Login

पिकनिक भाग ११, - अस्तित्वाचा लढा

“५० वर्षा नंतरच्या काल्पनिक गोष्टी सांगते आहेस. उद्या तू म्हणशील की माणूस चंद्रावर राहायला गेला. कसा विश्वास ठेवायचा आम्ही?” – काका.
पिकनिक भाग ११
अस्तित्वाचा लढा.
“काय सांगता? पंतप्रधान तर जवाहरलाल नेहरू आहेत. सरसंघचालक गुरुजी आहेत. तुम्ही भलतीच नावं घेत आहात. छे कठीण आहे. विशाल तुझं डोकं तर फिरलं नाही ना? की हा काही फसवा फसवीचा उद्योग आहे?” – केशवराव.
“नाही काका, असं अजिबात नाहीये. आम्ही काय करावं म्हणजे तुमचा, आणि सर्वांचा विश्वास बसेल?” – विदिशा.
“विदिशा, जेंव्हा पुरुष माणसं बोलत असतात, तेंव्हा आपण मधे बोलू नये.” – काकू.
विदिशा हिरमुसली, पण हे १९६० साल आहे हे लक्षात आल्यावर, गप्प बसली.
“आता आम्ही काय सांगणार? तुम्हालाच सिद्ध करायचं आहे. तुम्हीच विचार करा. असं काही सांगा म्हणजे आमचा विश्वास बसेल.” – काका.
विशाल गप्प बसला. त्याला काही सुचतच नव्हतं. काही वेळ गेला, मग काकाच म्हणाले,
विशालला काही सुचत नाहीये, विदिशा तू प्रयत्न कर.” – काका.
विदिशाने काकूंकडे पाहिले, त्यांनी संमती दर्शक मान डोलावली. मग विदिशा बोलली,
“काका, आज मुंबईत जश्या वि‍जेवर चालणार्‍या लोकल गाड्या आहेत, तश्याच वि‍जेवर चालणार्‍या लांब पल्ल्याच्या गाड्यांचं जाळं देशभरात आमच्या काळात म्हणजे २०१० साली झालं आहे. ही ५० वर्षात झालेली प्रगती आहे.” – विदिशा.
“५० वर्षा नंतरच्या काल्पनिक गोष्टी सांगते आहेस. उद्या तू म्हणशील की माणूस चंद्रावर राहायला गेला. कसा विश्वास ठेवायचा आम्ही?” – काका.
“करेक्ट, काका आता आठवलं. १९६९ मधे अमेरिकेच्या अपोलो ११ या अवकाशयांना मधून नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर उतरणारा पहिला मानव होता.” – विशाल.
“म्हणजे ९ वर्ष थांबावं लागेल, सत्यता पडताळून बघायला. नजीकच्या भविष्यकाळात काही घटना घडल्या असतील तर सांग. की ज्याची पडताळणी करता येईल.” – काका.
“काका असं तारीख वार कसं सांगता येईल? हां आठवलं. काका १९५७ साली रशिया ने लायका नावाची कुत्री अंतराळात पाठवली होती हे तुम्ही वाचलं आहे का?” -विशाल.
“हो ते आम्हाला माहीत आहे. पण हे भूतकाळातलं झालं. जे आम्हाला माहीत आहे ते का सांगतो आहेस?” – काका.
“नाही मी फक्त पृष्ठभूमी सांगितली. आता एप्रिल १९६१ मध्ये रशिया ने युरी गागारीन नावाच्या माणसाला अंतरिक्षात पाठवलं तो पृथ्वीच्या चार फेऱ्या मारून परत पृथ्वीवर आला. आता डिसेंबर चालू आहे. फक्त चार महीने थांबा. प्रचिती येईल.” – विशाल.
“डिसेंबर १९६१ मध्ये भारतीय सैन्याने गोवा, दमण आणि दीव हे पोर्तुगीजांच्या पासून मुक्त करून भारतीय संघ राज्यात, केंद्र शासित राज्य म्हणून सामील केलं.” – विदिशा.
