Login

पिकनिक भाग १९. पालघर

“विदिशा कुठे आहे?” शेवटी मिथीलाबाईच बोलल्या. “ती कुठे असणार? मी निघालो तेंव्हा ती तिथेच होती. पण आता कुठे आहे, कशी असेल, ते माहीत नाही.” – विशाल.
पिकनिक भाग १९
पालघर
फोन करून झाल्यावर ते ते परत हॉल मध्ये आले. म्हणाले की विदिशाचे आई वडील लगेच निघताहेत. रात्री १० वाजे पर्यन्त पोचतील. आणि मग त्यांनी विशाल आणि विदिशा नाहीसे झाल्यावर काय काय गोंधळ झाला ते सविस्तर सांगितलं. जमलेल्या सर्वांनाच तो इतिहास माहिती होता. रामचंद्ररावांकडून काही सुटलं तर त्या लोकांनी लगेच चुकीची दुरुस्ती पण केली. आता विशाल भांबावला.
“मी विदिशाला पळवलं असा संशय होता?” – विशाल.
“नाही तुझ्या ऑफिस मधल्या लोकांना आणि विदिशाच्या आई वडिलांना असं मुळीच वाटलं नाही. हा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. पण नंतर त्यांनाही पटलं की हे प्रकरण काही तरी वेगळंच आहे म्हणून.” – रामचंद्रराव.
रात्री विदिशाचे आई बाबा आले. पुन्हा सगळ्या गोष्टींची उजळणी झाली. विशाल वापस आला यांचा आनंद होताच पण आता कदाचित विदिशा पण भेटेल असा आशावाद होता. त्यांनी तसं बोलून पण दाखवलं.
“विशाल, आपण उद्या जर पालघरला गेलो तर विदिशा भेटू शकेल का? नाही म्हणजे तू म्हणतोस तसं तिचं वय आता ७५ च्या आसपास असेल, पण भेट झाली तर आमच्या मनाला शांती मिळेल.” – विदिशाची आई.
मग दुसऱ्याच दिवशी फ्लाइट घेऊन सर्व मुंबईला पोचले. विशालच्या फ्लॅट वर पोचल्यावर विशाल म्हणाला की आत्ता जेमतेम ११ वाजले आहेत, मी ऑफिस मध्ये जाऊन जरा अपडेट घेतो मग पालघरला जाऊ. पण बाकी कोणालाच ते मान्य झालं नाही. मग सगळे फ्रेश होऊन पालघरला जायला निघाले. पालघरला पोचेतो दुपारचे ३ वाजले होते. पोलिस स्टेशन मध्ये गेल्यावर,
“साहेब आम्ही एक वर्षांपूर्वी विशाल आणि विदिशा मिसिंग आहेत अशी तक्रार नोंदवली होती. तपास पण झाला होता पण कोणाचाही पत्ता लागला नाही. आता विशाल परतून आला आहे. म्हणून आम्ही तसा रीपोर्ट करायला आलो आहोत.” – रामचंद्रराव.
पोलिस इंस्पेक्टर राऊत साहेबांनी फाइल मागवली आणि म्हणाले,
“मीच होतो त्यावेळेस. मला चांगलं आठवतंय, खूपच वेगळा प्रकार होता तो. हूं, मग आता विशाल तुम्हीच सांगा नेमकं काय घडलं होतं त्या वेळी?” – इंस्पेक्टर राऊत.
मग विशालने सर्व कहाणी सविस्तर सांगितली. राऊत साहेब लक्षपूर्वक ऐकत होते.
“म्हणजे तक्रार नोंदवताना मराठेशाहीतल्या पगड्या घालून बोटीतून लोकं होते असं सांगितलं ते खरच होतं. त्यांनी तुम्हाला कसं ओढून नेलं?” – राऊत
“नाही साहेब आम्ही आमच्या नकळतच आपोआपच खेचल्या गेलो. कसे, ते आम्हालाही माहीत नाही.”– विशाल.
“तुम्ही गेले वर्ष दिड वर्ष इथे शेजारीच चिंचणीला होता, मग तेंव्हाच इथे पालघरला रीपोर्ट का नाही केला? आज दीड वर्षांनंतर का?” – राऊत.
“साहेब आम्ही ५० वर्ष मागे गेलो होतो, १९६० साल चालू होतं. काय सांगणार होतो आम्ही? कोणी विश्वास तरी ठेवला असतं का आमच्यावर? शिवाय, केशव शास्त्रीनी घरी आम्हाला सामावून घेतलं. आम्ही परत या जगात येऊ अशी अजिबात खात्री नव्हती म्हणून तिथेच राहून वैद्यकी शिकायचा निर्णय घेतला.” – विशाल.
