Login

देवाकडे मागणं!

A Wife Asks Something To God.

(कधीतरी अशीच सुचलेली कल्पना डायरीत उतरवली होती पण देव काही सगळं मागणं पूर्ण करत नाही.
कल्पना वेगळी असते आणि वास्तवात वेगळचं घडत असतं. असो.
सर्वच महिला लेखिका कवयित्री यांना मनास भावेल अशी कविता !)

देवाकडे मागणं!

©® स्वाती बालुरकर, सखी

कधी कधी वाटतं, देवाला मी एकच मागावं
संसारातून या गुंतलेल्या , तुझ्या आधी मीच जावं .

कीचनमधल्या डब्यांपासून भांड्यापर्यंत जाताच
तुला फक्त माझंच प्रतिबिंब दिसावं .

गॅस समोर पाठमोरी उभी
मला तू कल्पनेतच पहावं
मुलांच्या कपड्यापासून
तुझ्या टॉवेल, रुमालापर्यंत

माझ्या नसण्याचं भान व्हावं .

पडद्यांपासून भिंतीच्या रंगांपर्यंत ,
विस्कटलेल्या सोफ्यापासून ,
बिछान्यावरच्या पसरलेल्या चादरीपर्यंत,
तू मात्र मला आठवत राहावं.

बायको मागे नवऱ्याचं जगणं तसं कठीणच असतं-
माहीत असूनही सारं काही,
मला वाटतं, मीच तुझ्या आधी जावं .

कुठलाही स्वयंपाक जेवताना,
जिभेला तुझ्या , माझ्या हातची चव आठवावी .

अलमारातील साड्यांचे गाठोडी तू तशीच जपून ठेवावी गादी खाली दडवलेल्या कागदांमध्ये लिहिलेला
माझा हिशोब सापडावा ,
कप्प्यातल्या पेपर खाली दडवलेला
आपला जुना फोटो आवडावा.

जमाखर्चाचा ताळा करताना नेहमीच
माझ्या टिप्पणीसाठी तू थांबावं ,
हळूच माझ्या फोटोकडे पाहताना
तुझ्या डोळ्यातलं पाणी सांडावं .

भाग्यवान असेल मी जर का,
तर तुझ्या विरहाने मला जाळू नये
मी गेल्यावर जगातून माझ्या फोटोला
तू मोगऱ्याचा हार माळू नये .

कुठल्यातरी जुन्या पर्समध्ये कागदात दडलेले पैसे तुला सापडतील
अडचणीत वेळ काढली पण वेडीने खर्च केले नाही
असे म्हणशील .

रडू येण्याऐवजी माझं नाव ऐकल्यावर प्रत्येक वेळी तुझ्या चेहऱ्यावर हसू यावं
देवाने मात्र संसारातून नेताना
तुझ्या आधी मला न्याव .
पुस्तके भरलेली खोकी विकताना
हात तुझे थरथरतील ,
जुन्या कपड्यांचे गठ्ठे पाहून
गरजूंना देवूयात आता राहू दे
म्हणून पुन्हा ठेवून देशील.

वर्तमानपत्रांची कात्रण आणि
स्वयंपाकाच्या रेसिपी बघून
डोके तुझे चक्रावेल,
इतकं जमवलं होतं पण केले काहीच नाही म्हणून
मन तुझं थोडं रागावेल.

मेहंदीच्या डिझाईन आणि रांगोळीचे कागद जिथे तिथे मिळतील
फ्लॅट समोर जागा नव्हती म्हणून काढली नसेल
वेळ नसेल म्हणून मेहंदी राहिली असेल
या विचाराने हुरहुरशील .

तुझ्याशिवाय माझं कुणीच नाही म्हणणारां तू
हळूहळू मला विसरायचा प्रयत्न करशील.

येताना कविता घेऊन आले होते तुझ्या आयुष्यात, जाताना मात्र सोबत कथा घेऊन जाईन.
जन्मले, वाढले, शिकले माहेरी पण
जाताना तुझ्या नावाचं सौभाग्य घेवून जाईन.

पुढे
मुलं सुना तुला मजेत ठेवतील
एवढी खात्री माझी व्हावी
आणि
देवाने तुझ्या अगोदर
या जगातून मला न्यावी.

©®. स्वाती बालूरकर, सखी
मूळ कविता लिखाण दिनांक १६ जून २०१९
प्रकाशन २३ नोव्हेंबर २०२४