" बाबा, काय गरज होती विराजला काही खरं खोटं सांगायची काय गरज होती. तुम्हालाही चांगलं ठाऊक आहे मी ऑफिसमध्ये टाईमपास करायला तर जात नाही, कधीतरी अचानक मीटिंग अरेंज करतात, त्यामुळे होतो वेळ. आता तुम्ही म्हणालात की तुम्ही वीरला पाहणार म्हणून तुमच्यावर विश्वास ठेऊन मी त्याला सोडून जाते ना. आई होत्या तेव्हा त्या सगळं बघायच्या. वीरची अंघोळ, खाणे-पिणे, अगदी सगळंच. पण आता तुम्हाला फक्त लक्ष द्यायचं असतं, तुम्हाला काहीही करावं लागत नाही, ती मुलगी येऊन सगळं करते, तरी तुम्ही माझ्या उशिरा येण्यावर का असा समज करून घेता की मला घराची आणि वीरची काहीच काळजी नाही. मी तुमची सून आहे म्हणून का? तुमचा मुलगा उशिरा आलेला चालतो तुम्हाला मग मी कधीतरी उशिरा आले तर काय एवढं बिघडलं. मी कसं तरी सगळं सांभाळून घ्यायला बघते. त्यात पण तुम्ही विराजला काही बाही सांगितलं तर कसं होईल? आमच्यात भांडणे लावून तुम्हाला मिळत तरी काय? तुम्हाला समजायला हवं बाबा की ह्याचा परिणाम वीर वर पण होतोच..."
प्रल्हाद रावांची सून समीक्षा त्याच्यावर थोडा आवाज वर चढवून बोलत होती, तिला उत्तर द्यायला म्हणून त्यांनी तोंड उघडले,
"समीक्षा, अग, मी विराजला काय बोलू? आणि कश्यासाठी? वीरबद्दल मला काही नाही वाटत का? तुला अस का वाटत आहे? "
ते बोलतच होते की त्यांना मधेच थांबवून हात जोडून ती जरा रागात म्हणाली...
"राहू द्या ना बाबा ..तुम्हाला त्या दोघांबद्दल कळवळा आहे पण तो माझ्या बद्दल नाही आहे. माझी अपेक्षा ही नाही तशी पण तुमच्या समोर हात जोडते, आमच्या मध्ये येऊ नका. मगाशी जे काही झालं त्यावरून विराज माझ्यावर चिडला आहे. तेव्हा नका ना काही बाही सांगत जाऊ त्याला ..आणि आता जेवायला चला."
ह्यावर त्यांनी फक्त होकारात मान हलवली. खरं तर त्यांना तिच्या अश्या बोलण्याचा धक्काच बसला होता, पण आत काही बोललो तर ती अजून चिडेल म्हणून ते शांत बसले. तेवढ्यात पुन्हा मागे वळून ती म्हणाली,
"आणि प्लीज , मी आता जे काही बोलली ते तरी नका सांगू त्याला. आता जे झालं त्या बद्दल त्याला समजावताना नाकी नऊ येतील माझ्या .."
असं म्हणून ती तरातरा निघून गेली आणि प्रल्हाद राव आकाशात चांदण्यांकडे पाहून आपल्या पत्नीला अर्चना ला आठवत राहिले. ते वर आकाशात असणाऱ्या चांदण्यांमध्ये आपल्या पत्नीला शोधत होते. तिच्या कितीतरी आठवणी आता त्यांच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.
त्यातच मगाशी घडलेला प्रसंगामुळे ते स्वतःला कोसत होते. आता काहीच वेळा पूर्वी वीर ने त्यांच्या नातवाने सगळी खेळणी घरभर पसरवली होती. दिवसभर त्या दोघांचं तेच चालू असायचं. विराज आणि समीक्षा आल्यावर प्रल्हाद राव ती खेळणी उचलायचे कारण दिवसभरात कितीही वेळा उचलली तरी वीर तशीच खेळणी पसरवून द्यायचा. आता ही विराज आधी आला म्हणून त्यांनी ती खेळणी उचलून ठेवली. छोटा वीर त्यांना ती पसरलेली खेळणी आणून देत होता. सगळं हॉल त्या दोघांनी मिळून स्वच्छ केला. तास प्रल्हाद राव जरा वेळ सोफ्यावर बसले. दिवसभर वीरच्या मागे धावून ते दमात असत. कितीही पाय दुखत असले तरी लहानग्या वीरला पाहून ते सगळंच विसरून जायचे. पाय दुखून सुद्धा ते दोघे त्याला घोडा बनून फिरवायचे, तेव्हा वीरला केवढा आनंद व्हायचा. आता हि त्यांना खूप थकवा आला होता पण वीर चा हट्ट होता की,
"आजोबा, खबडक खबडक घोडा व्हा ना..!"
त्याच ते चिमुकलं तोंड पाहून त्यांना त्याला नकार द्यायची अजिबात इच्छा झाली नाही आणि ते कसे तरी घोडा बनले. त्यांच्या पाठीत आणि गुडघ्यामध्ये एक चमक आली पण वीर चं हसू पाहून ते विसरले. इकडे वीर जोरात ओरडत होता,
"लाडोबाचे लाड करतंय कोण? आजोंबा, तुम्ही मला खूप आवडता"
हे सांगायला तो खाली वाकला तास त्यांनी त्याला कास तरी पकडलं.
"वीर बाळा, हळू रे, पडशील.. मला म्हाताऱ्याला नाही सांभाळता येणार तेव्हा जपून रे."
तरी वीर त्याच्याच धुंदीत खबडक खबडक घोडोबा चे गाणे गात होता. तिकडून विराज फ्रेश होऊन आला आणि तो ह्या दोघांची मस्ती पाहत होता. तेवढ्यात समीक्षा देखील आली आणि तिला पाहून वीरला तिला बिलगायची इच्छा झाली, तस तो..,
"मम्मा, मम्मा"
करत तिच्याकडे झेपावला.
असं काय घडलं कि समीक्षा प्रल्हाद रावांवर रागावली.
तिचा गैरसमज ते दूर करतील का?
क्रमश
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा