Login

पिकनिक भाग १४. पुन्हा एक वळण

“मग काय विचार ठरला विशाल. सकाळी तु आणि विदिशा बराच वेळ खल करत होता असं कानावर आलं आहे. मग निष्कर्ष काय निघाला?” – काका.
पिकनिक भाग १४
पुन्हा एक वळण
विशालच्या बोलण्यावर एकदम शांतता पसरली. नाही म्हंटलं तरी दडपण आलं आहे हे सर्वांच्या चेहऱ्यावर दिसताच होतं. मग रघुनाथ म्हणाला,
“ठीक आहे लिखाण रद्द. पण आम्हाला सर्वांना उत्सुकता आहे. तू आम्हाला सांगू शकतो. पण सांगायचं की नाही हे तू ठरव.” – रघुनाथ.
“ठीक आहे पण आम्हाला थोडा वेळ द्या विचार करायला. मी विदिशाशी बोलतो आणि सांगतो. चालेल न?” – विशाल.
तो दिवस तसाच गेला. विशाल बराच विचार करत होता, तरीही त्यांच्या मनाचा कौल काही येत नव्हता. लिहावं की नाही हे ठरतंच नव्हतं. शेवटी विदिशाशी बोलावं असा विचार केला. पण विदिशा बायकांच्या गर्दीत हरवली होती. तिच्याशी निवांत बोलायला वेळ मिळणं दुरापास्त होतं. विदिशाने कामाला इतकं का जुंपून घेतलं हेच त्याला कळत नव्हतं. शेवटी उद्या बघू असा विचार करून तो झोपायला गेला.
दुसऱ्या दिवशी विदिशा त्याला भेटली ते, ती त्याला बंबातून आंघोळीचं पाणी काढून द्यायला आली होती तेंव्हा. तसं विशाल स्वत:च ते घेऊ शकला असता, पण कपडे आणि आंघोळीचं पाणी बायकोने काढून द्यायची पद्धत होती. पण म्हणून तर रोज थोडं का होईना, दोघांच आपसात बोलणं व्हायचं. ती पाणी काढत असतांना विशाल म्हणाला,
“विदिशा काय करू? मला काही सुचत नाहीये, तुझं काय मत आहे?” – विशाल.
“मी पण काल रात्री विचार केला, आणि एका निष्कर्षावर येऊन पोचले. तू असं कर, एक डिसक्लेमर लिही.” – विदिशा.
“म्हणजे काय लिहायचं?” – विशाल.
“तू असं लिही की या सगळ्या घटना मला स्वप्नात जाणवल्या. या भविष्य काळात घडणाऱ्या घटना असल्यामुळे मी लिहून ठेवत आहे. हे भविष्य कथन नाही. हे स्वप्नात जे दिसलं आणि जाणवलं, ते लिहून ठेवलं आहे. याचा कुठलाही पुरावा मी देऊ शकत नाही. जर प्रसंग मला जसे दिसले, तसेच भविष्यात घडले, तर तोच पुरावा समजावा. मी याची कुठलीही जबाबदारी घेत नाही.” – विदिशा.
“असं लिहिल्यावर काही आच येणार नाही असं तुला वाटतं? – विशाल.
“हे स्वप्नकथन आहे हे तू स्पष्ट केल्यावर नाही येणार. निदान मला तरी असंच वाटतं. आणि यात काळाचा उल्लेख करू नकोस.” – विदिशा.
“आणि दादा म्हणाले ना की ते लिखाण देवघरात ठेवतील म्हणून.” – विदिशा.
“ठीक आहे तू म्हणतेस तसं. मग आज पासूनच रोज एक घटना मी सांगायला सुरवात करतो. तुला जर काही आठवलं तर तू ही सांग.” – विदिशा.
“चालेल. विशाल मला एक गोष्ट जाणवली, तुझ्या काही लक्षात येतंय का?” – विदिशा
“नाही काही विशेष असं काही जाणवलं नाही. तू काय म्हणतेस?” – विदिशा.
“आपल्याला मधल्या पन्नास वर्षात घडलेल्या घटना स्वच्छ आठवत आहेत. यांचा काय अर्थ लावशील तू?” – विदिशा.
“अरे हो, यांचा तर मी विचारच केला नाही. तू केलास का? मग तू काय निष्कर्ष काढला आहेस?” – विशाल.
