Login

पिकनिक भाग १७. विदिशा

“पण साहेब ते असं का करतील. आम्ही तर त्यांचं लग्न लावून द्यायला तयार होतो. मग ते का पळून जातील?” – काका.
पिकनिक भाग १७
विदिशा.
सगळे जण स्तंभित होऊन विदिशा कडे बघत होते. विदिशाचा चेहरा उजळला होता. ती डिप्रेशन मधून बाहेर आली होती. काकूंचा उद्देश सफल झाला होता.
विदिशा आता पूर्वपदावर आली होती. प्रश्न मिटला होता. दिवस सरत होते. १९६२ साल होतं गणपती होऊन गेले होते आणि आता नवरात्र, दसरा आणि दिवाळीची वाट होती. त्या दिवशी काकूंना थोडा ताप होता म्हणून त्या झोपून होत्या. रोहिणी स्वयंपाक घरात कामं उरकत होती. ओसरीत काका आणि रघुनाथ आलेल्या रुग्णांना तपासून औषध योजना करण्यात गढले होते. विदिशा संपदाला म्हणाली की चल आपल्याला विहीरीतून पाणी शेंदून हौद भरून ठेवायला हवा. आणि त्या दोघी विहिरीकडे गेल्या.
आधी संपदा पाणी काढत होती आणि विदिशा बादल्या भरल्यावर परसदारी जाऊन हौद भरत होती. थोड्या वेळाने कामाची अदलाबदली झाली. विदिशा ने रहाटाचा ताबा घेतला. थोडा वेळ सर्व सुरळीत चालू होतं. विदिशा पाणी काढायची आणि संपदा हौद भरायची. पण मधेच काय झालं कोणास ठाऊक, विहीरच्या कडेवर ठेवलेला विदीशाचा पाय घसरला आणि हातातून दोर निसटला, भरलेली बादली धाडकन विहिरीत पडली. त्याचा विदीशाला पण झटका बसला आणि ती पण तोल जाऊन विहिरीत पडली. संपदा अवाक होऊन बघत होती, ती किंचाळली.
“बाबा, काका, विदिशा ताई विहिरीत पडली.”
संपदा खूपच घाबरलेली होती. तिच्या हातातल्या रिकाम्या बदलीतलं पाणी अजून थेंब थेंब गळत होतं. तिच्या डोळ्यासमोर विदिशा भरलेली बादली ओढत होती, पण विहिरीच्या कडेवरचा पाय घसरला आणि एका क्षणात ती विहिरीत पडली. “ताई” संपदा किंचाळली. तिने विहिरीत डोकावून पाहिले, क्षणभर तिला वाटलं—ताई हात हलवते आहे, पण लगेच पाण्यावरच्या बुडबुड्यांनी सगळं गिळलं. काहीच दिसत नव्हतं. तिचे हात पाय थर थर कापत होते. डोळ्या समोर अंधारी आली. आणि संपदा खाली कोसळली.
काका आणि रघुनाथ धावले, पाठोपाठ ओसरीवर असलेले रुग्ण सुद्धा धावले. एकच हाकाटी झाली. तो गोंधळ ऐकून आजू बाजूची माणसं पण धावत आली. कोणीतरी संपदाच्या चेहऱ्यावर पाणी मारलं आणि तिला भानावर आणलं.
“बादली काढा वरती.” – एक जण म्हणाला.
बादली वर काढल्यावर एकाने तो दोर रहाटाच्या खांबाला बांधला आणि दोर पकडून विहिरीत उतरायला सुरवात केली. तो उतरल्यावर दूसरा पण उतरला. विहीरीच्या तळाशी सुर मारून एक जण वरती आला, आणि त्याने कोणीच नाही असं ओरडून सांगितलं. मग दूसरा पण तळाशी गेला आणि वर आल्यावर त्याने पण पहिल्याची पुष्टी केली.
“अरे तू काय वेडा आहेस का? बाई विहिरीत पडली आणि तू म्हणतो आत कोणीच नाही? पुन्हा एकदा नीट बघ. पार तळाशी जाऊन बघ.” – काका.
दोघांनी पुन्हा सुर मारला. आणि तळाशी जाऊन तिथले दगड हातात घेऊन वर आले. दगड वर उभ्या असलेल्यांना दाखवून म्हणाले,
