Login

दुरून डोंगर साजरे... भाग ४(अंतिम भाग)

दुरून डोंगर साजरे वाटतात पण स्वप्नात मात्र त्या डोंगरापलीकडे असतात. जे चढतात, तेच जग बदलतात.
काही महिन्यांनी गावावर संकट आलं. पावसाळ्यात साथीचा ताप पसरला. लोकांमध्ये भीती जमा झाली . शहर खूप दूर होते, पावसामुळे रस्ते बंद झाले होते त्यामुळे मदतही लवकर येत नव्हती.


आत्ता पुढें,


आदित्यने संपूर्ण गावासाठी दवाखाना २४ तास उघडा ठेवला. दिवसभर इंजेक्शन्स, तपासणी, औषधं, आणि रात्री गावोगाव जाऊन लोकांना सांभाळणं.

एकदा रात्री स्मिता मॅडम दवाखान्यात आली.

“तू इतका थकूनही काम करत राहतोस… भीती वाटत नाही?”

आदित्यने थकलेल्या आवाजात उत्तर दिलं,
“माझ्या गावाला माझी भीती नको, माझा आधार हवा.”

काही दिवसांत गाव पुन्हा स्वस्थ झालं. लोक वाचले. लोकांच्या चेहऱ्यावर परत हास्य आलं.


गावातील मुलांना आता डॉक्टर दिसायचा मोठ्या शहरातला नाही, त्यांच्या मधलं एक. ते म्हणायचे,
“मी पण डॉक्टर होणार… मी इंजिनिअर होणार… मी शिक्षक होणार.”
गावात पहिल्यांदा लोकांनी स्वप्न पाहायला सुरुवात केली.

पण जीवनात प्रत्येक डोंगरानंतर दुसरा डोंगर उभा असतो.
एक संध्याकाळी दवाखाना भरलेला होता. काम संपवून आदित्य घरी निघणार तेवढ्यात त्याच्या वडिलांनी फोन केला,

“बाळा… आईची तब्येत बिघडली आहे.”

तो घाईघाईनं घरी पोहोचला. आईचा श्वास फुललेला, चेहरा फिकट.
आदित्याचं हृदय दडलं.
त्याने आईला उचललं, सलाईन लावली, इंजेक्शन्स दिले. गावकरी बाहेर उभे शांत, घाबरलेले.स्मिता मॅडमही आली.
रात्रीभर तिने आणि आदित्यने आईची सेवा केली.

पुढचा दिवस उजाडला. आईने डोळे उघडले.
तिने हात पुढे करून मुलाचा चेहरा स्पर्श केला.
“माझा डॉक्टर… माझा आदित्य…”

आदित्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि चेहऱ्यावर हलकसं स्मित.
आई हसून म्हणाली,
“दुरून डोंगर साजरे… पण तू तर त्या डोंगरापलीकडचं जग बघून आलास.”

काही महिन्यांनी सरकारी अधिकारी गावात आले.
दवाखान्याचं निरीक्षण, आदित्यचं काम, लोकांच्या प्रतिक्रिया सगळं इतकं जबरदस्त होतं की सरकारने भिलवाडीत मोठं प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याची घोषणा केली.
त्यातील मुख्य डॉक्टर

" डॉ. आदित्य पाटील. "

उद्घाटनाच्या दिवशी गावात उत्सवाचे वातावरण होते. लोक, अधिकारी, मॅडम, पत्रकार सगळे जमले होते.
पत्रकारांनी आदित्यला विचारलं,

“तरुण डॉक्टर शहरात जाऊन पैसा कमावतात. तुम्ही इथे का राहिलात?”

आदित्यने शांतपणे उत्तर दिलं,
“कारण दुरून डोंगर साजरे दिसतात. पण जे लोक त्या डोंगराच्या पलीकडे राहतात, त्यांचे आयुष्य सुंदर करणे हीच खरी उंची आहे.”

गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं.
एक वृद्ध म्हणाला,

“हा आमचा मुलगा शहरात गेला नाही, तर शहर आमच्या गावात घेऊन आला!”

आदित्यची चित्त पाहून अजून काही मुलं आपले शिक्षण पूर्ण करून गावासाठी उभी राहिले काही वर्षांनी भिलवाडी गाव बदलून गेलं. गावामध्ये मोठा दवाखाना होता, चांगले रस्ते होते, मुलांसाठी नवीन शाळा उभारल्या गेल्या, पाणी स्वच्छता योजना अशा अनेक योजना त्या गावांमध्ये येत होत्या. गावात मुलांच्या अभ्यासासाठी एक मोठं ग्रंथालयही उभारण्यात आलं.

आदित्य रोज सकाळी त्याच डोंगराकडे बघायचा.
पूर्वी ते डोंगर त्याला अडथळ्यासारखे वाटायचे, पण आता तेच त्याच्या प्रवासाचा पुरावा झाले होते.

एकदा तो शाळेत गेला.  त्याच्या शाळेमध्ये पुरस्कार सोहळा होता आणि त्या सोहळ्यासाठी आदित्यला बोलावण्यात आले होते. शाळेने एक नवीन पुरस्कार विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला होता.

“डॉ. आदित्य पाटील प्रेरणा पुरस्कार”
म्हणजे त्या विद्यार्थ्यांना ज्यांनी संघर्षातून शिक्षण पूर्ण केलं.

हे सगळं पाहून आदित्यचे मन भरून आले. त्याने मंचावर उभा राहून जमलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांकडे पाहून त्यांना सांगितलं,

“माझ्या आयुष्याने एकच गोष्ट शिकवली दुरून डोंगर साजरे वाटतात. पण स्वप्नं मात्र त्या डोंगरापलीकडे असतात. जे चढतात, तेच जग बदलतात.”

गाव टाळ्यांनी दुमदुमलं.

त्या क्षणी आदित्यने डोळे मिटले, मनात आई-वडिलांचे चेहरे, मॅडमचा आधार, गावकऱ्यांचा विश्वास
आणि त्याला कळून गेलं…
जगात सर्वांत सुंदर दृश्य म्हणजे आपण चढून गाठलेलं शिखर… आणि त्या शिखरावर उभ राहून स्वतःच्या गावाला उजळताना पाहणं.