“मला असं वाटतं की आपण 50 वर्ष अलीकडे येऊन पडलो आहोत, तर आपली स्मृति पण पुसली जायला पाहिजे कारण त्या सगळ्या प्रसंगातून आपण आता जाणार आहोत. पण तसं जर झालं नाहीये, तर आपण अजूनही आपल्या काळाशी बांधल्या गेलो आहोत. आणि यांचा अर्थ आज ना उद्या, वर्षभराने केंव्हातरी आपण आपल्या काळात परत जाणार आहोत. कसे ते मला माहीत नाही. पण जाणार हे नक्की.” – विदिशा.
“काकू, हे दोघं आंघोळ करायच्या ऐवजी विहिरीवर गप्पा मारत बसले आहेत, मी जाऊन सांगू का आटपा म्हणून?” – रोहिणी
“नको, कालच विशाल म्हणाला नाही का, की विदिशाशी बोलून ठरवतो की सांगायचं की नाही, मग त्यावरच बोलत असतील. बोलू दे त्यांना. निर्णय झाला की घेतील आपोआप आटोपतं” – काकू.
“विदिशा तू खरंच खूप हुशार आहेस. माझ्या डोक्यातच हे आलं नाही. पण समजा आपण परत गेलोच नाही, तर ही स्मृति पुसट होईल का? आणि हळूहळू सर्व विसरून जाऊ का?” – विशाल.
“मला माहीत नाही. पण असं नाही होणार. कारण काळानुसार आपलं वय वाढत जाईल आणि या हिशोबाने २०१० मध्ये आपण ७० आणि ७५ वर्षांचे होऊ, पण त्या वेळेस आपण तर २५ आणि ३० वर्षांचे होतो. नियती हा गुंता होऊच देणार नाही. आपण परत जाणारच आणि ते ही लवकर.” – विदिशा.
“तुला एवढी खात्री वाटते आहे तर मग लिहून द्यायला काहीच हरकत नाही. कोणाला दाखवायची वेळ आलीच, तर त्या वेळी आपण इथे असणारच नाही.” – विशाल.
“करेक्ट आहे. ठरलं तर मग. पण तरी सुद्धा तू डिसक्लेमर लिहिच. ते विसरू नकोस. कसही झालं तरी आपण सेफ साइड ला असलं पाहिजे.” – विदिशा.
त्या दिवशी दुपारी खाणं पिणं झाल्यावर बैठक भरली.
“मग काय विचार ठरला विशाल. सकाळी तु आणि विदिशा बराच वेळ खल करत होता असं कानावर आलं आहे. मग निष्कर्ष काय निघाला?” – काका.
“ठीक आहे. विदिशाच्या मते, सुरवातीलाच एक डिसक्लेमर लिहायचं, आणि मग प्रसंग लिहायचे.” – विशाल.
“म्हणजे नक्की काय?” – रघुनाथ.
“डिसक्लेमर महजाणजे जे आपण लिहितो आहे, त्यांची जबाबदारी टाळायची. आणि मग डिसक्लेमर मध्ये काय लिहिणार आहे ते सांगितलं.” – विशाल.
“हूं, म्हणजे ही भविष्य वाणी नाहीये हे तू स्पष्ट करणार आहेस. आणि दुसरं म्हणजे स्वप्नात जे जाणवलं ते लिहिणार म्हणजे जबाबदारी घेण्याचा प्रश्नच येत नाही. थोडक्यात काय सर्व करून सवरून आपण नामा निराळे. असंच ना?” - काका.
“हो काका. हे विदिशाचं डोकं, आणि मलाही पटलं. तुमचं मत सांगा.” – विशाल.
“एकदम बरोबर. मलाही पटलं. रघुनाथ तुला काय वाटतं?” – काका.
रघुनाथच काय सर्वांनीच होकारार्थी माना डोलावल्या
“म्हणजे आता सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. रघुनाथ त्याला वही आणि पेन दे. तू काय कर विशाल
आत्ता फक्त मथळा लिही, आणि प्रसंग आम्हाला सांग मग निवांत तो प्रसंग संक्षिप्त आवृत्ती मधे लिहून काढ. त्यात सर्व मोघम लिही. तारखा लिहू नकोस.” – काका.
“हो काका. मग आता सुरवात करतो.” – विशाल.
“तुम्हाला या आधी मी युरी गागरीन, भारत चीन युद्धं, गोवा मुक्ती संग्राम या बद्दल सांगितलंच आहे. आता इथून पुढे सुरवात करतो. तुम्हाला तारीख वार सांगतो पण लिहिणार नाही.” – विशाल.
