चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
जलद लेखन
शीर्षक - परशुरामांचा शाप
भाग: १
जलद लेखन
शीर्षक - परशुरामांचा शाप
भाग: १
महेंद्रगिरी पर्वताच्या शिखरावर सकाळचे कोवळे सुवर्णकिरण पसरले होते. गगनाला भिडणाऱ्या पर्वतरांगा जणू त्या प्रभा-तारुण्याच्या केशरी रंगात न्हाऊन गेल्या होत्या. मंद शीतल वारा सोनचाफ्याच्या सुगंधासह वाहत होता. सभोवती गूढ वनराई, आजूबाजूला किलबिलणाऱ्या पक्ष्यांचे मंजुळ स्वर आणि दुरवरून येणारा वेदपठणाचा मंत्रमुग्ध करणारा निनाद त्या वातावरणाला अधिकच दिव्य बनवत होता.
त्याच शिखरावर भार्गव परशुराम उभे होते. वयाने वृद्ध असूनही तपोबलामुळे त्यांच्या मुखावर अजूनही तारुण्याचे तेज दिसत होते. त्यांच्या जटाभारातून झळकणारी प्रभा जणू सूर्यालाही लाजवत होती.
त्यांच्या चरणाशी त्यांचा शिष्य कर्ण आपले दोन्ही हात जोडून बसला होता.
अचानक आकाशातून वीजेसारखे काहीतरी दैवी त्या पर्वतरांगांमध्ये उतरले. तो ध्वनी सर्वत्र घुमू लागला.
"उठ कर्णा, आज तू धनुर्विद्येच्या अंतिम पडावावर पोहोचला आहेस. तुझ्या अंगी ब्रह्मास्त्राची अद्वितीय विद्या नांदू लागली आहे. या क्षणापासून तू या विश्वातला एक श्रेष्ठ धनुर्धर झाला आहेस." परशुरामाने कर्णाला उठवत म्हटले.
"धन्यवाद गुरुदेव! तुमच्यासारख्या महान गुरूंचे शिष्यत्व मिळणे, हेच मी माझे सर्वात मोठे भाग्य समजतो." कर्णाने आपली मान झुकवून आभार व्यक्त केले.
"भाग्यवान तर मी आहे कर्णा, जो माझ्या नशिबी तुझ्यासारखा कर्तबगार आणि आदर्श शिष्य आला. मला खात्री आहे तू तुझ्या किर्तीने माझेही नाम उज्ज्वल करशील."
"हो गुरुदेव, मी तुम्हाला वचन देतो. तुमच्या गौरवाला धक्का लागेल, असे कार्य माझ्याकडून कधीही घडणार नाही."
"मला त्यात किंचितही शंका नाही, कर्णा. जर कोणी क्षत्रिय अधर्माने वागत असेल, तर धर्मरक्षणासाठी त्यास दंडीत करायला कधीही संकोच करू नकोस." परशुरामाचे हे वाक्य ऐकताच कर्णाचा चेहरा जरासा निस्तेज झाला.
तो आपल्या गुरूंच्या नजरेला नजर भिडवू शकत नव्हता. त्याच्या मनात काहीतरी शल्य होते. त्याने केलेली एक चूक त्याच्या हृदयाला बोचत होती.
" काय झाले कर्णा? तू अचानक गप्प का झालास?" परशुरामाने त्याच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव पाहून विचारले.
" क... क... काही नाही गुरुदेव."
" मग तुझ्या मुखावर अस्वस्थतेची छाया का पसरली आहे? तुला काही सांगायचे आहे का?" कर्णाला अचानक काय झाले आहे, तेच परशुरामाला समजत नव्हते.
दुसऱ्या बाजूने कर्णालाही आपल्या गुरूंना काय सांगावे तेच कळत नव्हते.
" गुरुदेव, आज आपण धनुर्विद्येच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. गुरुदक्षिणा दिल्याशिवाय माझी ही विद्या पूर्ण होणार नाही. मला आज्ञा द्या, मी आपणास कोणती गुरुदक्षिणा अर्पण करावी?"
" गुरुदक्षिणेसाठी तू अस्वस्थ वाटत आहेस का? वत्सा, गुरुदक्षिणा म्हणून मला काहीही नको. तूच माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी गुरुदक्षिणा आहेस. तू तुझ्या प्रतिभेने आणि निष्ठेने माझे गुरुत्व खऱ्या अर्थाने गौरवले आहेस. देवव्रत भीष्मानंतर माझ्या स्मरणात ज्या शिष्याचे नाव तेजस्वीपणे उजळून राहील, तो तूच असशील."
" नाही... नाही गुरुदेव, असे म्हणू नका. गुरुदक्षिणा न दिल्यास माझ्या विद्याग्रहणाचा हा दीप पूर्ण प्रज्वलित होणार नाही. माझ्या विद्येचे हे फुल उमलूनही सुवास न पसरवणाऱ्या कळीप्रमाणे राहील. कृपा करुन मला आदेश द्या."
" वत्सा, तुझ्या भावना मी समजू शकतो. जर तुझा आग्रहच असेल, तर मला एकच गुरुदक्षिणा प्रदान कर."
क्रमश: