Login

पातळ भाजी भाग 37

पातळ
पातळ भाजी
भाग 37

"मेधा ताई तू आता कसलीच काळजी करायची नाही..आम्ही आहोत ना तुझी एकदम खास काळजी घ्यायला..." रोहित


मेधाला आता ही एकच भीती होती ,सगळे असतील ही ,काळजी घेतली ही पण काकुला पटायला हवे..खरे तर तिने होकार द्यायला हवा..ती हो म्हणताच मी मेहरपणाला एका पायावर येईल पण तेच होत नाही कधी..तिला आठवूनच माहेर नको ,माहेरपण नको वाटत आले आहे..

"कोणाची परवानगी हवी आहे ,आम्ही सगळे हो म्हणत असताना.." वीणा लगेच म्हणाली

"बाळा तू लहान आहेस ग.." मेधा

इतके बोलत असतांना प्राची त्यांचे प्रेमाचे मायेचे बोलणे ऐकत उभी होती ,हे चौघे भाऊ बहीण किती जोडलेले आहे एकमेकांसोबत..माया आणि प्रेम..यापलीकडव खूप सारी काळजी घेतात हे ..म्हणजे मला अगदी योग्य सासर मिळाले आहे तर..तिला खात्री पटली की इथे आई सोडून सगळे जण सारासार विचार करणारे आहेत ,मला घाबरायची गरज नाही..कोणाला काही झाले की भाऊ भाऊ बाजू घेतात..

आई स्वयंपाक घरात येत होती ,तेव्हा तिला कळले सगळी गँग मेधा आणि प्राची सोबत गप्पा मारत उभी आहे..

त्यांनी मोर्चा वळवला आणि लगेच तिकडूनच आवाज देत आल्या ,"प्राची झाले असतील लाडू तर जरा फॅन खाली घेऊन येशील.."

तोच सगळ्यांनी पांगा पांग केली..लाडू वळवायला सोपे होते ,कुटून कुटून तीळ आणि गूळ एकत्र मुरले होते ,जसे हे बहीण भाऊ एकमेकांत मुरले होते..आता फक्त आकार घ्यायचा होता..तो कर्तव्याचा आकार घेऊन यांची माया ही खरी आहे हे सिद्ध करायची ही वेळ होती..

"लाडू वळतांना मी बघू शकतो का माझ्या ताईला.?" अरविंद

"ताईला नाही बायकोला म्हंटले तरी माझी हरकत नाही.." मेधा

"हो अर्ध्यावर सगळे लाडू खाऊ नका म्हणजे झालं.नाहीतर तुमची मोमा मला म्हणायची मी खाल्ले म्हणून..मी मग गप्प नाही बसणार आणि सांगून टाकेन तुमच्या थोरल्या मुलाने खाल्ले आहे.." प्राची

तो तर बघत राहिला ,बघा लाडाची बायको आणि बहीण गरीब माणसाला लाडू ही वळू देत नाही ,मदत करावी करू देत नाहीत...

"आई आलेच लाडू घेऊन.." प्राची मागे बघून मुद्दाम म्हणाली

तसा तो घाबरला आणि मेधा ही हसू लागली..

"तुमचं असच छान जमो.. प्रेम वाढत जावो.."

"बघ माझी ताई ,अजिबात हातातील काम सोडत नाही ,आणि तू तीळ जाळून ठेवले त्यात हात ही जाळून घेतला...नवऱ्याने किती किती काळजी घेतली ,तीळ तसेच ठेऊन बायकोला घेऊन बाहेर गेला..हॉटेल मध्ये जेवून आलो..मस्त दिवस घालवला म्हणजे तिच्या वेदना विसरून जाईल.. त्यात हवे त्या खायच्या मिठाई घेतल्या,आई रागावते माहीत असून ही बजेट च्या बाहेर खर्च केला खास बायकोला हे घर सासर कमी माहेर वाटावं म्हणून..."

हे बोलत असतांना आई बाहेर उभी राहून ऐकत होती ,राग आला होता हे असले दोघांचे खोटे समोर आल्यावर ,आणि खुद आपलाच मुलगा तिला साथ देत आहे हे पाहून...तिच्या सांगण्यावरून खर्च करून आला ,हॉटेल मध्ये जेवण करून आले..आणि इथे हात भाजल्याचे नाटक करत राहिले..

