Login

दैव देते पण कर्म नेते भाग एक

कथा एका गृहिणीची
दैव देते पण कर्म नेते भाग एक

“माझा विचार सोडून दे अजय! ज्या गोष्टी खऱ्या आयुष्यात कधीही वास्तवात येऊ शकत नाही त्याची माणसाने स्वप्ने तर दूरच पण विचारही करू नये.” पुजा गहिवरल्या स्वरात अजयच्या विवाहाच्या प्रस्तावाला मनात नसूनही नकार देत होती.

“अग पूजा पण मी तुझ्यासाठी थांबायला तयार आहे. अगदी जन्मभर सुद्धा! तुझ्या आयुष्यात अशा कोणत्या अडचणी आहेत की तू माझ्या प्रेमाचा स्वीकार करू शकत नाही? माझ्यात अशी कोणती कमतरता आहे की तू मला लग्नाकरिता नकार देते आहेस? मी कॉमर्स पोस्ट ग्रॅज्युएट आहे. माझं एमबीए पण झालेलं आहे, मी आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे. दीड लाख रुपये महिना कमवतो मी! तेवढा आपल्यासाठी पुरेसा आहे, मग तरीही तू मला का नकार देते आहेस?” अजयचा प्रश्न अगदी बिनतोड होता.

“अजय तुला माहिती आहे की दारूच्या अति व्यसनामुळे माझ्या वडिलांचं अकाली निधन झालं आहे. माझी आईने शिवणकाम आणि पिको फॉल करून आतापर्यंत आम्हा तिघा बहीण भावांना तिच्या परीने शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. आता मी पण नोकरी करून आईला थोडाफार घर खर्चासाठी हातभार लावते आहे, माझ्यापेक्षा लहान माझ्या बहिण भावाची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यांची लग्न झाल्याशिवाय मी स्वतःचा विचार करू शकत नाही त्यामुळे तू माझा विचार सोडून दे.” पूजा डोळ्यात दाटलेली आस्वं खाली मान घालून पुसत घरी निघून गेली.

पूजा आणि अजय एकाच फायनान्स फॉर्म मध्ये काम करत होते, आणि अजयला पूजा अगदी मनापासून आवडत होती म्हणून त्याने तिला लग्नासाठी विचारले होते.

त्यानंतर जवळपास तीन-चार वर्षांनी पूजाच्या बहिण आणि भावाचं लग्न झालं. तोपर्यंत अजयने ही लग्न केलं नव्हतं. अजयने परत एकदा पूजाला लग्नाची मागणी घातली आणि मग पूजाने ही लग्न करिता होकार दिला. अजय च्या घरी या लग्नाला आधीपासूनच विरोध होता पण मुलाच्या हातापायी शेवटी त्याच्या आई-वडिलांनी माघार घेतली होती.

लग्नानंतर पूजा आणि अजयचे दिवस अगदी स्वप्नवत जात होते, पूजाने नोकरी सोडली होती आणि ते पुण्याला स्थायिक झाले होते. रोज बाहेर फिरायला जाणं, खरेदी, शनिवार रविवार हॉटेलिंग, लग्नाच्या वाढदिवसाला अजय पूजाला कधी मलेशियाला न्यायचा तर कधी मॉरिशसला. लग्नाच्या एखाद वर्षानंतर अजयच्या आईने, तिच्या नंनदेचा मुलगा-दीनेशला, अजयकडे शिक्षणाकरिता पाठवला. आता पूजेला लहान दिराच्या-दिनेशच्या डब्याकरिता सकाळी लवकर उठावे लागे, बाहेर फिरायला जातानाही दिनेश त्यांच्या सोबतच असायचा. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला पुण्यातच नोकरी लागली. तरीही तो अजय सोबतच राहायचा. त्यानंतर काही महिन्यांनी पूजाला दिवस गेले. तिला उलट्यांचा फारच त्रास व्हायचा. पोटात अन्न तर दुरच, पाणी ही राहत नव्हते. त्यातच अजयची भरती झाल्यामुळे त्याच्यावरही कामाचा ताण वाढला होता. पूर्वीप्रमाणे पूजाला वेळ देऊ शकत नव्हता.

गर्भारपणातले हार्मोन्स मुळे होणारे मूड्स स्विंग्स, उलट्यांचा त्रास, अन्न पचत नसल्यामुळे आलेला अशक्तपणा, दिनेश साठी रोज सकाळी उठून करावा लागणार डब्बा त्यामुळे पूजेची दिवसेंदिवस खूपच चिडचिड होत होती. सुरुवातीला अजयने हे सगळं समजून घेतलं. पण पूजाची चिडचिड कमी होत नव्हती. योग्य बांधून पूजाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. अजयच्या आग्रहामुळे सुनेच्या बाळंतपणासाठी आलेली त्याची आई आणि वडील, मग तिथेच राहायला लागले.

©® राखी भावसार भांडेकर. नागपूर

सदर कथा हि संपूर्णतः काल्पनिक असून या कथेतील घटनांचा आणि पात्रांचा वास्तवात कुणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा, तसेच ही कथा राखी भावसार भांडेकर यांची असून प्रकाशनाचे सर्व हक्क लेखीकेकडे राखीव आहे. या कथेचे व्हिडिओ बनवण्यास परवानगी नाही.