“म्हणजे आपण आत्ता चिंचणीला गेलो तर विदिशा आपल्याला भेटण्याची शक्यता आहे असं आम्हाला वाटतंय” – विदिशाचे वडील.
सगळी वरात चिंचणीला पोचली. विशाल आता रस्ता दाखवत होता. घरा समोर येऊन विशाल थांबला, तो आश्चर्याने बघतच राहिला. तिथे वाडा नसून एक दुमजली घर होतं.
“इथे तर वाडा होता. काय झालं असेल?” – विशाल.
“विशाल, तुझ्याच म्हणण्या नुसार ५० वर्षा पूर्वी वाडा होता, तो पाडून हे घर बांधलं असेल. चल आपण आत जाऊन चौकशी करू.” – राऊत.
पण एवढी गर्दी आणि पोलिस बघून घरातूनच एक मध्यमवयीन माणूस बाहेर आला.
“काय झालं साहेब आपण कोणाला शोधता आहात?” – माणूस.
“आपण कोण आणि किती वर्ष इथे रहात आहात?” – राऊत.
“मी राजाराम राऊत. आम्ही पांच वर्षांपूर्वीच इथे आलो. काय भानगड आहे साहेब? आम्ही तर काहीच केलं नाहीये, मग आमच्या घरात का चौकशी?” – राजाराम
“नाही आम्ही तुमची चौकशी करायला आलो नाहीये, इथे आसपास कोणी वयस्कर गृहस्थ आहेत का, जे इथे या परिसरात गेली ५०-६० वर्षे वास्तव्यास आहेत?” – राऊत.
“ते तीन घरं टाकून पिवळा रंग दिलेलं घर आहे तिथे देवराव लायगुडे राहतात. त्यांच्या वडिलांचं वय ७५-८० च्या आसपास असावं. पण साहेब कशाकरता चाललंय हे? काही भयंकर घडलं होतं का?” – राजाराम.
“ठीक आहे. धन्यवाद.” – इंस्पेक्टर राऊत.
“संभाजी लायगुडे राहतो तिथे. मित्र आहे माझा. मी ओळखतो त्याला.” – विशाल.
“हूं, म्हणजे तू इथे असतांना संभाजी राव तुझ्याच वयाचे होते, पण विशाल आता त्यांनी ५० वर्ष ओलांडली आहेत. आणि तू नाही.” – राऊत.
“अरे माझ्या लक्षातच आलं नाही.” – विशाल.
“विशाल तू बोलायचं नाही. ते काय म्हणतात ते महत्वाचं आहे. आम्हीच बोलू. आलं लक्षात?” – राऊत.
देवराव आंगणातच होता. त्याने पण पोलिसांना राजाराम च्या घरी जातांना बघितलं होतं, म्हणून तो कुतुहलाने बाहेरच उभा होता.
“संभाजी लायगुडे इथेच राहतात का?” – राऊत.
“हो ते माझे वडील, मी देवराव लायगुडे. काय काम होतं?” – देवराव
संभाजीराव आहेत का?” – राऊत.
“हो आहेत पण काय काम आहे?” – देवराव
“तुम्ही या परिसरात किती वर्षांपासून रहात आहात” – राऊत.
“आम्ही इथलेच आहोत. काय झालं साहेब?
“तुम्ही संभाजी रावांना बोलावता का? आम्हाला काही चौकशी करायची आहे.” – राऊत.
“बोलावतो, पण कारण कळलं तर बरं होईल. साहेब आम्ही साधी सरळ माणसं आहोत, वडील तर वारकरी आहेत. असं काय घडलं की त्यांची चौकशी करायची आहे?” – देवराव.
“५० वर्षांपूर्वी या परिसरात काही घटना घडल्या होत्या, त्याचा तुमच्या वडिलांशी काहीही संबंध नाही, पण ते या घटनांचा साक्षीदार असू शकतात, आम्हाला फक्त त्यांना काही माहिती असेल, तर आम्हाला ती हवी आहे. ती जुनी फाइल पुन्हा ओपन झाली आहे म्हणून त्यांना भेटायचं आहे.” – राऊत.
“ओके. बोलावतो.” – देवराव.
