मागील भागात आपण पाहिलं कि राधा चा ताप वाढल्यामुळे अनुश्री वंदना काकी कडे काढा बनवून घेण्यासाठी जाते, तर इकडे सुरेश ला कोण तरी भेटून त्याची योजना सांगतो आता पाहूया पुढे...,
तो तसाच हालत डुलत घरी गेला जिथे राधा झोपली होती शांत पणे तिथे तिच्या उशाशी जाऊन बसला आणि तिला हलवून म्हणाला....,
"ऐकलस का राधे, आता आपल्याकड बी भरपूर पैका येणार बघ ..तवा तुला नाचाया जायची गरज पण न्हाय राहिली बग....."
“म्हंजी …? आजपरत तू एक रुपया बी न्हाय कमावलास न आता काय तुला डाबोरा गावलाय का ? जे हलवलं कि बदाबदा पैसे पडतील “
राधा त्याला वैताकून म्हणाली तो दारू पिऊन आला कि तिला खूप त्रास द्यायचा हे तिला ठाऊक होत म्हणून आता तिने शांत बसून घेतलं होत
" लाटरी लागली बग लातरी ....आनी कुठं गेली ..तिच्याच पायगुणा मुळं आपण सगळे जण आता बसून खाऊ ..."
तो इकडे तिकडे पाहत अनुश्री ला शोधत म्हणाला...
"माज्या पोरी ला मी नाचाया धारणार न्हाय कितींदा सांगू तुला ...जा इथून दारूचा भपकारा येतोय मला ..."
राधा त्याला तिथून ढकलत म्हणाली ...
"अग ऐक तरी आधी ...आनी ला च काय पर तुला बी नाचया लागणार न्हय ..."
तो खुशीत म्हणाला..
"मंग काय तू नाचणार व्हय .."
राधा हसून म्हणाली
"तस नव्ह ग.. ते मगाशी म्हणलंस ना घबाड गावलंय का तर तू तसंच समज....."
तो मागे भिंतीला टेकून बोलला.
"नीट मला समजेल असं बोल न्ह्यातर मुरडाच बसवीण म्या तुजा .."
बोलायला जड जात असून सुद्धा ती त्याला रागात बोललीच.
"सांगतु सांगतु ...आताच एक शेट मला भेटला ..त्याला आपली आनी फार आवडली बघ ...तो तिचा चिरा उतरवायचा म्हणतोय ..."
एवढं ऐकलं आणि राधा ने त्याची मानगुटी च पकडली आणि ..जोरात खेसकून ती त्याच्यावर ओरडली
"मेल्या , मुर्दा बसविला तुझा तर......
माज्या पोरी बद्दल तू काय बी ठरवायचं न्हाय हे कितींदा सांगू तुला .."
"अग पण ह्यात तीच बी भालचं हाय ना ...एका जवळच कायम राहील ना ...तिच्या पोरास्नी नाव बी मिळालं बा च ...तुज्यासारखा वनवास न्हाय यायचा ...अन आपला तिघांचा बी वनवास सम्पल ...."
सुरेश राधा ला समजावत होता., पण ती अजिबात ऐकायला तयार नव्हती.
"अज्याबात चालणार न्हाय ...माजी पोरगी खूप शिकल, तिच्या पायावर उभी राहील मग म्या तीच लगिन लावून देईन ..ते बी धुमधडाक्यात..... असं लगीन कुणा बी नाचणारीच्या मुलीचं झालं नसलं........"
राधा ठाम पणे म्हणाली...
"हे बग राधे, तुला बी चांगलंच ठाव हाय ..नाचणारीच्या पोरींची लगीन होत नसतात....तरी म्या तिला जबरदस्ती नाचाया धाडलं न्हाय म्हणून ...न्ह्यातर ती बी तुज्यावानी नाचत असती, हे तू बी इसरू नगोस........"
तिला ढकलून देत सुरेश तिथून भेळकांड्या खात उठला ..त्याने धक्का दिल्या मुळे आणि अंगात आधीच ताकत नव्हती म्हणून राधा जमिनीवर पडली तरी देखील उसण अवसान आणून ती घराच्या बाहेर जाणाऱ्या सुरेश कडे पाहून ओरडलीच
"तू जा र मेल्या माज्या पोरीला कसा नाचवतोस ते म्या बघतेच ..."
"असं... मग बग तू पुढल्याच आठवड्यात त्या शेट ला घिऊन येतो म्या ..अन तवा तू बी काय नाय करू शकत .."
असं म्हणून तो तवाऱ्या देत तिथून निघून गेला आणि इकडे राधा डोक्याला हात लावून रडत बसली
"मला आता कायबी करून पुढल्या दोन दिवसात अनु ला इथून घालवून द्यावं लागलं ..काय बी झालं तरी......"
