धरला तर चावतयं अंतिम भाग

Naughty Daughter In Law धरलं तर चावतयं
धरलं तर चावतयं भाग अंतिम


मागच्या भागात आपण पाहिलं की मीनाताईंकडे गावाकडून काही लोक आले होते. श्रावण सोमवार असल्याने मीनाताई महादेवाला बेल वाहत होत्या. पूजा करतानाच त्यांनी सुनेला म्हटलं, “पाहुण्यांना चहापाणी कर आणि जेवणाचं काय ते विचारून घे.” सुनेने परत स्वतःचे गुण उधळले.

दिवाणखान्यात बसलेल्या गावाकडच्या लोकांना तिने विचारले, “तुम्ही जेवण करून आला आहात? की बाहेर जाऊन जेवणार आहात?” मीनाताईंच्या सुनेचे हे असे उद्धट वागणे बघून आलेले पाहुणे मीनाताईंना न भेटताच निघून गेले.

आपल्या सुनेला कसं वळण लावावं हा मीनाताईंपुढे सगळ्यात मोठा प्रश्न होता. त्यानंतर काही दिवसांनी मीनाताईंची बहीण त्यांच्याकडे काही दिवसांसाठी राहायला आली होती. सुनबाईंचा वागणं तिला हे कुठेतरी खटकत होतं. तरीही तिने सुनेला समजून सांगण्याचा ठरवलं. पण ऐकेल ती मीनाताईंची सुन कुठली?

मीनाताईंची बहीण सुनबाईंना पोळ्या करायला शिकवत होती.

मावशी “हे बघ सुनबाई नवरी बघावी पदरा आडून आणि पोळी बघावी काठातून.” मावशींचे म्हणणं सुनबाईला काही कळलं नाही. उलट तीच त्यांना फणकाऱ्याने म्हणाली, “हे बघा मावशी एकतर या त्याच जवळ उभी राहून मला दुनिया भराची गर्मी होते आहे. घामाने नुसता जीव घाबरा झाला आहे. आणि आता तुम्ही काय मला साडी घालून डोक्यावर पदर घेऊन पोळ्या करायला सांगणार आहात का?”

मावशी “अरे देवा! तू काय डोक्यावर पडली आहेस का ग? मी फक्त एक म्हण सांगितली, त्याचा अर्थ असा होतो की ‘नवीन नवरी ला पदराडून बघायला हवं आणि पोळी काठाने लाटायला हवी.’ जी सून डोक्यावर पदर घेते, ती मोठ्यांचा मान राखते आणि काठाने लाटलेली पोळी व्यवस्थित शेकल्या जाते. कळलं का?”

सुनेने दाताखाली जीभ दाबली आणि नुसतीच नंदीबैला सारखी मान डोलावली. मावशीने सुनेला एक पोळी लाटून दाखवली आणि कशी शिकायची तेही समजून सांगितले. आता सुनेची वेळ होती, पोळी लाटण्याची आणि शेकायची. सुनेने एक पोळी लाटून तव्यावर टाकली आणि दुसरी पोळी ती लाटत होती. पोळी लाटताना तिचं तव्यावरच्या पोळीकडे लक्षच नव्हतं. तेवढ्यात मावशींनी सुनबाईला तव्यावरची पोळी उलटायला सांगितली.

मावशी “अग पलट पलट, लवकर पलट नाहीतर पोळी करपेल.” मावशी बाईंच्या बोलण्यात इतकी अधीरता होती की सुनेने घागरवाडीत पोळी उलटायचा सोडून तवाच गॅसच्या बर्नर वर उलटा केला. सुनबाईंच्या ह्या वागण्यावर मीनाताईंच्या बहिणीनेही हात टेकले. दुसऱ्या दिवशी मीनाताई चहा करायला स्वयंपाक घरात गेला तर चहा साखरेचे डबे जागेवर नव्हते.

त्यांनी सुनबाईला विचारलं, “सुनबाई चहा साखरेचे डबे कुठे ठेवले? तुझ्या सासऱ्यांची चहाची वेळ झाली आहे.”

सुनबाई रील बनवण्यात गुंग होती. सुरुवातीला तर तिला सासूचे म्हणणे ऐकूच गेले नाही. परत विचारल्यावर तिला चहा साखरेचे डबे कुठे ठेवले तेही आठवेना. शेवटी मीनाताईंनी तिला फक्त ताकीद दिली की स्वयंपाक घरातले कुठलेच डबे तिने बदलवायचे नाही. आणि भांड्यांच्या जागाही अदलाबदली करायच्या नाहीत. ही गोष्ट सुनेला अगदी जिव्हारी लागली. सकाळी पोळ्या झाल्यावर तिने पोळपाट लाटनण तर उचललं नाहीच, गॅसचा ओटा ही आवरला नाही आणि जेवणाचे ताट घेऊन तिथेच खरकट्यात जेवायला बसली.

मीनाताई तिला काही म्हणणार तेवढ्यात तिनेच मीनाताईंना त्यांचं सकाळचं वाक्य आठवण करून दिलं,”आई सकाळी तुम्हीच म्हणलं होतं ना स्वयंपाक घरातले भांडी इकडच्या तिकडे करायची नाही आणि एकाही सामानाला हात लावायचा नाही. पहा बरं मी किती आज्ञाधारक सून आहे!”आता मात्र मीनाताईंना वाटलं की एखादी विहीर जवळ करावी किंवा नदीत तरी उडी मारून जीव द्यावा.

शेवटी हार मानून मीनाताईंनी सुनेला तिच्या मनाप्रमाणे वागण्याची मुभा दिली.

‘धरलं तर चालतयं सोडलं तर पळतयं’ या म्हणीचा मीनाताईंना सुनेच्या रूपाने पुरेपूर अनुभव आला.


©® राखी भावसार भांडेकर नागपूर.

सदर लिखाण संपूर्णतः काल्पनिक असून वास्तवात त्याचा कुणाशी कसलाही संबंध नाही तसा तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.

सदर लिखाणाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित असून लेखिकेच्या परवानगीशिवाय कोणीही ते वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

********************************


🎭 Series Post

View all