Login

पातळ भाजी भाग 36

पातळ
पातळ भाजी भाग 36

प्राची जोरात ओरडली !!

मेधा ,"हळूहळू वहिनी अग सगळे धावत येतील.."

"मला खूप आंनद झालंय तुमच्यासाठी ताई.."

"हो मला ही ,केव्हाच वाटत होतं घर कधी येईल ,आणि मी ही गोड बातमी कधी सांगेन.."

"मी यांना सांगते आताच..खूप खुश होतील तुमच्यासाठी.." प्राची पुन्हा मिठी मारत

पण तिला लक्षात आले जास्त मिठी नको मारायला..नाजूक आणि प्रेमाने अंतर ठेवून बोलावे..

"कितवा महिना आहे..?"

"अग पहिला महिना आहे अजून.."

"मग तर खूपच काळजी घ्यायला हवी हो ना..? मी आता तुम्हाला काही काही करू देणार नाही..मी करेन तुम्ही फक्त सांगत चला ,आणि हो हवा लागत नाही मी तुम्हाला फॅन आणते आणि खुर्ची घेऊन येते हा..."


"नको इतकी नाजूक नाही मी..आणि बाळाला ही नाजूक होऊ देणार नाही..अजून तर वेळ आहे..मीच घरी सगळे काम करते..तिथे हे लाड नाही चालत.."

प्राची विचार करून शेवटी मेधाला म्हणाली ,"ताई तुम्ही मी सासुरवाशीण आहोत, इथे तुम्ही माहेरवाशीण आहात पण एक विचारू का ?? राग नका मानू ह्याबद्दल ..राग आला तर मोठ्या म्हणून माफ करावे.."

मेधा तीळ घेत होती ,ते गप्पा मारता मारता भाजून घेत होती..ती एकदम कामात सराईत झाली होती..स्वतःचे बाळंतपण किंवा दिवस गेल्याची बातमी ही तिने कळल्या कळल्या कोणाला दिली नाही ,तिला द्यावी वाटली नाही...

"माहेर नावाला राहिले ग हे..माहेर तर नाहीच मला उरले..आई बाबा गेले तेव्हाच मी ह्यांना परकी झाले..मग ठरवले लग्न झाले की फार माहेर ,माहेरपण..माहेरची माणसे..माहेर सुख करत बसायचे नाही..प्रेमाने बोलावले तर टाळायचे नाही..पण बोलावले तर जायचे नाही..त्यात सासूबाई ही समजून चुकल्या काही विक पॉईंट माझे.."


प्राची त्यांचे बोलणे ऐकत होतीच ,तिला कळत होते आपल्या सासुबाईचे मेधा ताईबद्दल चे मत तसे फारसे चांगले नाही..त्या मागून बरेच बोलून गेल्या होत्या ,कसला राग होता तर मेधा ताईच्या आईचा...त्यांच्या मुळे त्यांच्या वर झालेल्या अन्यायाचा..पण मन मोठे करून मेधा ताईला तरी जवळ करायला हवे होते..

जुना राग विसरायला हवा होता ,त्यात पुन्हा आपल्या लेकीची आवड जपणाऱ्या मेधाला किती प्रेमाने वागवायला हवे होते त्यांनी पण तिथे ही खुन्नस ठेवून होत्या.

"मी छोटी आहे पण मी आहे ना तुमचे माहेरपण करायला ,हम्म..बाळाची मामी करेन त्याचे खूप सारे लाड..मामा करेन..आजोबा करतील ,वीणा मावशी ही किती चांगली आहे,रोहित मामा तर त्याला खाली ठेवणार नाही...किती छान आहे बघ तुझ्या आईचे माहेर बाळा.."

हे बोलणे ऐकून बाहेर उभी असलेली वीणा रडायला लागली ,तिला कळले की ताईला माहेर आणि माहेरची माणस.. माहेरपण कसे आवडणार..खरंच तिला हे सुख आई मुळे मिळत नाही..तिला निदान ह्या क्षणात तरी सर्व सुख द्यायला हवे..ती आई होणार आहे ही बातमी ही तिला कोणाला सांगावी वाटली नाही ह्यात ताईचा दोष नाही...मी चांगली मावशी नाही..आई बाबा चांगले आजी आजोबा नाहीत..मामा असतील ही चांगले ,मामी ही चांगली असेल..

