Login

Letter to husband

नव-यास पत्र

प्रिय अहो,
     आज मी तुम्हाला पत्र लिहीत आहे. तस पत्राच कारण फक्त "इरा पत्र लेखन स्पर्धा " एवढंच होतं. पण प्रत्यक्ष पत्र लिहायला घेतल्यावर मात्र मनात अनेक गोष्टींची गर्दी झाली आहे. ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत त्यामुळे आता या पत्राचे कारण पत्र लेखन स्पर्धेतपुरते मर्यादित राहिले नाही तर आपल्या जीवनातल्या काही गोष्टी तुम्हाला सांगत आहे त्यामुळे आता हे पत्र पाहून हसू नका बरं . तर ते मनापासून वाचा. तुम्हाला माहित आहे ना, माझं दुसरे पत्र आहे हे तुम्हाला लिहिलेले. आठवते तुम्हाला आपल लग्न ठरलं तेव्हा आपण एकमेकांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर आत्ताच लिहायची संधी मिळाली. त्या जुन्या आठवणी, तो जुना काळ आठवला तरी मनावर मोरपीस फिरल्यासारखे वाटते.
     23 नोव्हेंबर 2010 ला तुम्ही मला पाहायला आलात, 12 डिसेंबर 2010 ला आपल्या लग्नाची सुपारी फुटली. तोपर्यंत आपण अगदीच अपरिचित होतो तेव्हा कुठे एकमेकांना बोलायला वगैरे दिले जायचे. त्यामुळे तसे अपरिचित आपण. पण लग्नाची तारीख मात्र 14 मे 2011 काढली गेली. म्हणजे जवळजवळ चार- पाच महिने होते मध्ये. माझे पप्पा जरा जुन्या विचारांचे त्यांना वाटायचे, लग्न ठरवून इतके दिवस लग्नासाठी न थांबता लगेच लग्न उरकावे. त्यामुळे माझे मत ही असेच होते.  तुम्ही मात्र माझे हे मात पूर्ण चुकीचे ठरवले. तुम्ही हे चार-पाच महिने माझ्यासाठी सर्वात सुंदर आठवणींचा गुच्छ बनवला. सुपारी नंतर जेव्हा पहिल्यांदाच आपण भेटलो तेव्हा आपण दोघांनी एकमेकांना पत्र लिहून द्यायचे ठरले. तेव्हा ते आपले पहिले प्रेम पत्र होते. त्यानंतर दुसर्‍या भेटीत तुम्ही मला सॅमसंग गुरु मोबाईल गिफ्ट केला होता आणि तेव्हापासून तर आपण रोजच फोनवर एकमेकांशी बोलू लागलो. मोठ्यांच्या भितीने तसे बोलणे कमी आणि मेसेज जास्त व्हायचे पण ते मॅसेज सुद्धा मनाला खुप आनंद द्यायचे. आता स्मार्टफोनवर एकमेकांना सतत व्हिडिओ कॉल वर पाहूनही जो आनंद मिळणार नाही तो आनंद त्या शब्दरूपी भावनांचा मेसेज मधून मिळायचा. तुम्हाला माहित आहे तुमचे ते पहिले पत्र आणि सगळे मेसेज मी वहीत लिहून ठेवले आहेत आणि ती वही अजूनही माझ्याजवळ आहे. मी ऑफिसला जाताना येताना येणारे तुमचे फोन, विचारपूस, माझी काळजी माझ्याही नकळत मला कधी तुमची करून गेली हे मला कळालेच नाही. ते चार-पाच महिने म्हणजे अरेंज मॅरेज असूनही प्रेमाचा हिंदोळ्यावर झुलायला आणि एकमेकांना समजून घ्यायला आपल्याला दिलेले हक्काचे दिवस होते जणू. लग्नाच्या आदल्या रात्रीपर्यंत आपण मनसोक्त गप्पा मारत होतो. लग्न लागले आणि मी आपल्या घरात प्रवेश केला. सोबत माझी वहिनी पाठराखीण आली होती. सगळ्यांच्या कौतुकाच्या नजरांनी नवी नवरी मी अगदी आनंदून गेले होते. तुम्ही मात्र समोर आलात कि घाबरायला व्हायचे. ते पाहून वहिनी म्हणाली, "चार-पाच महिने एकमेकांशी सतत गप्पा मारत होता तुम्ही. मला तर वाटले आता तुमच्यातले नवेपण तुम्हाला जाणवणारच नाही."
 "कारण अगोदरपासूनच एकमेकांना ओळखणा-या व्यक्ती लग्नानंतरच्या पहिल्या दिवसातील नवलाई चा आनंद मनसोक्त लुटू शकत नाही. असंच आता तुम्ही पण त्या आनंदाला मुकणार असे वाटले मला पण तुमचं नातं मात्र अगदी प्रत्येक ऋतूचा आनंद घेत घेत फुलतय बर."
ती सांगत होती, अचानक नव्या घरात आल्यानंतर येणार अवघडलेपण, नवऱ्याची आपल्याला शोधणारी नजर, कोणालाही न कळता आपली घेतली जाणारी विशेष काळजी यात पण एक वेगळच सुख असतं. तिचे बोलणे ऐकून तर मला आपल्या नात्याबद्दल अजूनच प्रेम निर्माण झालं आणि अशातच प्रेमाची, नात्याची वीण घट्ट  विणता विणता या वेलीवर आपला पहिला मुलगा जन्माला आला. त्याचं नावही तुम्ही माझ्या आवडीने श्रिजित ठेवले.
         आपली आर्थिक प्राप्ती अगदी जेमतेम असताना तुम्ही माझ्या हट्टासाठी आपल्या स्वतःच्या कष्टाने पहिल्यांदा कम्प्युटर घेतला या गोष्टीचा मला फार अभिमान वाटला होता. असे संसारात येणारे अनेक छोटे मोठे सुखदुःखाचे डोंगर पार करीत आज आपण दोन मुलांचे आईबाप झालोत. एक मुलगा आणि एक मुलगी असे आपले चौकोनी कुटुंब. तसे आई-बाबा, दीर-जाऊ आहेतच की आपल्या सोबत प्रत्येक सुख दुःखात. पण तरीही अभिमान आहे मला की आपल्या संसाराला तुम्ही काहीही कमी पडू दिले नाही. प्रत्येक वेळी आपण प्रत्येक गोष्टी मध्ये एकमेकांना समजून घेतले. जसे मी माझ्या सासु-सासर्‍यांना आपले आई-वडील मानले तसेच तुम्हीही माझ्या आई-वडिलांच्या प्रत्येक अडचणीच्या काळात मुलाप्रमाणे धावून आलात. लहान मेहुणीचे मोठ्या भावाप्रमाणे सगळे हट्ट पुरवले. 
     सगळी कर्तव्य व जबाबदाऱ्या आपण आपापल्या ठिकाणी अगदी योग्य पद्धतीने आणि जितके जमतील तितके चांगल्या रीतीने पार पाडत आहोत याचा मला आनंदच आहे. पण हे सगळं करताना आता जाणवत आहे की काहीतरी हातातून निसटून चाललंय ते काय?  तर ती आहे वेळ. आपल्या दोघांची वेळ.  सगळी कामे करता करता आपल्या नात्याला वेळच देणं बंद केलंय आपण. सकाळी चहा नाश्ता, मुलांचा शाळा, तुमच ऑफिस, घरची काम, मग ऑफिसमध्ये तुमची मदत, परत संध्याकाळी मुलांचे क्लास, अभ्यास, रात्रीचे जेवण या रुटीन मध्ये आपला आपल्यासाठी असा थोडाही वेळ नाही. कधी वेळ काढून बोलतो तेव्हाही पुढचे सेविंग  मुलांचे शिक्षण, संपलेला किराणा, उद्याच्या ऑफिसचे काम एवढेच बोलणे होते. तुम्हाला नाही का वाटत? अगदी रोज रोज नाही पण आठवड्यातील एक दोन तास तरी फक्त आपले असावे. 