"छानच पांग फेडलेस.. अशी नाटक करायला थोडी लाज नाही वाटली..?"

"आई हे तर होत असते..ती माझी बायको आहे इतके तर मी करेनच तिच्या साठी..उद्या कोणी ही नाव ठेवेन की इतके होऊन ही डॉक्टर कडे गेलो नाही तर...आणि मी घरी होतो म्हणून तिला घेऊन गेलो ,नसतो तर ती सहन करत बसली असती..तुला ते सहन करणारी सून हवी होती ,तिने हे निमूटपणे सहन करावे अशी इच्छा होती का तुझी ??. असेच विचार आता मला तुमच्या पासून दूर घेऊन जाणार आहेत ,आणि हे खूप आधीपासूनच ठरवले आहे..म्हणूनच मी अमेरिकेची नौकरी स्वीकारली आहे...आणि महिन्यात मी तिकडे जाईल.. व्हिसा ही तयार आहे आमचा...तुला सांगणार नव्हतो का तर वाईट वाटेल, पण आता तूच स्वतः दूर करतेस सगळ्यांना तर काय म्हणावे.."

प्राची आणि मेधा बघतच होत्या ,त्यांना ही बातमी खुश खबर समजावी की वाईट कळत नव्हते
.प्राची कुठे जरा मिळून मिसळून गेली होती ,कळले होते तिच्या सासरी मिळून मिसळून एकोप्याने राहणारे लोक आहेत जे आपली माणसं होत चालली आहेत ,तिचा उत्साह वाढला होता ,कामात मन लागत होते ,मेधा सोबत छान मैत्री जमली होती ,पुढे वीणा चे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द आणि ध्यास जडला होता ,आणि तितक्यात हे होईल असे वाटले नव्हते...

"आपण अमेरिकेला का जायचे..? म्हणजे आपण जायचेच का ?? मला तर इथे ही छान वाटत आहे..मी सांभाळून घ्यायला शिकले आहे..मी हळूहळू आपली जागा ह्या घरात समजून घेत होते ..मलाच त्रास होतो असे नाही ,बघ ना मेधा ताईंना ही झालाच होता..पण जमतंय ना त्यांना .."

तो लगेच म्हणाला..

"जमतंय मेधा ताईला त्या सासर घरात ?? तिला तर हे घर ही जमून घेत नाही..तिला तर कुठेच जागा नाही...ना माहेरी ,ना सासरी..? ती पोटुशी आहे हे ही ह्यांना माहीत नाही..सासर सोपे नाही...बघ आधीच तिने तक्रार केली असती ,गप्प बसली नसती तर आज परिस्थिती वेगळी असती..आम्ही आवाज उठवला असता ,त्यांना समजावले असते...पण हीच गप्प बसून ऐकून घेत आली..होईल माझी जागा ह्या घरात एक ना एक दिवस म्हणत सहन करत बसली..नवरा आईला बोलून दुखवणारा नव्हता मग सहन कोणी करायचे तर बायकोने..जिला मानसिक असा आधार ही तो होऊ शकला नाही..तो आईचा खेळणा होऊन बसला ,तशी गत तुझी नको व्हायला..म्हणून आपण जात आहोत अमेरिकेला.."

सासू ही आता गप्प गप्प होती ,मुलगा सोडून जात आहे म्हंटल्यावर मन उदास झाले..आता काही केल्या निदान महिना भर तरी सुखात नंदवू आपण प्राचीला ही आणि मेधाची ही काळजी घेऊ..आता उतार वयात मुलं देश सोडून जात असतील तर हे लेकीचे नाते जोडून ठेव ही शपथ घेऊन बाहेर आल्या..

नांदवतील का महिना भर तरी सुखात प्राचीला ,घेतील का मेधाची जबाबदारी लेक म्हणून..करतील का बाळंतपण की प्राची घेईल ही जबाबदारी...की वीणा आपल्यावर ही जबाबदारी आनंदाने स्वीकारेन...?

क्रमशः
0

🎭 Series Post

View all