“नमस्कार, मी संभाजी लायगुडे. काय माहिती हवी आहे तुम्हाला?” संभाजीराव म्हणाले, आणि असं बोलता बोलता, त्यांची नजर विशाल वर पडली. “यांचा चेहरा ओळखीचा वाटतो आहे.” असं म्हणून ते जरा थांबले, डोक्यात विचारचक्र चालू झालं होतं. काही क्षणातच त्यांना काही आठवलं. ते म्हणाले, “तुम्ही अगदी माझ्या मित्रा सारखे दिसत आहात अगदी कार्बन कॉपी. तुम्ही विशालचे चिरंजीव का?” – संभाजी.
प्रश्न मिटला होता. विशालने जे सांगितलं त्यावर शिक्का मोर्तब जवळ जवळ झालंच होतं. फक्त संभाजी काय तपशील देतो हेच बघायचं होतं, आणि विदिशाची माहिती, ती पण घ्यायची होती.
यावर विशाल काही बोलणार होता, पण इंस्पेक्टर साहेबांनी त्याला थांबवलं. ते संभाजी रावांकडे पाहून म्हणाले,
“हा विशाल कोण? तुम्ही विशालला ओळखता का?” – इंस्पेक्टर राऊत.
“हो चार घरं सोडून केशव शास्त्री नावाचे वैद्य राहायचे त्यांच्याकडे एक दिवस विशाल आणि विदिशा अचानक आलेत. लग्नाला विरोध होता म्हणून पळून आले होते. शास्त्री त्यांचं लग्न लावून देणार होते. पण त्यांनी अट घातली की आधी वैद्यकी शिक आपल्या पायावर उभा रहा मग आम्हीच तुमचं लग्न लावून देऊ. यात वर्ष दीड वर्ष गेलं आणि एक दिवस विशाल अचानक वडिलांची तब्येत बिघडली म्हणून जो गेला तो कधी आलाच नाही. त्यावर कडी म्हणजे त्यानंतर सहा सात महिन्यांनी विदिशा विहीरीतून पाणी काढतांना विहिरीत पडली, पण विहिरीत कोणीच सापडलं नाही. विदिशा जणूकाही हवेत विरून गेली होती. ती पण परत कधीच आली नाही.” – संभाजी.
“आता केशव शास्त्री तर नसतील, आता त्यांचा मुलगा किंवा नातू असेल, ते कुठे राहतात हे माहीत आहे का?” – राऊत.
“हो. त्यांचा मुलगा उज्ज्वल वकील झाला आहे. आता त्याला सगळे बाळासाहेब म्हणून ओळखतात, आणि तो ठाण्याला असतो. पण त्यांची एवढी चौकशी का चालली आहे आणि ते सुद्धा ५० वर्षा नंतर?” – संभाजी.
मग राऊत साहेबांनी विशालला समोर केलं. म्हणाले,
“संभाजीराव हा विशालचा मुलगा नाही, हा खुद्द विशालच आहे. ही एक मोठी विचित्र कथा आहे.” असं म्हणून राऊत साहेबांनी थोडक्यात सर्व कथा संभाजीरावांना सांगितली. आणि म्हणाले,
“आता आम्हाला विदिशाचा शोध घ्यायचा आहे. म्हणून ही चौकशी. तुमच्याजवळ पत्ता असेल तर द्या.” – राऊत साहेब.
संभाजीरावांनी पत्ता दिल्यावर सगळे पालघरला परतले.
“विशालच्या बोलण्याची शहानिशा तर झाली. पण विदिशाचा प्रश्न अजून सुटला नाहीये. तेंव्हा उद्या ठाण्याला जाऊन बाळासाहेबांना भेटावं लागेल.” – राऊत.
“ठीक आहे साहेब, तुम्ही सांगा त्यावेळेस आम्ही ठाण्याला हजर राहू. केंव्हा आणि कुठे भेटायचं ते सांगा. “ – विदिशाचे वडील.
“नाही, तुम्ही यायची काही जरूर नाहीये. आता बऱ्याच गोष्टी क्लियर झाल्याच आहेत. बाळासाहेब अजून काही प्रकाश टाकू शकतील तर बघायचं. तुम्ही मला उद्या संध्याकाळी फोन करा. मी अपडेट देईन.” – राऊत.
“साहेब, त्यांच्या कडे आमची पोरं दीड वर्ष राहिलीत, आम्हाला पण उत्सुकता आहे त्यांना भेटायची” - विदिशाचे बाबा.
“तुम्ही नंतर भेटा न त्यांना, आधी आम्हाला भेटू द्या. तुम्हाला मी अपडेट देईनच. सर्व गोष्टी क्लियर झाल्यावर तुम्हाला पण सोईचं होईल.” – राऊत साहेब.
क्रमश:----

दिलीप भिडे
0

🎭 Series Post

View all