Login

दुरून डोंगर साजरे... भाग ३

दुरून डोंगर साजरे वाटतात पण स्वप्न मात्र त्या डोंगरापलीकडे असतात. जे चढतात, तेच जग बदलतात.
" देवा! माझ्या मुलाचं भवितव्य आता तुझ्या हाती आहे. त्याच्या मेहनतीला यश दे... " आदित्यची आई देवापुढे दिवा लावत हात जोडत म्हणाली.

आत्ता पुढें,

दुसऱ्या दिवशी निकाल लागला. आदित्यच्या नावासमोर लिहिलं होतं

"निवड झाली".

गावाचं साहेबदार मंडपात रुपांतर झालं. लोकांनी उचलून धरलं. ढोल वाजले.
मॅडमने त्याला मिठी मारली,
“हे फक्त तुझं यश नाही. हे गावाचं यश आहे.”

वैद्यकीय शिक्षण सुरू झालं. शहर मोठं, पद्धती वेगळ्या, भाषा वेगळी, मित्र नवीन. आधी बरेच दिवस तो गप्पच बसायचा.
कधी कधी त्याच्या गावाच्या आठवणी डोळ्यात पाणी आणायच्या डोंगर, मातकट रस्ते, आईचा तांदळाचा डबा, वडिलांचा थकलेला चेहरा.
पण रोज सकाळी एकच वाक्य त्याच्या मनात घुमायचं—
“दुरून डोंगर साजरे वाटतात… पण जे चढतात तेच शिखरावरून जगाला पाहू शकतात.”

एक दिवस त्यांच्या वर्गामध्ये चर्चा चालू होती. त्यांच्या वर्गातल्या प्राध्यापकांनी सगळ्या विद्यार्थ्यांना विचारलं ,

“एमबीबीबीएसनंतर तुमचे प्लॅन काय?”

तिकडे बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळी उत्तर दिले. कुणाला परदेशात जाऊन आपला पुढचा शिक्षण पूर्ण करायचं होतं, तर कुणाला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काम करायचे होते, कोणाला मोठ्या पगाराची नोकरी पाहिजे होती, असे सगळ्यांचे वेगवेगळे विचार सांगायचे चालू होते आदित्य मात्र त्या सगळ्यांमध्ये शांत बसला होता.

वर्गातल्या प्राध्यापकांची नजर त्याच्यावर पडली आणि त्याला असे शांत बसलेले पाहून तेच जागेवरून उभे राहत त्याच्या जवळ येतात त्याला म्हणाले,

" तू? तू पुढे जाऊन काय करण्याचा विचार केला आहे ? या सगळ्यांप्रमाणे तुझे ही काही स्वप्न असेल ना ? "

" शिक्षण पूर्ण करून मी माझ्या गावात जाणार आहे. तिकडे एकही डॉक्टर नाही. माझ्या गावातल्या लोकांना माझी गरज आहे. तिकडे जाऊन मी माझ्या गावातील लोकांची सेवा करणार. त्यांच्यासाठी दवाखाना काढणार. " आदित्य ने हसून उत्तर दिले.

त्याचे उत्तर ऐकून प्राध्यापक शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिले,  सगळ्या वर्गात शांतता पसरली.

" अरे, तिकडे त्या छोट्याशा गावामध्ये काय भविष्य आहे ? तिकडे तर तुला पुरेसा पगारही मिळणार नाही! तू शिक्षणामध्ये हुशार आहेस. तुला तर परदेशातही चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. " त्याच्या वर्गातल्या एका मुलाने त्याच्याकडे पाहून त्याला सांगितले.

" एक डॉक्टर हा त्याला मिळणाऱ्या पगाराने मोठा होत नाही तर तो त्यांनी केलेल्या उपचाराने मोठा होतो. " आदित्य शांतपणे त्याच्याकडे पाहून म्हणाला.

आदित्यने आपल्या आयुष्यात सात वर्षाचा लांब असा संघर्ष केला. अभ्यास , इंटर्नशिप, सराव, रात्रभर ड्युटी, कधी उपाशी पोट कधी पैशाची चिंता. या सगळ्या मधूनही आदित्यने कधीही हार मानली नाही. फायनली त्याच्या हातामध्ये लाल अक्षरात लिहिलेली पदवी आली.

“डॉ. आदित्य पांडुरंग पाटील.”

गावातल्या पहिल्या डॉक्टरासाठी लोकांची गर्दी जमली. आदित्य ने आपल्या गावाला यांच्या मदतीने आपल्या गावामध्ये त्याच्या शाळेच्या जवळच असलेल्या काही रिकाम्या खोल्या रंगवल्या , एका खोलीमध्ये टेबल-खुर्ची आणली, दुसऱ्या खोलीमध्ये काही बेड लावले. छोटंसं पण गावासाठी भिलवाडीचा पहिलं दवाखाना उघडला गेला.

पहिल्याच दिवशी त्यात दवाखान्यांमध्ये एक वयोवृद्ध आजी आली. आदित्यने त्यांना तपासले त्यांचे आजाराबद्दल विचारले.

“बाळा, औषध किती पैसे?” त्या वृद्ध आजीने त्याला विचारले.

आदित्यने तिच्या हातावर औषध ठेवलं.
“तुमची तब्येत ठीक व्हायला हवी. पैसे नंतर बघू.”

लोकांच्या डोळ्यात विश्वास परत जागा झाला.
ज्या गावात सामान्य तापावरही लोक मरायचे, तिथं उपचार, औषधं, मदत सगळं मिळू लागली.

काही महिन्यांनी गावावर संकट आलं. पावसाळ्यात साथीचा ताप पसरला. लोकांमध्ये भीती जमा झाली . शहर खूप दूर होते, पावसामुळे रस्ते बंद झाले होते त्यामुळे मदतही लवकर येत नव्हती.