Login

नणंदबाई येता घरा.... भाग एक

विभीताला बाळ नसल्यामुळे ओटी भरू देत नाहीत

जलदकथा

" माझ्या संसाराला, आमच्या येणाऱ्या बाळाला माझ्या ताईची नजर लागली तरी चालेल पण माझ्या बायकोची ओटी ताईच भरेल. "


असं आशुतोष सगळ्यांना ठणकावून म्हणला.

बाजूलाच त्याची ताई विभीता गुपचूप उभ राहून रडत होती. हा होणारा अपमान तिच्यासाठी काही नवीन नव्हता.


"काय म्हणतोस? विभीता भरेल ओटी? अरे, तिला स्वतःलाच दहा वर्षं झाली बाळ नाही. अशा बाईच्या हातून ओटी भरून घेतली की येणाऱ्या बाळावर अपाय होतो असं लोकं म्हणतात.”


त्याची सासूबाई म्हणजे प्रेरणाची आई म्हणाली.

" होना... बाकीच्यांचं जाऊदे पण हिला समजत नाही का? आपल्या भावाचं चांगल होउदे असं वाटत नाही वाटत. "

मागून बायका कुजबुज करत होत्या.


“मी म्हंटल ना ओटी ताईच भरेल…म्हणजे तिचं भरेल... ह्यावर अजून डिस्कशन नको आहे मला.”


आशुतोष पुन्हा आवाजाच्या वरच्या पट्टीमध्ये बोलला.

"मी माझ्या मुलीच्या आयुष्याशी नाही खेळू शकत, ह्या अपशकुनी मुलीची सावली माझ्या मुलीवर आणि नातवंडावर पडली तर ह्याची जिम्मेदारी कोण घेईल?"

आशुतोषची सासू म्हणजे प्रेरणाची आई सुद्धा ऐकायला तयार नव्हत्या.


विभीता आशुतोषची ताई, त्याच्यापेक्षा पाच वर्षांनी मोठी. लहानपणापासून त्यांचा दोघांचा एकमेकांवर खूप जीव होता. आई गेल्यानंतर त्याची ताईच त्याचं सगळं सांभाळत होती.आई गेल्यावर ताईच आई झाली होती. अभ्यास, जेवण, कपडे  सगळं तिच्या हातूनच लागायचं त्याला. आशुतोषचं लग्न झालं तेव्हा तीच सर्वात आनंदी होती. तिच्या आवडीच्या मुलीसोबतच त्याने लग्न केल होत. फक्त त्याच्यासाठीच तिनेसुद्धा गावातल्या मुलासोबतच लग्न केल होत.


विभीताच लग्न गावच्या डॉक्टरांशी झालं होतं, डॉक्टर अनिल पाटील. लग्नानंतर सुरुवातीला तिचं आयुष्य चांगलं चाललं, पण नंतर नियतीनं तिला नातं आणि मातृत्व दोन्हीचं कसोटीत टाकलं.सगळं छान चाललं होतं, पण लग्नानंतर दहा वर्षांनीही बाळ न झाल्याने तिला सगळेच घालुनपाडून बोलायचे. ती खूप दुःखी व्हायची पण नवऱ्याची आणि भावाची तिला भक्कम साथ मिळाली होती. सगळ्यांसाठी ती अपशकुनी होती पण आशुतोषच्या नजरेत त्याची ताई देवीसमान होती. त्याला ठाऊक होतं तिचं मन सोन्यासारखं पवित्र आहे.

तिच्या सासूने तर तिला धमकीच दिली होती,

"ह्यावर्षी बाळ झालं नाही तर मी अनिलचं लग्न दुसऱ्या मुलीसोबत लावेन."


त्यामुळे तर ती खूपच घाबरलेली होती, पण प्रेरणाचा सातवा महिना चालू होता. म्हणून तिने आशुतोषला काहीही सांगितलं नव्हतं. आईचा त्रास नको यासाठी आणि प्रेरणाची ती काळजी घेईल असा विचार करून अनिलने तिला माहेरी सोडलं होत.



मिळेल का विभीताला ओटी भरायला?
प्रेरणाची काय भूमिका असेल????