ती काहीच करत नाही भाग एक
“हॅलो सुमे, बसला का ग तुमच्या घरचा बाप्पा? उद्या ऋषिपंचमी आहे, महालक्ष्मी यांचा फुलोरा करण्यासाठी येणार आहेस ना तू?नीता ताई गावातच असलेल्या आपल्या लहान बहिणीला फोनवर विचारत होत्या.
“हो ग ताई आता तू एवढा फोन करून बोलावलंय तर यावच लागेल ना! पण मी काय म्हणते जरा तुझ्या सुनेलाही हाताशी घे ना! यावेळी मी येते पण पुढल्यावेळी माझं जमेल की नाही माहिती नाही?” सुमा मावशीने नीता ताईंना सध्या पुरता होकार कळवला.
“तुझं म्हणणं बरोबर आहे ग पण माझी सून नंबर एकची धांद्रट, कधी काय गोंधळ करून ठेवेल आणि कशाचा काय घोळ करेल त्याचा काही नेम नाही. तिच्या हाताला उरकही नाही आणि तिला देवाचं काही करावंसं वाटतही नाही. जाऊदे नकोच तो विषय आता. आत्ताच घरी बाप्पाचा आगमन झालं आहे तू ही पटकन उद्याच्या तयारीला लाग. उगीच वेळ नको करू ईकडे घरी यायला. आणि मगाशी बोलता बोलता काय म्हणालीस ग तू की पुढल्यावेळी जमेल की नाही काही सांगता येत नाही?” नीता ताईंनी चौकशीच्या स्वरात विचारलं.
“ताई तुला तर माहिती आहे सहा महिन्यांपूर्वी माझ्या केदारच लग्न झालं. बहुतेक सुनबाई एवढ्यात गोड बातमी देतील असा माझा अंदाज आहे. मग घरी एकदा छोटा गणू आला की मला काही सवड नाही बाई!” सुमा मावशी उत्साहात बोलत होत्या.” बरं मी आता फोन ठेवते आणि उद्या सकाळी लगेच तुझ्या घरी येते तेव्हा मग सविस्तर गप्पा मारु.”
तर मैत्रिणींनो या आहेत नीता ताई. त्यांच्या घरी प्रत्येकच सण उत्साहात साजरा केला जातो. आणि उत्साह म्हणजे काय तर प्रत्येक सणाचे वेगवेगळे मेनू! इतकी वर्षे सणाचा संपूर्ण स्वयंपाक त्या आपल्या दोन मुलींच्या मदतीने स्वतः हाताने बनवायच्या. पण गेल्या तीन-चार वर्षात त्यांच्याकडून आता पूर्वीसारखं काम होत नव्हतं. सुनेचं आणि त्यांचं कधीच कुठल्याच बाबतीत एकमत होत नव्हतं.
नीता ताईंची सून रमा, ही पण काही टिपिकल दुष्ट किंवा अति मॉडर्न सून वगैरे नव्हती आणि नीताताई पण खाष्ट सासू नव्हत्या. पण रमाची काम करण्याची पद्धतच त्यांना आवडत नव्हती. नीता ताईंना एक तीन वर्षाची नात होती. मूलगी लहान असल्याने रमाने झाडूपोछा आणि भांड्यांकरीता बाई लावली होती. पण तरीही सणवार असला की नीताताई रमाच्या अगदी खनपटीला बसत.
पुढल्या भागात बघूया नीताताई रमाला महालक्ष्म्यांचा फुलोरा करू देतात की नाही
©® राखी भावसार भांडेकर. नागपूर
सदर कथा हि संपूर्णतः काल्पनिक असून या कथेतील घटनांचा आणि पात्रांचा वास्तवात कुणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा, तसेच ही कथा राखी भावसार भांडेकर यांची असून प्रकाशनाचे सर्व हक्क लेखीकेकडे राखीव आहे. या कथेचे व्हिडिओ बनवण्यास परवानगी नाही.