Login

ती एक अस्तित्व... ( लघु कथा)

ती एक सत्य की कथा...
ती एक अस्तित्व...

मुंबईच्या धावपळीच्या गर्दीत, एकांत शोधणारे खूपजण असतात... पण त्या गर्दीतही काही ओळखी पुन्हा भेटाव्यात, असं वाटतं... अशीच एक भेट, रॉय आणि इशा यांची झाली...

रॉय मुळचा कोलकात्याचा... मुंबईत नुकताच एका फोटोग्राफी प्रोजेक्टसाठी आलेला... शांत स्वभावाचा, गहिरी नजर, आणि पावसात टिपलेली प्रत्येक भावना जपून ठेवणारा...
इशा एक कॉर्पोरेट विश्वात रमलेली, पण संध्याकाळी समुद्रावर एकटी बसणारी, नजरेत उडवलेली उदासी लपवणारी मुलगी....

पहिल्यांदा भेट झाली वांद्रेच्या एका बुक कॅफेमध्ये....

"तुम्हीही एकटे येता का इथे?" इशाने विचारलं....

"छायाचित्रं शोधायला एकटं असावं लागतं... गर्दीत ते हरवतं," रॉयने उत्तर दिलं....

"मग मी तुम्हाला व्यत्यय ठरत नाही ना?" ईशाचा प्रतिप्रश्न

"तुमचं अस्तित्व... माझ्या कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये बसतंय म्हणजे व्यत्यय नक्कीच नाही.... " रॉय मी सहज दिलेले उत्तर...

त्या एका वाक्याने सुरुवात झाली... मग त्यांच्या भेटीगाठी वाढत गेल्या.... कधी चौपाटीवर, कधी जुहूच्या कॉफी शॉपमध्ये, तर कधी जुने किल्ले शोधत ते नेहमी भटकंती करत असे...  रॉय प्रत्येक ठिकाणी इशाचे फोटो घेत राहिला.... प्रत्येक क्लिकमध्ये तिच्या चेहऱ्यावरचे बदल टिपू लागला...

"तुला माहितेय का? तू पळतेस... तुझी नजर कायम टाळतेय काहीतरी," तो म्हणाला एकदा....

"माझं भूतकाळ, रॉय... मी त्याला विसरत नाहीये... पण त्याने मला बदललंय."इशाने उत्तर दिले...

"माझ्या कॅमेऱ्यातली तू मात्र नेहमी खरी असतेस... " रॉय सहज बोलला...

ती हसली होती त्या दिवशी... कित्येक वर्षांनी...

पावसाच्या एका संध्याकाळी, इशा त्याला म्हणाली,
"तुला असं वाटतं का की आपण... म्हणजे, आपल्यात काहीतरी आहे?"

"मी हे कधीच थांबवू शकत नाही, इशा... तू माझ्या फ्रेममध्ये येऊन थांबलीस, आणि आता ती फ्रेम माझं जग बनलीये..." रॉय ने सांगितले...

त्या रात्री त्यांनी एकमेकांशी सर्व काही शेअर केलं... रॉयने सांगितलं की,  हा त्याचा शेवटचा प्रोजेक्ट आहे.... तो पुन्हा कोलकात्याला परत जाणार आहे...  इशाने सांगितलं की तिचं लग्न ठरलेलं आहे, पण मनाने ती कुठेच गुंतलेली नव्हती, तोवर रॉय भेटला....

"माझं लग्न तोडणं मी विचार करू शकते, पण तू राहणार आहेस का इथे?" – इशाचा प्रश्न स्पष्ट होता...

"माझ्या आयुष्याची दिशा बदलू शकते, जर तू त्याचा भाग झालीस तर." रॉय ने उत्तर दिले...

त्या रात्री, पहिल्यांदा दोघं एकमेकांच्या मिठीत हरवले... ते एक प्रेम होतं… की एका निर्णयाची तयारी?

एक महिना… इतकाच वेळ होता त्यांच्याकडे... रॉय आणि इशा – एकमेकांत गुंतले, काळ विसरून जगत होते... रॉय तिचे स्केचेस करायचा, इशा त्याच्यासोबत शहर शोधायची...

आणि मग, एका सकाळी, इशा गायब झाली...

फोन बंद... घरी कुणी नाही....ऑफिसमध्ये तिने रिझाइन केलं होतं....  रॉय गोंधळला....  चौकशी केली, पण कुठेच ती सापडली नाही..... त्याने सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न केला पण निरर्थक...

दोन आठवड्यांनी, त्याला एक मेल आला....

"Subject: माझा निरोप..."

रॉय,

**माफ कर. मी तुला आधीच सांगितलं होतं – माझा भूतकाळ मला सोडत नाही....

तू माझ्या आयुष्यात आला आणि क्षणभर वाटलं, की मी पुन्हा जगू शकते.....  पण माझं सत्य तेवढंच होतं – मी एक कथा होती, जी तुला मोहात पाडण्यासाठी लिहिली होती...

माझा हेतू काय होता, ते तुला उशिरा कळेल.... पण एक सांगते – प्रत्येक क्षण खरंच जगले मी...

पण... मी कुणाची होऊच शकत नव्हते...

तुझ्या फ्रेममध्ये मी होती... पण प्रत्यक्षात मी कधीच नव्हते..."

- इशा


रॉय अवाक झाला... त्याच्या सर्व फोटोंमध्ये तिचा चेहरा होता, पण आता तो अर्थहीन वाटत होता... त्याने अनेकदा स्वतःला दोष दिला....  ती कोण होती? खरंच प्रेम केलं होतं का?

मग एक दिवस, मुंबईच्या एका गॅलरीत त्याचं प्रदर्शन सुरू होतं.... त्याच्या कामाची खूप चर्चा झाली.... त्याच्या फोटोमध्ये 'ती'  इशा सतत झळकत होती....

त्याच दिवशी, एका अनोळखी स्त्रीने त्याच्याजवळ येऊन विचारलं,
"ही मुलगी... इशा म्हणता तुम्ही तिला? हिचं खरं नाव प्राची होतं.... ती माझ्या भावाचं आयुष्य उद्ध्वस्त करून गेली होती... पैशांसाठी, नावासाठी... प्रेमाच्या नावाखाली अनेकांना फसवलं तिने...."

रॉयच्या पायाखालची जमीन सरकली....

ती फक्त एक गोष्ट होती....  एक कथा. एक फ्रेम. एक फसवणूक....

पण... एक काळजीपूर्वक रेखाटलेला सत्याचा तुकडा देखील.....