“ठीक आहे कर सुरवात.” – काका.
“आता १९६२ चं युद्ध आपण हरलो, त्यानंतर संरक्षण मंत्री कृष्ण मेनन यांना जावं लागलं त्यांची जागा महाराष्ट्राचे विद्यमान मुख्य मंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांनी घेतली आणि श्री कन्नमवार नवीन मुख्य मंत्री झाले. त्या वेळेस खूप मोठे मथळे पेपर मधे आले होते, सह्याद्री हिमालयाच्या रक्षणा साठी धावून गेला असे.” – विशाल.
“इतक्या घडामोडी घडल्या. आणि तुझा तर तेंव्हा जन्मही झाला नव्हता, मग तुला हे सगळं माहीत आहे हे कसं काय?” – रघुनाथ.
“जिज्ञासा दादा. तसाही मी इतिहासाचा अभ्यासक आहे.” – विशाल.
“हा विश्वासघाताचा इतका मोठा धक्का आपले प्रधान मंत्री पंडित नेहरू सहन करू शकले नाहीत. त्यांनी संसदेत देशाची माफी मागीतली. पण ते नंतर फार काळ जगू शकले नाहीत. २७ मे १९६४ रोजी त्यांचा मृत्यू झाला.” – विशाल.
“तू म्हणतोस ते बरोबर आहे. हे आत्ताच्या काळात लोकांना पटणार नाही.” – काका.
“मग लाल बहादूर शास्त्री, जे आता गृह मंत्री आहेत, ते पंत प्रधान झाले. त्यावेळेस बराच गदारोळ झाला होता. कारण शास्त्री हे बुटके, लहानखुरे आणि अत्यंत मितभाषी होते. ते एवढी मोठी जबाबदारी कसे सांभाळू शकतील का हाच प्रश्न सर्वांसमोर होता. पण शास्त्रीजी अतिशय कणखर होते. गांधी वादी विचारांचे सच्चे पाईक होते. आणि याचा प्रत्यय लवकरच आला.” – विशाल.
“प्रत्यय येण्या सारखं असं काय घडलं?” – काका.
“जेंव्हा स्वातंत्र्य मिळालं तेंव्हा देशा अत्यंत बिकट परिस्थितीतून जात होता. नेहरूंचा फोकस विकासावर होता, कारण विकास झाला तरच देशाची भरभराट होईल, अशी त्यांची धारणा होती.” – विशाल.
“”विशाल अरे तू भरकटतो आहेस. शास्त्री बद्दल सांगता सांगता मागे वळून नेहरू युगात पोचलास. नेहरूंनी पंच वार्षिक योजना आणल्या, भाकरा नांगल सारखी मोठी धरणं बांधताहेत, भिलाई बोकारो सारखे स्टील प्लांट उभारताहेत. हिंदुस्थान मशीन टूल बद्दल तर आम्हाला अभिमान वाटतो आहे. हे सर्व चालू आहे आणि आम्हाला माहीत पण आहे. तू पुढे सांग.” – काका.
“ठीक आहे. पण मोठ मोठ्या योजनांसाठी प्रचंड पैसा खर्च होत होता आणि त्यामुळे सैन्या च्या गरजा दुय्यम झाल्या. या काळात पाकिस्तान ला अमेरिकेने अत्यंत आधुनिक सॅबर जेट सारखी विमानं आणि पॅटन टॅंक सारखे अत्याधुनिक रणगाडे दिले. भारत चीन बरोबर युद्ध हरला होता त्यामुळे पाकिस्तानचे सर्वेसर्वा अयुब खान यांना वाटलं की आपण सहज हिंदुस्थान पादाक्रांत करू, म्हणून त्यांनी १९६५ मध्ये भारतावर हल्ला केला. अत्याधुनिक सामग्री मुळे सुरवातीला त्यांची सरशी झाली पण नंतर भारतीय सैन्याने त्यांना धूळ चारली. शेवटी गलितगात्र पाकिस्तानने तहाची मागणी केली. बोलणी ताश्कंद मध्ये झाली. पण तिथे शास्त्री यांचा रहस्यमय मृत्यू झाला.” – विशाल.
“बापरे, असं झालं? परदेशांमध्ये घटना घडल्या मुले, कोणाचा हात होता यामधे हे कळलं का?” – काका.
क्रमश:----
पुढचा भाग उद्या – पुन्हा एक वळण २

दिलीप भिडे.
0

🎭 Series Post

View all