Login

खरं थोरलेपण! भाग ३ (अंतिम भाग)

थोरलेपण म्हणजे फक्त वयाने नाही तर मनानेही मोठे असणे.
" तुम्हाला एक मुलगी इकडे घेऊन आली होती. खरतर तिने वेळेवर तुम्हाला इकडे आणल्यामुळे तुमचे प्राण वाचले. " डॉक्टरांनी त्याला सांगितले.

आत्ता पुढें,

" कोण होती ती मुलगी ? " अभय विचारात पडला. डॉक्टरांकडून त्याला तिचे नाव आणि मोबाईल नंबर मिळाला. त्यावरून अभयने तिला शोधले.

“तू माझं आयुष्य वाचवलंस. माझ्यावर खूप मोठा उपकार केलास त्या बदल्यात तुला काय पाहिजे असेल तर नक्की सांगा. ” अभयने कृतकृत्यपणे तिला विचारले.


“मला काही नको. फक्त एवढं करा ज्या मुलांसाठी मी शिकवते त्यांच्यासाठी थोडंफार काहीतरी मदत करा.” तान्या शांतपणे त्याच्याकडे पाहून त्याला म्हणाली. तिचं बोलणं ऐकून अभय चकित होऊन तिच्याकडे पाहू लागला.

" तू स्वतःसाठी ही खूप काही मागू शकतेस. तुझ्या ठिकाणी राहते ते पाहून तुझी परिस्थिती ही ठीक वाटते. तुझ्यासाठीही मी पैशाची मदत करू शकतो. " अभय शांतपणे तिच्या नजरेत पहात म्हणाला.

“नाही साहेब, मी मदत केली कारण मला ती करायची होती. बदल्यात काही मिळवायचं नव्हतं.” तान्याने त्याच्याकडे पाहून उत्तर दिले.

तो दिवस अभयच्या आयुष्याचा वळण ठरला.
त्याने त्या शिकवणी प्रकल्पाला निधी दिला आणि तान्याला तिथेच कायमस्वरूपी शिक्षिका म्हणून नेमलं.

काही वर्षांनी तान्या प्रकल्पाची प्रमुख झाली. तिच्या शिकवणीतील मुलं आज मोठ्या पदांवर होती.
एका दिवशी शाळेत पुरस्कार सोहळा होता.

सागर तोच मुलगा जो एका गरीब कामगाराचा मुलगा होता तो शिकून आज इंजिनियर झाला होता. त्याने एका चांगल्या पदाची नोकरीही मिळवली होती. सागर ही तिकडे पुरस्कार सोहळ्यासाठी आला.

“मला आज जे काही मिळालं, ते एका अश्या स्त्रीमुळे जी मला कधीही कमी समजली नाही. तिने मला शिकवलं की, थोरलेपण जन्माने येत नाही, ते कृतीने मिळतं.” सागर मंचावर उभा राहून आपल्या लाडक्या शिक्षिकेकडे म्हणजेच तान्या मॅडम कडे पाहून सगळ्यांना सांगत होता.

सगळे टाळ्यांचा कडकडाट करत होते. तान्या मागच्या रांगेत उभी होती, तिच्या डोळ्यांत पाणी आलं.

तेवढ्यात अभय देशमुखही आले.
“तान्या, आज मला समजलं, थोरपण पैसा नव्हे… तुझ्यासारखं मन असणं म्हणजे थोरलेपण.”


“साहेब, थोरले पण हे पद नाही, ते निर्णय असतो जेव्हा आपण कोणाला खाली न बघता वर उचलतो, तेव्हा ते थोरपण असतं.” तान्या ने हसून उत्तर दिले. तिच्या डोळ्यातले अश्रू जणू मोत्यांप्रमाणे चमकत होते.

एक दिवशी शिकवणी केंद्रात तान्या तिच्या छोट्या मुलांना शिकवत असताना एका विद्यार्थिनीने विचारलं
“मॅडम, तुम्ही कधी श्रीमंत व्हायचं विचार केला नाही का ?”


“हो विचार केला होता. पण नंतर लक्षात आलं, श्रीमंती म्हणजे फक्त पैशात नाही, तर मनात असते. जेव्हा आपण दुसऱ्याच्या डोळ्यातून अश्रू पुसतो ना, तेव्हा आपण सर्वात श्रीमंत आणि थोर होतो.” तानी आणि हसून तिच्याकडे पाहत तिला उत्तर दिले.

संपूर्ण वर्ग शांत झाला.
बाहेर पुन्हा पाऊस सुरू झाला होता.

तान्याने खिडकीकडे पाहिलं.
त्या रिमझिम पावसात तिच्या ओठांवर हलकं हसू होतं आयुष्याने तिला थोर बनवलं होतं, पदाने नाही तर मनाने. तिला त्या दिवशी राजेंद्र सरांनी फळ्यावर लिहिलेलं वाक्य पुन्हा आठवलं.

“थोरलेपण म्हणजे मनाने मोठं असणं.”

तान्याचं आयुष्य त्या वाक्याचं जागतं उदाहरण होतं.
ती ना श्रीमंत झाली, ना प्रसिद्ध; पण तिच्या स्पर्शाने अनेकांच्या आयुष्यात प्रकाश पडला.

थोरलेपण म्हणजे काय, हे शिकवण्यासाठी शब्दांची गरज नाही.
एखाद्या क्षणी आपण स्वतःला बाजूला ठेवून इतरांसाठी उभं राहतो, तेव्हा मनाच्या खोलात जन्म घेतो एक अदृश्य प्रकाश तीच खरी माणसाची श्रीमंती आणिआणि तेच खरं थोरलेपण.