“१९६२ च्या ऑक्टोबर मध्ये चीनने भारतावर आक्रमण केलं. लद्दाख आणि अरुणाचल म्हणजे आताचा नेफा या भागात युद्ध सुरू झालं. या युद्धात भारताची दारुण हार झाली. लद्दाखचा अकसाई चीन हा ५०००० चौरस मैलांचा भारताचा प्रदेश चीनने बळकावला. २०१० पर्यन्त सुद्धा भारत तो प्रदेश परत घेऊ शकला नाहीये.” – विशाल.
“विशाल काय बोलतो आहेस तू? अरे, हिन्दी चिनी भाई भाई चा केवढा उदो उदो चालला आहे. आत्ताच एप्रिल मध्ये चीन चे पंतप्रधान चौ एन लाय भारतात येऊन गेले. पंचशील तत्त्व दोन्ही बाजूंनी स्वीकारली आहेत. आणि तू म्हणतो आहेस की चीन ने आक्रमण केलं?” – काका.
“हो काका, चीनने विश्वासघात केला. पंडित नेहरूंना हा धक्का सहन झाला नाही आणि आणि ते आजारी पडले ते उठलेच नाहीत. त्यांनी २७ मे १९६४ ला देह ठेवला. त्यांनी संसदेत माफी सुद्धा मागीतली.” – विशाल.
“बापरे, विशाल तू काय एकेक भयंकर भविष्यवाणी करतो आहेस, डोकं चक्रावून गेलं बघ.” – काका.
“भविष्यवाणी नाही काका, हे सर्व घडलेलं आहे. पण आता तुमच्या आयुष्यात घडणार आहे. तुमच्या साठी हे भविष्य असलं तरी आमच्या साठी हा इतिहास आहे.” – विशाल.
विशालच्या या बोलण्यावर कोणीच काही प्रतिक्रिया दिली नाही. थोडा वेळ शांततेत गेला. मग काका म्हणाले,
“ठीक आहे आपण एप्रिल पर्यन्त वाट बघू. रशियाने कोणाला अवकाशात पाठवलं? काय नाव म्हणालास त्याचं विशाल?” – काका.
“युरी गागारीन” – विशाल काही बोलण्याच्या आधीच विदिशाने उत्तर दिलं.
“हां तोच तो. बघू आपण. नाव काल्पनिक असतं तर विदिशाला नाव नसतं सांगता आलं. पण तसं झालं नाही म्हणजे तो खरं बोलत असावा असं मला वाटतं.” – काका म्हणाले आणि हसले. त्यांचं हास्य पाहून विशाल आणि विदिशा थोडे रीलॅक्स झाले.
“पण विशाल आता तुम्ही काय करणार आहात? काही पोटा पाण्याचा उद्योग तर करावा लागेल.” – काका
“खूप गहन प्रश्न आहे काका. मी अॅडव्हान्स इकनॉमिक्स मध्ये मास्टर्स डिग्री घेतली आहे. आताच्या काळात हे शिक्षण गैरलागू आहे. विदिशाचा पण हाच प्रॉब्लेम आहे तिची पण हीच डिग्री आहे. म्हणजे आम्ही उच्चशिक्षित असलो तरी आजच्या काळानुसार निरक्षर आहोत. कवडीची किंमत नाही आमच्या शिक्षणाला. शेतीची कामं आम्हाला येत नाहीत. मुंबईत छोटं मोठं काम मिळेलही पण राहण्याचा प्रश्न आहे. म्हणजे आमची घरं असूनही आम्ही बेघर आहोत. काय करावं तेच समजत नाही. भीकच मागावी लागेल असं वाटतं आहे. तशी एकदा मागून झालीच आहे आता सवय करावी लागेल.” विशाल अतिशय निराशेने म्हणाला.
“भीक मागून झाली आहे? म्हणजे काय?” – काका.
“या रघुनाथ दादांच्याच जवळ मागितली. आम्हाला काही तरी खायला द्या तीन दिवस पोटात अन्न पाण्याचा कण नाही, अशी विनवणी केली होती. दादांचा जीव कळवळला म्हणून पोटात दोन घास तरी पडले. नाही तर चार दिवसांनी इथल्या पेपर मध्ये भूकबळी म्हणून आमचे फोटो आणि बातमी आली असती. आयुष्यात कधी असा प्रसंग ओढवेल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं.” – विशाल.