पण आई मुळे त्यांना ही बंधन येतील तर काय करतील कोण ,किती ही सोहळे साजरे करावे वाटत असले तरी सगळे तिला माहेरपणाचे सुख मिळवू देणार नाही..

ती बोलत असतांना, डोळे पुसत असतांना मागून रोहित आणि अरविंद आले होते ,त्यांनी तिचे बोलणे ऐकले आणि त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले

"विणूडी अग काळजी करू नकोस आपल्या मेधा ताईंचे माहेरपण आणि इतर काही कोणते ही आनंदाचे क्षण आपण ह्याच तिच्या माहेरच्या अंगणात थाटात साजरे करू..तिला हेच हक्काचे माहेर आहे..आम्ही ही चांगले मामा होऊन दाखवू..पण आधी तशी काही बातमी देऊ तर दे
वेळ आहे अजून खूप.." अरविंद

"नाही दादा तिच्या कडे आनंदाची बातमी आहे..पण तिने कोणाला ही नाही सांगितली. "


मेधा आणि प्राची बोलत असतानाच तिघे ही आत आले आणि अरविंद तिच्या जवळ जाऊन तिच्या पुढे हात जोडून माफी मागत म्हणाला..

"ताई तू परके केलेस आम्हाला, दादा म्हणतेस फक्त तू..पण ह्या गोड बातमीवर आमचा हक्क समजला नाहीस हो ना..?"

"तू चांगले दूर केलेस ताई.."

"तुझ्या विणावर तरी एकदा भरवसा ठेवून बघायचा ना..? मी माहेरपण केले असते..माझ्या स्वप्नसाठी धडपडणारी तूच तर होतीस..कुठे ही तयार असायची क्लास लावायला..किती ही फी द्यायची तयारी ठेवायची..मग मला थोडा तरी हक्क देऊन बघायचा..मावशी असेल ना मी त्याची...की त्याला सांगून ठेवलेस तुझे कोणी नाही..मामाचे गाव नाही.."

मेधा आता रडू लागली होती , चारही भावंडे आता सोबत येऊन रडत होते..

"मी त्रास देऊ पण कोणत्या नात्याने असे वाटत होते..सासूला वाटते ही कसले आले माहेर ,माहेर नाही, माहेरची माणस विचारत नाही मग त्रास दया कोण जाब विचारायला येईल..मी असा सतत सासुरवास सहन करते ,त्या बिकट मनस्तीतीत असते ,राग राग ,चिडचिड होत असते ,ह्यांच्या वर राग काढते...पण कोणाला काही बोलू शकत नाही...म्हणूज ठरवले तुम्हाला ही नको सांगायला अगदी शेवटी सांगू... माहेरी येऊ..पण काल मला दादाने मेसेज केला आणि माहेरी ये असा निरोप दिला आणि मला रहावले नाही..."

अरविंद लगेच सगळ्यांना सांगतो..

"मेसेज प्राचीने केला होता माझ्या वतीने. "


सगळे बघतच राहिले ,आणि मेधा ही म्हणाली "हो वहिनीने मेसेज केला ,आणि वाटले वहिनी बोलवत आहे म्हणजे ती नक्कीच चांगल्या मनाने बोलवत आहे..तसे ही एक छोटासा इशारा हवा होता ह्या माहेरवाशीण लेकीला..माहेरकडून एक आमंत्रण हवं होतं ,सासूला दाखवायला की माझ्या माहेरचे माझी काळजी घेतात.."


मेधा रडू लागली तेव्हा विणाला कळले वहिनी किती चांगली आहे...किती कठीण असते लोकांच्या घरी सासुरवाशीण म्हणून रहाणे...माहेर किती महत्वाचे ठरते लेकीसाठी..एक सुरक्षा कवच ..

"मी तुझी सगळी काळजी घेईन ,आता तू तसल्या सासरी जायचेच नाही.." वीणा

"मला ही इच्छा आहे..आणि मी राहू शकेल पण .."

पण कोणाची परवानगी हवी असेल मेधाला माहेरी राहण्यासाठी...?