नकळत्या वाटेवर भाग ५ अंतिम

आयुष्य घडवण्या वाट एक पुरेशी काटेच काटे अयोग्य वाटेवरी
नकळत्या वाटेवर
भाग 5...

दुपारनंतर चौघे, जरा ही डोळ्यांनी दिसले नाही. विनयने अभीला विचारलं.

तिकडे आंब्याखाली बसलेत.. अभिने इशारा केला.

"मोबाइल दिसतोय हातात, तो तुझा का?" अभिने होकारार्थी मान डोलावली.

----

सगळे घरी आले. दिवसभराची दगदग. सगळे थकले होते.

दुसऱ्या दिवशी सर्व रोज पेक्षा जरा उशिराच उठले.

अभी, उठून पटकन T-Shirt चढवून निघाला.

"दादा, अरे कुठे निघालास." डोळे कुसकरत राजसने विचारलं.

"मी टेकडीवर.!" अभिने उत्तर दिलं.

"आम्ही येवू..." राजस ने विचारलं.

"चला...!" अभीने ने होकार दिला.

अभी आणि अभीचे चार मित्र, पोलिस प्रशिक्षण घेत होते. धावण्याचा सराव करण्यासाठी, रोज टेकडीवर धावायला जात.

"अभिच्या मागे मागे, चौघे ही धावत निघाले. काहीच दुर गेले आणि, "बापरे, थकलो" म्हणत एका जागी जावून बसले.

"अरे मर्दानो.. दमलात एवढ्यात.."

"चला चला, इथे बसायचं नाही." अभिने दम दिला.

"तुम्ही, या जावून." आम्ही दमलो. पुढे धावत जाणं शक्य नाही." घशाला कोरड पडली होती. चेहऱ्यावरचा घाम रुमालाने टिपत चौघे ही बोलले.

"बरं, इथेच बसा.. कुठे भटकू नका.. आम्ही येतोच!" अभिने बजावलं आणि राजसने होकारार्थी मान हि डोलावली.

"दादा.. मोबाईल!" काहीच आढेवेढे न घेता अभिने हि राजसला मोबाईल दिला...

अर्धा तासानंतर अभी आणि त्याचे मित्र आले, राजस आणि त्याचे मित्र त्यांना तिथे दिसलेच नाही.

'बसून कंटाळले असतील, माघारी गावाकडे परतले असतील' अभी मित्रांसोबत लगबगीने गावात आले..

अभिने चौघांना, घरात शोधलं. बाहेर इकडे तिकडे बघितलं. पण चौघे दिसले नाही.

अभि घाबरला. घडला प्रकार अभीने विनयला सांगितला. वाऱ्यासारखी बातमी गावभर पसरली.

कुणी टेकडीवर, कुणी गावदेवीच्या मंदिराकडे, कोणी तलावाकडे तर कोणी शेतात. आजी तर, चिंचेखाली जावून आली. गावातल्या प्रत्येकाने, गावचा कोपरा न कोपरा धुंडाळून काढला. पण चौघांचा थांगपत्ता लागला नाही.

अचानक वातावरण बदललं. वादळ सुटलं. कडाकडा वीज चमकायला लागल्या. धो धो पाऊस सुरू झाला.

"तलावाजवळ... कुणाच्या तरी चपला पडल्या हायती." कुणी तरी सांगत आलं. पट्टीचा पोहणारा, तलावात तळाशी जावून आला. पण कुणाचाच सुगावा लागला नाही.

"टेकडीवर गेली होती पोरं. बंड्याच भूत आहे तिकडे. त्याच्या फेऱ्यात अडकली असतील तर. पोर नाही मिळायची." गर्दीतलं कुणी तरी बरळलं आणि सीमाने हंबरडा फोडला.

गावदेवीच्या प्रसादाला नाही म्हटलस लेका विन्या. प्रकोप झाला.