विशाल बोलत असतांना विदीशाला डोळ्यातलं पाणी रोखता आलं नाही आणि तिला रडताना बघून काकू आणि रोहिणीने सुद्धा डोळ्यांना पदर लावला. काका सुद्धा भाव विवश झाले.
“तुमचं अमरावतीला घर आहे म्हणालास. तिथे गेलात तर सर्व ठीक होईल. पैशांची सोय मी करतो त्यांची काळजी करू नकोस.” – काका.
“नाही काका, आत्ता तिथे आजोबांचं राज्य असेल, आणि आमचे बाबा केवळ ९-१० वर्षांचे असतील. मी कसं पटवून देणार की ९ वर्षांच्या मुलाचा मी मुलगा म्हणून?” – विशाल.
“आत्ता आमचं घर कुठे असेल ते माहीत नाही. नांगपूरचं घर बाबांनी १९७८ साली बांधलं. माझा जन्मही तिथलाच. पण आत्ता ६० साल चालू आहे.” – विदिशा.
“सगळंच विचित्र होऊन बसलं आहे. ते काही नाही, अहो, या पोरांना इथेच राहू द्या. काही तरी मार्ग निघेलच. आणि तसंही आपल्याला दोन माणसं काही जड नाहीयेत. माझं एवढं ऐका.” काकू.
“हो दादा मलाही वहिनीचं पटतंय राहू द्या न यांना. विदिशा सारख्या मुलीला जा म्हणण जिवावर येतं आहे.” – रोहिणी.
“कमाल आहे, मी कुठे त्यांना घराबाहेर काढायला निघालो आहे. मलाही भावना आहेत. तसे हे दोघंही हुशार आहेत. स्वस्थ बसणार नाहीत.” – काका.
“ठरलं तर मग. ऐका रे पोरांनो, तुम्ही कुठेही जाऊ नका. इथेच रहा.” – काकू.
“काकू खूप मोठं मन आहे तुम्हा सर्वांचं.” पुढे तिला बोलणं शक्य झालं नाही गळा भरून आला होता.
रात्रीची जेवणं झाल्यावर विशाल म्हणाला,
“मला शिकवाल आयुर्वेद? म्हणजे माझ्या बुद्धीचा तिकडे वापर होऊ शकेल असं वाटतं. आणि माझी पण इच्छा आहे. तुमचं मन खूप मोठं आहे पण आळशा सारखं बसून राहणं मला आवडणार नाही.” – विशाल.
“अरे आयुर्वेद इतका सहजा सहजी येणार नाही त्याकरिता संपूर्ण शरीर रचनेचा अभ्यास करावा लागेल. किती तरी वर्ष जातील, चिकाटी असेल तरच हे साध्य होईल. तयारी आहे का?” – काका.
“आहे, चिकाटी आहेच.” – विशाल.
“ठीक आहे उद्या पासून रघुनाथच्या बरोबर रहा. हळू हळू आत्मसात कर. यात घाई करून अजिबात चालत नाही.” – काका.
विशाल खुश झाला. विदिशा तिथेच होती, तिने थंब्स अप केलं.
“काकू, मी काय करू?” – विदिशा.
काही करू नकोस. अग जशी माझी संपदा तशीच तू.” – काकू.
मला स्वयंपाक उत्तम येतो असं माझे सर्वच सहकारी म्हणतात. माझा डबा हा माझा कधीच नसतो. सार्वजनिक असतो. मी स्वयंपाकात मदत करू का?” – विदिशा.
“नको नको,” रघुनाथ म्हणाला. “तुझा स्वयंपाकातलं कौशल्य म्हणजे २०१० मधलं. आमच्या आवडी निवडी कश्या जुळतील? तू वरची छोटी मोठी जबाबदारी सांभाळ.”
विदीशाचा चेहरा पडला. ते पाहून काकू हलकेच म्हणाल्या,
“नको अशी हिरमुसली होऊस. मी आहे ना, काळजी करू नकोस. मी देईन तुला एखादा पदार्थ बनवायला.” – काकू. मग विदीशाचा चेहरा उजळला.
क्रमश:----
पुढचा भाग उद्या – कसोटी

दिलीप भिडे.
0

🎭 Series Post

View all