“हे बघा तळाचे दगड. पाण्यात कोणीही नाही.” –विहिरीत उतरलेली दोन माणसे म्हणाली.
“अरे विहीरीच्या भिंतीत किंवा तळाशी एखादी कपार आहे का बघा, त्यात कदाचित अडकली असेल. लवकर बघा.” – काका.
पुन्हा पाण्यात सुर मारल्या गेला आणि कुठेही कपार नाही हे कळल्यावर सर्वच निराश झाले. दोघं जण वर आले.
आता मात्र प्रश्न जटिल झाला होता. काकांनी मोर्चा संपदा कडे वळवला.
“काय झालं नेमकं सांग.” – काका.
“बाबा, मी इथेच बादली पाशी उभी होती. ताई पाण्याने भरलेली बादली वर ओढत होती. इथे विहिरीच्या कडेवर ठेवलेला ताईचा पाय घसरला आणि ती विहिरीत पडली. अगदी माझ्या डोळ्या समोर घडलं हे.” – संपदा रडत रडत म्हणाली. तिला हा धक्का सहन होत नव्हता.
“अरे मग गेली कुठे? विहिरीत तर ती नाहीये, मग घरात शोधा.” – काका.
अख्खं घर पालथं घालून झालं पण विदीशाचा पत्ता लागला नाही. पोलिस चौकी जवळच होती, कोणीतरी जाऊन पोलिसांना बोलावून आणलं. त्याने सगळी विचारपूस केल्यावर एकाला दोन गोताखोरांना बोलावून आणायला सांगितलं. त्यांनी पण तळाशी जाऊन खात्रीपूर्वक सांगितलं की विहिरीत बॉडी नाहीये. मग विदिशा गेली कुठे? सगळेच चक्रावून गेले. पोलिसाने बरेच आडवे तिडवे प्रश्न विचारले पण सर्वांनीच केशव शास्त्री आणि रघुनाथ बद्दल निर्वाळा दिला. तसे चौकीवर जे दोन पोलिस तैनात होते, ते बरेच वर्ष होते आणि केशव शास्त्री आणि रघुनाथला चांगलेच ओळखत होते. त्यांच्या कडून त्यांनी औषध पाणी पण बऱ्याच वेळेस घेतलं होतं. शेवटी त्यांनी तपास गुंडाळला. पण म्हणाले,
“पालघरला जाऊन याचा रीपोर्ट करावा लागेल. मग दरोगा साहेब जसं ठरवतील तसं होईल. ते पण विचार पुस करतील. तुम्ही तयारीत रहा.” असं म्हणून ते निघून गेले.
घरावर एकदम शोक कळा पसरली होती. कोणालाच हे कसं घडलं हे कळत नव्हतं. बराच वेळ गेल्यावर जेंव्हा फक्त घरातलीच मंडळी होती तेंव्हा, जे सर्वांना वाटत होतं त्याला रोहिणीने वाचा फोडली.
“दादा, जसा विशाल गेला तशीच विदिशा पण गेली असेल का?” – रोहिणी.
“हूं, तसं झालं असेल तर चांगलंच आहे. ती तिच्या राज्यात आनंदाने राहील. विशाल तिथे असेल आणि दोघे जण सुखाचा संसार करतील. पण खरंच तसं होईल का?” –काका.
“म्हणजे काय म्हणायचं आहे दादा तुला?” – रघुनाथ.
“विशाल आणि विदिशा वेगवेगळ्या काळात गेले असतील तर? इथे आले तेंव्हा एकाला दोघे होते, आता एकटे असतील. कश्या प्रकारच्या परिस्थितीला तोंड द्यावं लागेल माहीत नाही.” – काका.
आता नवीनच प्रश्नाला तोंड फुटलं होतं आणि त्याचं उत्तर कोणांजवळही नव्हतं. सगळेच चिंतित झाले. त्या दिवशी कोणीच जेवलं नाही.
दोन दिवसांनी दरोगा साहेब आले. उंच, आडदांड माणूस मोठ्या मिशा आणि चेहऱ्यावर कडक करारी भाव. पाहता क्षणीच दरारा वाटावा असे व्यक्तिमत्व. ते आले.
