होती. तिच्या हातातलं ताट हलकं थरथरत होतं, नारळावर पडलेली किरणं लालसर झळाळत होती. मंदिराच्या घंटांचा नाद वाढत होता, आणि पुजाऱ्यांचा मंत्रोच्चार गाभाऱ्यातून बाहेर पसरत होता.

इतक्यात, मागून एखादी प्रसादाची थाळ घसरल्याचा आवाज आला. देविका चटकन वळली. एक उंच, सडपातळ तरुण जरासा वाकून थाळीतील फुलं आणि फळं उचलत होता. त्याच्या हातांवर हलकं कुंकवाचं लालसरपण लागलं होतं, आणि संध्याकाळच्या प्रकाशात त्याचा चेहरा स्पष्ट झाला.‌ न शांत, न गर्विष्ठ, पण स्वाभिमानी वाटत होता.

थोड्या वेळासाठी तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं. रंग गहिरा होता, पुरूषांच्या रांगेत उभा असलेला तो कुणीतरी एखाद्या शहरी भागातून आलेला होता. त्याच्या केसांची राखण, टाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्टमध्ये तो एखादा सेल्समॅन वाटत होता. तरी गर्दीतही तो वेगळा भासत होता.

जमिनीवर पडलेली थाळी उचलून त्यात सगळं पुन्हा नीट ठेवलं, आणि रांगेत उभ्या असलेल्या एका वृद्ध स्त्रीला हलकं स्मित देत बोलला, "घाबरू नका, सगळं ठीक आहे."

तो पुन्हा बाजूला सरकून पुरूषांच्या रांगेत उभा राहिला. त्याची नजर थोडीशी हलली आणि तिला पाहिलं. त्याच्या नजरेतून ती एका मुर्ती सारखी सुंदरी दिसत होती, चेहऱ्यावर ना हावभाव होते, नाही तिच्या सुंदरतेचा गर्व, तिच्यातील साधेपणा यातच होता, तिने साडी नेसली होती. ती एकटीच नव्हे तर तिथले सगळे त्यालाच पहात होते, पण तो शांतच होता. त्याने एकवार मान वळवून पाहिलं आणि रांग पुढे सरकली.

रांग जशी पुढे सरकत होती, तशी लोकांची जागा बदलत होती. कोणीतरी आरतीचा दिवा हातात घेत होतं, कोणीतरी प्रसादाचं ताट पुढे करत होतं, आणि या गर्दीत क्षणाक्षणाला चेहरे पुढे सरकत होते.

एक वेळ अशी आली, की देविकाने जेव्हा पहिलं पाऊल मंदिराच्या आत ठेवलं. त्याच वेळी त्या तरुणाचं पहिलं पाऊलही गाभाऱ्याकडे पडलं. दोघांचं पाऊल एकाच वेळी दगडी पायरीवर टेकलं, आणि त्या पायरीचा थंडपणा त्यांच्या पायांखालून मनापर्यंत गेला.

त्या मिनिटाला जसं विश्वच थांबलं होतं. घंटानादाचा आवाजही मंद झाला, धूपाच्या वळसांनी त्यांच्या दरम्यान एक हलका पडदा उभा केला. पूजेचं ताट पुजाऱ्याच्या हातात देऊन तिने देवीला सगळं अर्पण केलं.

देविका देवीच्या मूर्ती समोर हात जोडत असतानाच तिची नजर नकळत बाजूला गेली. त्याच वेळी तोही आपलं डोकं नमवून वर पाहत होता. त्यांचे डोळे एकमेकांना भिडले, ओठांवर हसणं येणार होतं पण देविकाने नजर बाजूला वळवली.

ना शब्द, ना ओळख, फक्त एक हलकीशी शांत ओळ जाणवली. तरीही आज तिला बघायला एक मुलगा येणार होता, त्यामुळे जर तिला कोणीतरी आवडायला हवं, तर तो मुलगा हा नव्हता. जो तिच्या घरी येणार होता, त्यालाच तिला पसंत करायचं होतं.

देविकाने पूजेचं ताट उचललं आणि मंदिराच्या दारातून बाहेर पडली. पायऱ्यांवर गर्दी होती, तरी तिचं लक्ष मागच्या विचारांत अडकलेलं होतं. तिला अजूनही त्या नजरेचा भास होत होता. तो अजूनही कुठेतरी तिच्या मागे उभा होता.

"ॲटिट्युड गर्ल...!" असं रागात म्हणून तो मंदिराच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला.

त्याच्या सारख्या मुलाला कुणी इग्नोर करावं अशातला तो नव्हता. पण त्याची अपेक्षा होती, की तिने त्याला एक स्माईल तरी द्यावी!

त्याशिवाय ती गर्दीतून बाहेर पडली आणि रस्त्याच्या बाजूला थांबून आपला पदर नीट करत होती. तेवढ्यात मागून तोच आवाज आला.

"एक मिनिट, माफ करा... हे तुमचंच आहे का?"

तिने मागे वळून पाहिलं. तोच तरुण, तिची थाळी पकडून तिथे उभा होता. त्या दोघांच्या पूजेची थाळ अदला बदली झाली होती आणि त्याकडे तिचं ध्यान नव्हतं. त्या मिनिटाला तिचं मन थबकलं.

"हो... माझंच आहे हे," ती हलकं म्हणाली, आवाज अगदी मंद, पण चेहऱ्यावर एक अनामिक स्मित होतं.

"सॉरी, गर्दीत लक्षच नाही राहिलं... तुम्ही इथेच राहता का?" त्याचा स्वर नम्र होता, थोडा आत्मविश्वासपूर्ण पण अति न वाटणारा.

देविकाने नजर खाली केली, "हो… जवळच."

"मग नशीब चांगलं माझं," तो म्हणाला, "नाहीतर तुमची थाळी हरवली असती आणि तुम्हीही."

त्याच्या बोलण्यात विनोद नव्हता, पण काहीतरी सहज आकर्षण होतं. देविका हसली, पण लगेचच तिने लक्ष दूर वळवलं.

"थॅन्क यू... पण मला जायला हवं," ती म्हणाली आणि रस्त्याकडे वळली.

तो परत तिच्याकडे पाहत राहिला. तिच्या त्या गुलाबी रंगाच्या साडीला अलगदपणे बसणारे झटके, पाठीवर रूळणारी तिची ती लांब वेणी आणि हिलची सॅन्डल.

"तुमचं नाव काय आहे...? कळेल का!"

त्याने अखेर विचारलंच. ती थोडीशी थांबली, तिने किंचितसं वळून त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेतून दिसणारी तिच्या विषयी जी नुकतीच तराळलेली रंगछटा होती, ती कोणत्याही मुलीला आवडेल अशीच होती. पण तरीही तिने स्वतः ला त्यात अडकू दिलं नाही.

"माझं नाव ऐकून तुम्ही काय कराल...?"

"नाही म्हणजे... या मंदिरात मी पहिल्यांदाच आलो, आणि पहिल्यांदा कुणाशीतरी बोललो, म्हणून विचारलं."

"अनोळखी गावात, अनोळखी माणसाशी ओळख ठेवणं बरं नाही." असं बोलून ती तिथून वळाली.

0

🎭 Series Post

View all