राधा आपल्या मानतच योजना आखत होती कि तेवढ्यात अनुश्री तिथे आली ...तिला असं तिथे डोक्याला हात लावलेले बसलेले पाहून ती धावतच तिच्या जवळ गेली ...,
"आई आग काय हे मी तुला सांगितलं होत ना आराम कर असं उठून का बसली आहेस ?"
"अग असच ..आपली पडून नुसता वैताग आला म्हंटल बसावं ..न गणू कुठे राहिला अजून आला नाय तो .."
मुद्दाम विषय बदलवत आपल्या मनातील दुःख लपवत ती म्हणाली ...
"ठीक आहे पण आता पड...मी तुला लेप लावून देते . अन गणू येईलच एवढ्यात त्याला मी तुझ्यासाठी बकरीचा दूध आणायला पाठवलं आहे .."
असं म्हणून तिने आईच्या हाताला पकडून तिला तिच्या बिछान्यावर नेऊन झोपवलं व तिच्या पायाला हाताला व कपाळाला तो लेपलवुन दिला .
तेवढ्यात गणू तिचा धाकटा भाऊ दूध घेऊन आला ...
"तायडे ....अग ये तायडे हे घे दूध ..."
तस त्याच्या कडून तिने दूध घेतलं पण ते घेत असताना तीच लक्ष त्याच्या कपाळाकडे गेलं ..तिथे काहीतरी लागून रक्त येत होत..
तिने लगबगीने पटकन ते दुधाचं भांडे बाजूला ठेवून दिल व त्याच्या जवळ गेली ...
"गणू अरे काय हे ..हे कस काय लागलं .."
"काय नाय ताई ..ते वरच्या वालीच्या बाब्याला माझी खोड काढायची जाम सवय हाय त्याने नाचणारीचा मुलगा म्हणून मला चिडवलं ...तेव्हा मी मारायला धावलो पण त्याच्या सोबत अजून मुलं बी आली...दूध हातात होत म्हणून म्या पाळायला लागलो तर त्यातल्या एकाने मला दगड मारली ..पण मी दूध नाही सांडलं ..."
गणू निरागसपणे म्हणाला, तशी गलबलून अनुश्री त्याला बिलगली. आजपर्यत शाळेत ह्यावरून तिला देखील खूप हिनवले जायचं पण ती दुर्लक्ष करायची. दुसरा पर्याय पण नव्हता म्हणायचा तिच्याकडे ..तिने पटकन त्याला खाली बसवलं आणि हळद तिथे चोळली ..तिच्या डोळ्यात पाणी आलं होत ..
"गणू , हे बघ त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं ..कोणाला काही ही बोलू दे आपण मात्र त्यात पडायचं नाही ...आलं ना लक्षात...."
तस छोट्या गणू ने होकारात मान हलवली ...तो त्याच्या ताई च सगळं ऐकायचा... आई पेक्षा जास्त होती ती त्याच्यासाठी... आई नाचायला फाडावर जायची तेव्हा तिनेच त्याला सांभाळलं होत.. ती त्याची आई च होती...
"बर.....मी दूध गरम करून देते ते....थोडं तू पी आणि थोडं आई ला दे ..जा आता तिकडे बस .."
तस गणू आई जवळ गेला तर इकडे अनुश्री ने चूल पेटवली व टोपाला राखडीचा बुंधाला घेऊन त्यात दूध गरम करत ठेवलं .
मनातच ती विचार करत होती ..
आपण पण माणूस आहोत ना मग फक्त माझी आई ते काम करते म्हणून आमची किंमत का म्हणून कमी व्हावी ..आई म्हणते त्याप्रमाणे मी खूप शिकेन एक चांगली डॉक्टर होईल आणि आई व गणू च आयुष्य सावरणं ...कारण त्यांच्या समाजात नाचणारीच्या कित्येक मुलांना ना बापाचा सहारा मिळतो ना आईचा ..कारण बाप तर नावापुरता असतो ..तो फक्त त्या बाईने कमावलेल्या पैशा वर मज्जा करण्यासाठी असतो आणि त्या बाई ला आपलं बाळ कुणाकडे तरी ठेऊन आपल्या फाटक्या संसाराला असणारे ठिगळे लावून घेण्यासाठी तिला गावोगावी नाचत फिरावे लागायचे ..तिच्या मुलांना कमी लेखलं जायचं म्हणून राधा ने आधीपासून ह्यात अनुश्री ला कधीच ओढलं नव्हतं कारण पिढ्यानपिढ्या हेच चालू राहावं असं तिला बिलकुल वाटत नव्हतं अनुश्री ला देखील तिने तेच संस्कार दिले
अनुश्री चा चिरा उतरवला जाईल का... चिरा म्हणजे काय पुढे समजेलच...... त्यासाठी नुसतं वाचू नका प्लीज... समीक्षा पण द्या... लिहिण्याचा हुरूप वाढतो.....
क्रमश
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा