नावडती चं मीठ अळणी भाग एक

Daughter In Law नावडतीचे मीठ अळणी
नावडतीचं मीठ अळणी भाग एक

“गौरी अगं किती उशीर हा! आठ केव्हाचेच वाजून गेले आहेत. झालेत की नाही अजून कांदेपोहे? माझ्या बीपीच्या गोळीची वेळ झाली आहे.” मीनाताई, सून गौरीच्या नावाने सकाळच्या नाश्त्यासाठी पुकारा करत होत्या.

सकाळपासूनच गौरी स्वयंपाक घरात काही ना काही करतच होती. आधी मुलासाठी तिने टिफिन बनवला. मग त्याला उठवून शाळेसाठी तयार केलं. गौरीचा मुलगा प्रथमेश शाळेत जाण्याकरिता तयार होण्यासाठी रोजच तिला त्रास द्यायचा. एकतर तो शाळेत जाण्यासाठी झोपेतून उठायलाच तयार नसायचा. दादा-पुता करून, सोन्या-मोन्या करून गौरी त्याला कसेबसे शाळेसाठी तयार करे. त्यानंतर तो सकाळी दूध पिण्यासाठीही गौरीला फारच जेरीस आणे, हेही नसे थोडके म्हणून, “मम्मा तु मला आज टिफिन मधे काय दिलं आहे? मला खाऊच्या डब्यात चिप्सच हवेत किंवा कप केकच पाहिजेत किंवा अजून काहीतरी” असं म्हणून तो गौरीच्या संयमाचा अगदी अंत पाही.

पण सकाळी सकाळी आपल्या सहा वर्षाच्या मुलावर न चिडून त्याला आनंदाने शाळेत कसं पाठवता येईल याकडेच गौरी जास्त लक्ष देत असे. शिवाय मुलावर सकाळी ओरडलं म्हणजे नवऱ्याचा पारा चढणार आणि सासूबाईंना तोंड वाजवण्यासाठी आयतं कोलीत मिळणार, म्हणून गौरी शक्य तितक्या प्रेमाने प्रथमेशचं आवरून त्याला शाळेत पाठवी.

प्रथमेशला आवडतात म्हणून गौरीने आज आलूचे पराठे केले होते. पण आज प्रथमेशला शाळेतच जायचं नसल्याने, त्याने उगीचच गळे काढायला सुरुवात करून, मला आलूचा पराठा नको तर सँडविच हवं म्हणून पाया आपटायला सुरुवात केली. गौरीने आधी प्रेमाने आणि मग आवाजात जरब आणून त्याला शांत केलं आणि त्याच्यासाठी पटकन दोन सँडविचेस बनवले. तेवढ्यात शाळेची व्हॅन आल्याने गौरी आणि प्रथमेश भराभरा खाली उतरले आणि प्रथमेश ने ज्ञानार्जनासाठी शाळा नावाच्या रणांगणाकडे कुच केलं.

घरी परतल्यावर गॅसच्या ओट्यावरचा पसारा आवरता आवरता, गौरीने एकीकडे सासू-सासरे आणि नवऱ्यासाठी चहाच आंधन ठेवलं तर दुसरीकडे स्वतःसाठी कॉफी करायला घेतली. तेवढ्यात नवऱ्याने ऑफिसच्या डब्यासाठी कारल्याच्या भाजीची फर्माईश केली. सकाळच्या घाई गर्दीच्या वेळी कारल्याच्या भाजीची फर्माईश ऐकून गौरी जरा चिडलीच होती, पण तरीही तीने कारली चिरायला घेतली.

एकीकडे ती चहा करत होती तर दुसरीकडे कारल्याच्या भाजीसोबत आणखीन दुसरी काय भाजी करावी याचा विचार तिच्या मनात घोळत होता.

पण सासूबाई मात्र अजूनही त्यांना नाश्ता मिळाला नाही म्हणून गौरीच्या नावाने शंख करत होत्या.

सासूबाईंचा चढता पारा बघून गौरीने सासुबाई आणि सासऱ्यांचे चहाचे कप भरले आणि त्यासोबतच प्लेटेत चार बिस्किटं ठेवून, तीनं त्या दोघांचा चहा त्यांना खोलीत नेऊन दिला.

“घड्याळाचा काटा आठवर जातो तरी मेला सकाळचा चहा मिळत नाही! मला गोळ्या घ्यायच्या असतात एवढं सुद्धा हिच्या लक्षात राहत नाही!” सासूबाईंची अखंड बडबड सुरू होती. सासरेबुवा मात्र निवांत पेपर वाचत होते.

“आई बाबा चहा” सासुबाईंचे टोकदार शब्द गौरीच्या कानावर पडलेच, त्यामुळे जास्त काही न बोलता ती खोलीत चहा ठेवून माघारी फिरली.


©® राखी भावसार भांडेकर नागपूर.

सदर लिखाण संपूर्णतः काल्पनिक असून वास्तवात त्याचा कुणाशी कसलाही संबंध नाही तसा तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.

सदर लिखाणाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित असून लेखिकेच्या परवानगीशिवाय कोणीही ते वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


🎭 Series Post

View all