ज्या वेळी नको किराणा गप्पा,
नको ऑफिसचे टेन्शन,
फक्त द्यायचं एकमेकांना अटेन्शन.
हवं तर गप्पाही नको मारूयात,
फक्त शेजारी शेजारी बसुयात.
एकमेकांचा हात हातात घेऊन
घेऊ एकमेकांना शब्दाविनाच समजून. 

खरच खूप गरज आहे हो याची. उद्या पुढे जाऊन असं नको वाटायला की सगळ्यांचे सगळं करताना स्वतःसाठी जगायचं राहून गेलं.
 आठवा ना तुम्हीच, मी शेवटची कधी रुसले तुमच्या वर ? शेवटची तुमच्या हाताची उशी कधी दिली होती तुम्ही मला ? कधी शेवटचं आपण मनसोक्त गप्पा मारल्या आणि निरर्थकच हसलो जोरजोरात? अगदी लग्नाआधी हसायचो तसं. 
    नाही ना आठवत, मी सांगते मी पहिल्यांदा रुसले तेव्हा तुम्ही माझा रुसवा घालवण्यासाठी काजुकतली आणली होती आणि आता मात्र शेवटची कधी रुसले हे पण आठवणार नाही. कारण रुसवे-फुगवे, छोटी छोटी पण गोड भांडण हे सगळं सोडून नात खूप पुढे आलंय. मॅच्युअर झालंय. पण तरीही अशा छोट्या गोष्टीतच खरा आनंद असतो. या छोट्या गोष्टीच जगण्याला नवीन बळ, नवीन प्रेरणा देतात. त्यामुळे मला माझ्या हक्काचे आठवड्यातील 2 तास हवेतच. पत्र वाचून ठरवा तुम्ही कोणते दोन तास तुम्ही आपल्या साठी देणार आहात आणि हो, 
"त्या दोन तासांची वेळ कळवा अशाच एका छोट्या प्रेम पत्रातून, मग मलाही वाटेल आपण नुकतेच फिरुन आलोय एका सुंदर बनातुन."

 तुमचीच साताजन्माची सखी