Login

तूही सून होतीस

गोष्ट सुनेची
"प्रतिक, मला घरी यायचंय." सुलभा ताई गदगदत्या स्वरात म्हणाल्या.

"का? काय झालं? तिथं करमत नाहीय का?" प्रतिक.

"तसं नाही. पण घरची, तुझी खूप आठवण येतेय."
पुढचे काही क्षण शांततेत गेले.

"आई, कधी येऊ न्यायला?" प्रतिक उत्साहाने म्हणाला. हे ऐकून ताईंना बरं वाटलं.

"उद्या येशील? मी सामान आवरून ठेवेन." असं म्हणत सुलभा ताईंनी फोन ठेवला.
'आपण घरी जायचं म्हणतोय. पण जान्हवी येऊ देईल का?' त्यांच्या मनातली चलबिचल वाढली. 'तिनेच आपल्या घरावर, मुलावर अतिक्रमण केलं. आपले हक्क हिरावून घेतले. ती सून म्हणून आली तशी आपली विचारसरणी पार बिघडून गेली.' त्या जुन्या आठवणी उगाळत राहिल्या.

मनातल्या मनात सुलभा ताई आपल्या सुनेला दोष देऊ लागल्या. तीन महिन्यांपूर्वी ताई वृद्धाश्रमात राहायला आल्या होत्या. पहिल्यांदा इथलं निसर्गरम्य वातावरण छान वाटलं. त्यांच्या वयाचे सोबती बरेच पाहून मनाला दिलासा मिळाला. त्यातल्या काही मैत्रिणी झाल्या. जुन्या ओळखी गवसल्या. पण 'नव्याचे नऊ दिवस ' या म्हणीप्रमाणे लवकरच ताईंना या सगळ्याचा कंटाळा आला. घरची, मुलाची, नातवंडांची आठवण यायला लागली.

म्हंटल्याप्रमाणे प्रतिक सकाळी लवकर हजर झाला. काही फॉर्म्यालिटीज पूर्ण करून तो आईला घरी घेऊन आला. आजीला बघितल्यावर नातवंडं त्यांना चिकटली.

"किती दिवस राहणार आहेत या?" जान्हवीची कुजबूज त्यांना ऐकायला आलीच.
"मला माहित नाही आणि कायमची राहिली तर काय हरकत आहे?" प्रतिक मोठ्याने म्हणाला. तसे जान्हवीने खांदे उडवले.

जेवणाची वेळ झाली होती. ताई स्वयंपाक घरात डोकावल्या. पाहतात तर तिथला सगळा माहौलच बदलून गेला होता. सारं नव्या पद्धतीनुसार सजवलं होतं.
"आई, या. ताट तयार आहे." जान्हवीने आपलं सोडून सगळ्यांची पानं मांडली होती. आजचा स्वयंपाक सुलभा ताईंच्या आवडीचा होता.

"प्रतिक, ये रे." सवयीनुसार त्यांनी मुलाला हाक मारली.

'अजूनही यांची सवय गेली नाही!' सुनेने दुर्लक्ष केलं.

स्वयंपाक तर छान झाला होता. पण तोंडावर कौतुक करायची सवय नसल्याने ताई काही न बोलता मनसोक्त जेवल्या.

काही वेळाने आपल्या खोलीत आल्या. त्यांची खोली मात्र जशीच्या तशी होती. "आजी, आई रोज आवरून ठेवते ही खोली." नातवंडं आजीला बिलगून झोपी गेली. पण ताईंना झोप लागेना.

"आई घरी आली म्हणून तुला काय प्रोब्लेम आहे?" प्रतिक जेवणाऱ्या जान्हवीला विचारत होता.

"नाही रे. हे त्यांचंच घर आहे. मला कशाला काय वाटेल?" ती शांतपणे जेवत होती.

"मग मगाशी असं का विचारलंस?" तो रागाने म्हणाला.

"सहजच विचारलं. तू विसरलास का? आई स्वतःच्या मर्जीने वृद्धाश्रमात राहायला गेल्या होत्या. मी जा म्हणून सांगितलं नव्हतं त्यांना."

"हो. पण आई तुझ्यामुळेच गेली होती ना?"

"असं कोण म्हणालं?" जान्हवीच्या कपाळावर आठ्या पडल्या.

"आपले सगळे नातेवाईक तसंच बोलतात." प्रतिक हळूच म्हणाला.

"हो? तुझ्या नातेवाईकांना हे माहितीय का? आई माझ्याशी कशा वागत होत्या ते?" ती तुटकपणे म्हणाली.

"हेच मी उलट म्हणू शकतो. मी स्वतः ऐकलंय. आई इतरांना फोनवरून तुझ्याबद्दल काय सांगायची ते!" प्रतिक तोऱ्यात म्हणाला.