चार मुलं बेपत्ता झाली होती. पोलिस कंप्लेंट केली गेली.... पोलीस आले. तपासाच्या दृष्टीने धागेदोरे सापडतात का म्हणून विचारपूस सुरू झाली. मोबाईल लोकेशन ट्रेस होतेय का? प्रयत्न सुरू होते. पोलिसांची एक संपूर्ण तुकडी, टेकडीच्या दिशेने रवाना झाली.

"राजस आणि त्याच्या मित्रांना अभ्यासाचा कंटाळा.. पळवाट म्हणून तर चौघे पळून कुठे दूर निघून तर गेली नसतील'. अभिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

दुपार उलटली होती. शोधकार्याला वेग आला होता. हिमांशू, करण, प्रथमेशच्या आईवडिलांना फोन करून कळवण्यात आलं.

सायंकाळ होत आली होती.... आता सर्वत्र अंधार पसरेल? कुठे असतील मुलं? एवढ्या रात्रीची काय करतील? घाबरतील.. विचारही करून होत नव्हता.

पावसाची रिपरिप सुरूच होती. टेकडीच्या निसरड्या रस्त्यातून... काहीशी, हालचाल जाणवली.

थकल्या भागल्या, अर्धमेल्या अवस्थेत, चौघे पलीकडच्या टेकडीवरून खाली उतरताना दिसले.

भुकेले.. तहानेने व्याकूळ... चिखलाने माखलेले कपडे? मलूल पडलेले चेहरे त्यांचे.. सगळे टेकडीच्या दिशेने धावले.

"अरे कुठे गेला होतात तुम्ही?" जीवाला घोर लावला नुसता. विनयने राजसच्या जोरात कानफटीत मारली.

"ही वेळ नाही... या सगळ्यांची," आबांनी विनयला सर्वांसमोर जोरात रागवलं. आतापर्यंत रोखून ठेवलेल्या अश्रूंना, विनय ने ही वाट मोकळी करून दिली.

"आम्ही दादा सोबत टेकडीवर फिरायला गेलो होतो." दादाची गंमत म्हणून, टेकडीच्या दुसऱ्या दिशेने पळालो. तहान लागली तेव्हा टेकडीवर कुठे पाणी भेटतं का म्हणून शोधत फिरलो आणि रस्ता चुकलो."

"पाऊस सुरू झाला होता. मोबाइल पाण्याने ओला झाला असता, दादाचा नवा मोबाईल खराब होईल म्हणून नाईलाजाने गुफेत शिरलो. मोबाईलवर खेळत बसलो आणि वेळेचं भानच विसरलो."

"पाऊस सुरूच होता. जिकडे तिकडे चिखलच चिखल.
टेकडीवरून खाली उतरलो तर आपलं गाव दिसेना. आम्ही खूप घाबरलो. टेकड्या धुंडाळून काढल्या. टेकडी उतरून गावात गेलो. चौकशी केली तर, आम्ही पलीकडे दुसऱ्याच गावात जावून पोहचलो होतो. पुन्हा टेकडीवर चढलो."

"बाबा.... सॉरी खूप खूप सॉरी, आज कळून चुकलं..

मोबाईल म्हणजे सर्व काही नाही.
आज आमच्या हातात मोबाइल होता, पण जेव्हा आम्हाला आपण वाट चुकल्याचं लक्षात आलं तेव्हा आम्हाला सर्व प्रथम तुमची सर्वांची आठवण आली.

"घसा कोरडा पडला होता, प्यायला स्वच्छ पाणी नाही. खूप भूक लागली होती. घर सापडत नव्हतं तेव्हा... हा मोबाईल आणि मोबाईल वरचे गेम एकदम फालतू वाटले. एकदम फालतू" एकदम बकवास!"....

GPS ला हि गावाचा पत्ता सापडला नाही बाबा. राजस रडवेल्या सुरात बोलला.

"बाबा, तुम्ही नेहमी म्हणता ना,"

आयुष्य घडवण्या योग्य वाट पुरेशी
काटेच काटे, अयोग्य वाटेवरी...