“घटना घडली तेंव्हा कोण जवळ होतं प्रथम कोणी पाहिलं?” – दरोगा.
संपदा समोर आली. जाम घाबरली होती. तोंडातून शब्द फुटत नव्हता. रोहिणीने तिला धीर दिला.
“तुम्ही मागे व्हा. तिला काहीही सूचना देऊ नका.” दरोगाने रोहिणीला सांगीतले. “तिलाच बोलू द्या. हूं, काय नाव तुझं पोरी?” दरोगाने संपदाला विचारले.
“संपदा” ती अजूनही थरथरत होती.
“काय घडलं ते नीट सविस्तर सांग .न घाबरता सांग.” – दरोगा.
मग संपदाने जसे घडले तसे सविस्तर सांगितले.
“गोताखोर साधारण किती वेळाने आले?” दरोगाने काकांना विचारले.
“आमचे १० मिनिटांत आले. मग चौकीवरचे पोलिस आले, त्यांचे अर्ध्या तासाने आले. पण कोणालाच विदिशा विहिरीत सापडली नाही.” – काका.
“एक मुलगी विहिरीत पडते, कोणी ढकललं तिला?” – दरोगा.
“कोण कशाला ढकलेल? आमच्या घरातलीच होती ती. सर्वांच्या जिव्हाळ्याची होती. हवं तर शेजारी चौकशी करा.” - काका
“चौकशी केली आहे. ती तुमच्या घरातली नव्हती. ती एक दिवस अचानक आली. कोण होती ती तुमची?” – दरोगा.
“ती एकटीच नव्हती साहेब, विशाल पण होता. त्यांच्या लग्नाला घरून विरोध होता म्हणून ते पळून आले होते. आम्हाला त्यांचा स्वभाव आवडला. ते वर्षभर आमच्या कडे राहिल्यावर आम्ही ठरवलं की त्यांचं लग्न लाऊन द्यायचं. विशाल हुशार होता तो वैद्यकी शिकत होता. पण त्याला कुठून कळलं माहीत नाही एक दिवस तो वडिलांची प्रकृती खूप खालावली आहे असं सांगून चालला गेला. आणि आज विदिशाचं असं झालं. कुठे गेली, कशी गेली कळायला काहीच मार्ग नाहीये साहेब.” – काका.
“कोणी तिला पळवलं असेल का? तुमचा कोणावर संशय आहे का?” – दरोगा.
“नाही साहेब.” – काका.
“का? विशाल जर इथे आला असेल आणि तो विदीशाला तुमच्या नकळत भेटला आणि दोघं ठरवून पळून गेले असतील तर? तसेही ते आधी सुद्धा पळूनच आले होते. या वेळेस पुन्हा.” – दरोगा.
“पण साहेब ते असं का करतील. आम्ही तर त्यांचं लग्न लावून द्यायला तयार होतो. मग ते का पळून जातील?” – काका.
“काहीतरी त्यांना न पटणारं घडलं आहे आणि तुम्ही ते आम्हाला सांगत नाही. ठीक आहे आम्ही सत्य शोधून काढूच. पण जर का त्यांच्या नाहीसे होण्यामागे तुमचा हात आहे हे सिद्ध झालं तर तुमची काही खैर नाही.” – दरोगा.
“अहो काय बोलता काय तुम्ही साहेब? आम्ही तिला मुलगी मानली होती, आम्ही का तिचा घात करू? आमची मुलगी दिसेनाशी झाली. आम्हीच होरपळतो आहोत आणि तुम्ही आमच्या वरच आरोप करता आहात? कमाल आहे तुमची.” - काका.
“एक मुलगी विहिरीत पडते आणि तिचं शरीर गोताखोरांना मिळत नाही ही बाब संशयास्पद आहे. याचा रीपोर्ट मला ठाण्याच्या एसपी साहेबांना द्यावा लागेल. मधल्या काळात जर तुम्हाला काही माहिती मिळाली तर ताबडतोब आम्हाला सांगा.” असं म्हणून दरोगा निघाले.

क्रमश:----
पुढचा भाग उद्या – विशाल.

दिलीप भिडे.
0

🎭 Series Post

View all