"नुसतं ऐकून पटलं तुला? कधी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहेस?" यावर प्रतिक काहीच बोलला नाही.
" मी केलेला स्वयंपाक चांगला झाला तरी त्यात कायम कमी राहतच होती. मी तुमच्या सोबत जेवायला बसलेलं आईंना कधीच आवडलं नाही. बघ, आजही मला तिच सवय लागलीय. त्या फोनवर बोलायच्या, एका आईला मी मुलापासून वेगळं केलंय म्हणून. तुला तसा अनुभव कधी आला? उलट आजही तू माझ्यापेक्षा आईंच्या जास्त क्लोज आहेस." जान्हवीचे डोळे भरून आले. शेवटचं वाक्य प्रतिकला मनापासून पटलं.

"आजारपणात सेवा केली तेव्हा चांगलं वागायच्या. पण जशा त्या बऱ्या झाल्या तसं सगळं तंत्र पुन्हा बिघडलं. मी ज्या गोष्टी केल्याच नाहीत त्या इतरांना रंगवून सांगितल्या गेल्या. जणू त्यांच्या हातातून मी घरचा सगळा कारभार काढून घेतला! असा आव आणला त्यांनी. नातवंडं चालतात, पण सून नको. का? तर तिचे विचार पटत नाहीत म्हणून तिच्याशी अंतर राखून वागायचं. आजवर कधी मी तुझ्याकडे आईंच्या तक्रारी केलेल्या आठवतात का? त्याचं माझ्याबद्दल तुझ्या मनात काहीबाही भरवत राहिल्या."
प्रतिकला हेही पटलं.

सुलभा ताईंना आत सगळं ऐकू येत होतं. पण त्या पडून राहिल्या.
"हे सगळे त्यांच्या मनाचे खेळ होते. माझ्यावर खापर फुटावं म्हणून त्या आश्रमात राहायला गेल्या. तिथं त्यांना करमत नसणार म्हणून त्या घरी आल्यात."

"हो. कारण या घरावर तुझं अधिराज्य नको होतं मला. इतके दिवस मी जपलेलं 'घरपण 'तुझ्या हातात देताना मला यातना होत होत्या. परक्या घरातून आलेली तू..तुझ्यावर विश्वास ठेवणं कठीण जात होतं आणि माझा मुलगा नवरा म्हणून तुला सोपवणं सहन होत नव्हतं ग. एक लक्षात ठेव, माझ्या घरात मी कधीही येईन अन् कधीही जाईन." सुलभा ताई जोरजोरात बोलत होत्या.

"आई.. काय बोलतेस हे?" प्रतिकला आश्चर्य वाटलं. "सून नको होती तर माझं लग्न कशाला केलंस? आणि सून आणलीस ती तुझ्याच पसंतीची आणलीस ना? एकमेकांचे विचार पटत नाहीत म्हणून कोणी असं वागत नाही. तू सुद्धा एकेकाळी सुनच होतीस ना? आजी तुझ्याशी अशी वागलेली आठवते का बघ. खरंतर जान्हवी केवळ नावालाच सून म्हणून या घरात आली. तू तिला एक्सेप्ट केलंच नाहीस. तिच्याशी बरोबरी मात्र केलीस." तो चिडून म्हणाला.
"आई, हे तुझं घर आहे? खरचं तू या घराला आपलं मानलं असतंस तर अशी वागलीच नसतीस."

जान्हवीला जेवायची इच्छा होईना. ती हात धुवून उठली.
"सॉरी." प्रतिक पुढं होत म्हणाला. "तू आजवर या घरासाठी खूप काही केलंस, हे दिसत असूनही मी त्याकडे दुर्लक्ष केलं. कारण तुझ्याविषयी बऱ्याच नकारात्मक बाजू मी ऐकल्या होत्या."

"म्हणजे बायको म्हणून तुझा माझ्यावर विश्वास नव्हता. नात्यात काय महत्त्वाचं असतं रे? एकमेकांच्या चुका, वागणं केव्हा समजून घेतलं जातं? जेव्हा एकमेकांवर विश्वास असतो तेव्हाच ना? तू फक्त आईंचं ऐकत आलास. कारण त्या खोटं बोलणार नाहीत हे तुला माहिती होतं. पण त्याचबरोबर मी कशी आहे हे इतक्या वर्षांच्या अनुभवावरून तुला कळलं नाही हेच माझं दुर्दैव आहे." जान्हवी आत निघून गेली.

आता कुठं राहायचं हा निर्णय प्रतिकने सर्वस्वी ताईंवर सोपवला. त्याने ठरवलं, इथून पुढं इतरांच्या बोलण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही. बायकोची साथ द्यायची. तिच्या चुकांचं प्रदर्शन मांडायच नाही. तिला भावनिक, मानसिक आधार द्यायचा.
प्रतिकला हा निर्णय घ्यायला उशीर झाला असला तरी वेळ अजून गेली नव्हती. घराला घरपण कधी येतं? जेव्हा घरची लक्ष्मी समाधानी, खुश असते तेव्हाच ना? म्हणतातघरची स्त्री आनंदी असेल तर घराच्या भिंतीही हसतात म्हणे!

तुमचे अनुभव शेअर करायला विसरू नका.


समाप्त.
©️®️ सायली जोशी.
0