बरोबर बोलता बाबा तुम्ही, "एक योग्य वाट आयुष्य घडवते तर एक अयोग्य वाट आयुष्याची वाट लावते. माती करते."

"बाबा, आजपासून आम्ही तुम्ही सांगितल्या वाटेवर च जावू. मोठ्यांचा आदर करू. तुमच्या शब्दांचा सन्मान करू. आईवडील नेहमी आपल्या चांगल्याचा विचार करतात. ते रागावतात, बोलतात आपल्या चांगल्यासाठीच. आम्हाला पटलं बाबा...!" राजसने सॉरी म्हणत कान पकडले.

"सध्या तरी, हा मोबाईल आम्हाला योग्य मार्ग नाही दाखवू शकत".. चिखलाने माखलेला मोबाईल, खिशातून काढून, राजसने अभीच्या हाती सोपवला.....

"मी काय म्हणतो, त्या गुफेत गेला होतात तुम्ही.. बंड्याच भूत वगैरे दिसलं का तुम्हाले तिथ. इकडे तिकडे फिरले तुम्ही. आजूबाजूला काही सावल्या वगैरे. गावातल्या एकाने उत्सुकतेपोटी विचारलं. चौघांनी, नाही म्हणत नकारार्थी माना डोलावल्या.

एक चिठ्ठी राजसने खिशातून काढली.. टेकडीवरच्या गुफेत एका कपारीत हि चिठ्ठी त्याला सापडली होती.

गावकऱ्यांना उद्देशून.. छोटासा पत्र संवाद कागदावर लिहिला होता.

'मी मेलोच नाही तर भूत कसा बनणार? पण काळजी करू नका. कोरोनामधून वाचून मी निघून गेलोय खूप खूप खूप दूर, कधी परतून न येण्यासाठी..... तुमचा बंड्या.

"गावात येऊ तरी कुणासाठी? माझं म्हणवून घ्यायला, गावात माझी माणसं आता नाहीत. उतलीत ती फक्त, कुटुंबातली, माझ्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून असलेली स्वार्थी माणसं. माफ करा पण, ती माझी माणसं नाहीत. माझ्या नावावर असलेला शेतीचा छोटासा तुकडा, गाव देवीला अर्पण करावा असा उल्लेख मात्र पत्रात होता.

बंड्या.... कुठे गेला? कसा गेला? ही चिठ्ठी.. रहस्यावर पडदा पडला होता तर काही रहस्य अजून उलगडायचे बाकी राहिले होते.

मोबाईल नावाच्या आणि मोबाईलच्या अतिवापर व्यसनाचा मात्र पार फडशा पडला होता. तो तात्पुरता नसावा ही प्रार्थना करताना आपली लेकरं सुखरूप परतली या जाणिवेने विनय आणि सीमाने गाव देवीला नमस्कार केला.

आजच्या काळात, मुलांच्या मनात काय चाललेय त्याचा जराही थांग मुलं लागू देत नाही? मुलांच्या गोंधळलेल्या मनातलं रहस्य जाणून घेणं सोप्प नाही. परिणामांचा विचार मुलं करताना दिसत नाही. मनातला गोंधळ, चलबिचल अवस्था, त्यांच्या मनाच रहस्य जाणून घेण्यासाठी आजच्या आई वडिलांची, पदोपदी कसोटी लागते, तेच खरं.

काही वेळापूर्वी, सगळं संपलं.. असं वाटतं असताना, आपण सुखरूप पोहचलो या जाणीवेने, राजस आणि त्याच्या मित्रांना अश्रू अनावर झाले. "आपल्या नकळत्या वयात, आयुष्याच्या अवघड वाटेवर" आपले पालक आपले हितचिंतक आहेत हे मुलांच्या मनाला पटलं होतं. आज सीमा आणि विनयच्या डोळ्यात वेगळीच समाधानाची चमक झळकली जी इतर कोणत्याही सूखापेक्षा अनमोल होती.

समाप्त

🎭 Series Post

View all