विजय 3

दुसरं लग्न
चेतनाने तिच्या होणाऱ्या नवऱ्याकडे विषय काढला, हे त्यांचं पहिलंच संभाषण होतं..

"तुमच्या दोन्ही मुलांना मी आईची कमी भासू देणार नाही.."

हे बोलताच नवऱ्या मुलाच्या चेहऱ्यावर हास्य फुललं..

"आणि तुम्हीही माझ्या मुलाला वडिलांचं प्रेम द्याल ही अपेक्षा.."

हे बोलताच तो उठून उभा राहिला...

गुरुजी आले, ते आत प्रवेश करत होते..नवरामुलगा म्हणाला..

"पण तुमच्या घरच्यांनी तर..."

"काय?"

"त्यांनी सांगितलं की लग्नानंतर ते रोहनला त्यांच्याजवळ ठेवणार आहेत आणि त्यांना माझ्या मुलांमध्ये स्थान नसेल..याच बोलीवर तर लग्नाला होकार दिलाय आम्ही."

हे ऐकताच तिच्या पायाखालची जमीन सरकली..आई वडिलांनी तिच्या मुलाला तिच्यापासून दूर करण्याचा डाव रचला आणि तिला कळलंही नव्हतं..आई वडिलांना आपलं इतकं ओझं झालं की त्यांनी माझ्या मातृत्वाचीही किंमत केली नाही?

चेतनाने हातातील शाल भिरकावली आणि भर मंडपात तिचं ओरडणं सुरू झालं..

"आई बाबा, तुम्ही असा विचारच कसा केला की मी माझ्या मुलाला सोडून देऊन स्वतःच्या संसाराचा विचार करेल? एक आई इतकी स्वार्थी कधीच नसते..उद्या रोहनने मला प्रश्न विचारला, की आई तू स्वतःचा मुलगा सोडून दुसऱ्याचा मुलांना जवळ का केलंस? मला दूर का लोटलं? काय उत्तर देऊ मी त्याला???"

नवऱ्या मुलाकडे बघत ती म्हणते-

"आणि काय हो? माझ्याशी लग्न करायचं होतं तुम्हाला..तुमच्या मुलांसाठी आई हवी मग मला माझ्या मुलापासून तोडायचा विचार तरी कसा केलात? स्वार्थीपणाचा कळस आहे हा...तुम्हाला तुमची मुलं सांभाळण्यासाठी एक बाई हवी, घर सांभाळण्यासाठी एक बाई हवी... म्हणजे थोडक्यात एक गुलाम हवी..त्यासाठी माझ्या आईपणाचा सौदा करताना लाज नाही वाटली??"

आई वडील हे ऐकून तिला म्हणाले,

"तुझा मुलगा घे आणि निघ इथून, यापुढे तोंड दाखवू नकोस आम्हाला.."

"मला गरज नाही कुणाची, एक आई समर्थ असते अख्ख्या जगाशी लढायला.."

असं म्हणत अंगावरच्या कपड्यात ती रोहनला घेऊन बाहेर पडली.. तोच तिच्या खांद्यावर एका स्त्रीचा हात पडला..तिने वळून पाहिलं..तिच्या सासूबाई..आपल्या गेलेल्या नवऱ्याच्या आई..

त्यांना बघून तिने घट्ट मिठी मारली, तिच्या सासूबाईंनी तिला आधार दिला..

"तुझ्या नवऱ्याने तुझ्या नावावर एक फ्लॅट केला होता, त्याचे कागदपत्र तू तो गेल्यावर आम्हाला दिले..म्हणाली की तो नाही तर त्याची कुठलीही आठवण नको..पण तो म्हणाला होता, कसलीही वेळ आली तरी कुणापुढे हात पसरायचे नाही...म्हणूनच आम्ही हा फ्लॅट तुझ्या नावावर तसाच राहू दिला...जा पोरी, तुझं हक्काचं घर आहे तिथे...तिथून तुला कुणीही जा म्हणणार नाही की तुझं कुणाला ओझं होणार नाही..तुला घर लावायला मी मदत करते, मीही येते तुझ्यासोबत आठ दिवस..."

चेतना तिच्या सासूच्या गळ्यात पडून रडते, तिच्या रोहनला छातीशी धरते आणि मातृत्वाचा विजय मिळवत पुढे आगेकूच करते...

🎭 Series Post

View all