ती काहीच करत नाही अंतीम भाग
“आता तूच बघ मगा पासून छकुलीला झोपायला ही बया खोलीत गेली. एक तास झाला तरी बाहेर आली नाही. आणि तू म्हणते की तिला सगळं हात धरून शिकव. अगं जरा शिकायचं असतं तो स्वतःहून शिकतो. आपली लग्न झाली तेव्हा आपली वय तरी अशी किती होती? तरीही सासूच जावांच बघून आपण शिकलोच ना! आजकालच्या मुलींना धाक म्हणून कुणाचा वाटतच नाही! मेल माझंच नशीब कसं ही अशी काम चुकार सून मला मिळाली.”नीताताईंच्या मनातली चिडचिड त्यांच्या शब्दा शब्दातून बाहेर पडत होती.
तेवढ्यात तिथे रमा आली.”मावशी मी करू का काही मदत?” रमाने शांतपणे विचारलं.
“वा! स्वतःच्याच घरचा फुलोरा आणि बाईसाहेब विचारतात की मी मदत करू का?” नीताताईंच्या रागाचा पारा आता फुटला होता.
“ताई तू जरा शांत रहा ना! अगं देवाचं करताना अशी चिडचिड बरी नव्हे!” सुमू मावशी समजूतदारीच्या स्वरात बोलत होती.”रमा अगं आता ताईचं वय झालं आहे आधी तुझ्या दोन्ही नंदा रिता आणि रीमा तिच्या मदतीला होत्या त्यांची लग्न झाली आणि तू आली. घरातली सून म्हणून सहाजिकच तुझ्याकडून तिच्या काही अपेक्षा आहेत आणि जनरिक म्हणून तू ही त्या पूर्ण कराव्या असं मला मनापासून वाटतं.” सुमु मावशी आपल्या बहिणीची बाजू रमाला समजावून सांगत होत्या.
“मावशी तुमचं म्हणणं मला अगदी मान्य आहे. सुरुवातीला मी पण आई जसं म्हणत होत्या अगदी तसंच वागत होती. पण नंतर नंतर माझ्या लक्षात आलं की त्यांना मी केलेलं काहीच पटत नाही. प्रत्येक वेळी त्या मला टोमणे मारायच्या की ‘माझ्या मुलींना, मी काही हात धरून शिकवलं नाही. माझं बघून बघूनच त्या शिकल्या, तुला साधी करंजीची पारी लाटा येत नाही, अनारस्याची उंडी बांधता येत नाही, शेव चकलीचे प्रमाण तुला कळत नाही, एवढंच काय महालक्ष्मीच्या नैवेद्याला काय असतं तेही तुला माहीत नाही.’ “आणि खरच सांगते मावशी मला या कुठल्याच कामाची सवय नव्हती आणि माहिती पण नव्हती. माझ्या माहेरी महालक्ष्मी नसतात, म्हणून मग मला सगळं समजावून सांगून जे येत नाही ते निदान शिकवण्याचा प्रयत्न तरी आईंनी करायला हवा होता. त्याउलट माझ्याकडून छोटीशी जरी चूक झाली तरी त्या मला खडे बोल सुनवायच्या. महालक्ष्मी साठी आणलेल्या साड्या आई कधी मला दाखवत सुद्धा नव्हत्या, नवीन लग्न झाल्यावर प्रत्येक सणाला विनाकारण चिडचिड करायच्या, माझ्यासाठी साडी घ्यायची म्हटली की आई चार गोष्टी सुनवायच्या, मी तर तेही कधी मनावर घेतलं नाही. रीता ताई आणि रिमाताई दोघीही याच शहरात असल्याने प्रत्येक सणाला त्यांना सहकुटुंब जेवणाचं आमंत्रण असायचं आणि माझी मात्र त्यामागे फार दमछाक व्हायची, पण मी त्याबद्दल कधी कुरकुर केली नाही.”
“बाळंतपणानंतरच म्हणाल तर तुम्हाला तर माहितीच आहे की छकुलीच्या वेळी सिजर करताना मला किती कॉम्प्लिकेशन्स होती. छकुलीची तब्येतही तोळा मासाच होती, तिच्या औषधाच्या वेळा चुकवून चालणार नव्हत्या. माझ्या बाळाकडे लक्ष देता यावं, म्हणून मी केवळ एक दोनदा कामात जरा दिरंगाई केली तर आईंनी त्याचा एवढा कांगावा केला. पण खरंच सांगते मावशी मला हे सगळं मनापासून शिकायचं होतं आणि आहे.”
रमाची बाजू ऐकून सुमु मावशीला तिच्याबद्दल अनुकंपा वाटली आणि नीता ताईंनाही आपण कुठे चुकत होतो हे कळलं. त्याच क्षणी नीताताईंनी मनाशी निश्चय केला आणि रमाला महालक्ष्मीच्या फुलोऱ्यासाठी मदतीला बोलावलं, दुसऱ्या दिवशी तिच्याकडून महालक्ष्मीची ओटी भरून घेतली. नीताताईंनी रमाला जसं जमेल तसं सगळं समजावून सांगितलं. आता दरवर्षी दोघी सासु-सुन महालक्ष्मी यांचं सगळं आवडीने करतात आणि जसं जमेल तसं रिता रीमा त्यांच्या मदतीला येतात.
©® राखी भावसार भांडेकर. नागपूर
सदर कथा हि संपूर्णतः काल्पनिक असून या कथेतील घटनांचा आणि पात्रांचा वास्तवात कुणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा, तसेच ही कथा राखी भावसार भांडेकर यांची असून प्रकाशनाचे सर्व हक्क लेखीकेकडे राखीव आहे. या कथेचे व्हिडिओ बनवण्यास परवानगी नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा