Login

पिकनिक भाग ३ बिकट परिस्थिती

बिकट परिस्थितीचा सामना
पिकनिक भाग ३
बिकट परिस्थिती
“विशाल सर, हे काय चाललं आहे? मला खूप भीती वाटते आहे.” – विदिशा
विशाल पण हादरलेलाच होता, तरी त्याला एकदम जाणीव झाली की तो एकटा नाहीये, आता विदिशाची पण जबाबदारी त्याच्यावरच आहे. त्याने स्वत:ला सावरलं आणि म्हणाला,
“काय चाललं आहे ते मला पण कळत नाहीये, पण तू घाबरू नकोस, मी येतो, तू तिथेच थांब.” – विशाल म्हणाला आणि हेलकावे खाणाऱ्या नावेतच कसाबसा तोल सांभाळत विदिशा जवळ पोचला.
“इथे नावेत आपण दोघंच कसे आलो? कसं घडलं हे? बाकीचे कुठे आहेत?” – विदिशा.
“हे सगळे प्रश्न मलाही पडले आहेत. पण उत्तर नाहीये. बाकीचे एक तर देवळातच असतील किंवा ह्या कित्येक होड्या दिसत आहेत त्यांच्यात असतील.” – विशाल.
“विशाल सर आत्ता देवळात आपण होतो तेंव्हा मिट्ट काळोख होता. आत्ताही आहेच पण फक्त या होड्याच कश्या दिसताहेत? काहीच कळेनासं झालंय, माझी तर बुद्धीच काम करेनाशी झाली आहे.” – विदिशा.
“तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का?” – विशाल.
“काय?” – विदिशा.
“आपण यांना बघू शकतो आहोत, पण यांना आपण दिसत नाहीये. आपलं बोलणं त्यांना आणि त्यांचं बोलणं आपल्याला ऐकू येत नाहीये. आणखी एक गोष्ट लक्षात आली आहे की आपण जिथे बसलो आहोत, तिथे आधीच कोणीतरी मावळा बसला आहे. पण एकमेकांना स्पर्श जाणवत नाहीये. काय प्रकार आहे समजत नाही.”– विशाल
“पण होडीचा स्पर्श जाणवतो आहे. आणि होडीतच आपण बसलो आहोत. असं कसं? तुमचा तरी स्पर्श जाणवतो आहे का?” असं म्हणून विदिशाने विशालचा हात धरला. खरं तर एखाद्या मुलीने आपणहून हात धरण्याचा हा प्रसंग एखाद्या रोमॅंटिक सिनेमात खूप खुलवून दाखवला असता, पण इथे तसं काहीच घडलं नाही. विशालने तिच्या हातावर मायेने थोपटलं. विदिशाला तेवढ्याने सुद्धा खूप धीर आला.
“भीती वाटते आहे का? तू एकटी नाहीस ही जमेची बाजू आहे. आपण दोघं मिळून हा गुंता सोडवू. चिंता करू नकोस.” – विशाल म्हणाला. त्यांच्या असं बोलण्याने विदिशाला उचंबळून आलं. म्हणाली,
“सर, मला एकटीला सोडून जाणार नाही न तुम्ही?” – विदिशा.
“छे छे, हा विचार सुद्धा तू मनात आणू नकोस. मी निश्चितच कुठल्याही परिस्थितीत तुझ्या बरोबरच आहे. तू निश्चिंत रहा. अजिबात घाबरू नकोस.” विशाल असं म्हणाला खरा, पण त्यालाच समजत नव्हतं की या परिस्थितीतून कसं बाहेर पडायचं ते. ही दोघं असं बोलतच होते, तितक्यात बोट थांबली, सर्व तयारच होते, भराभर नावेतून उड्या मारून वाळवंटात एकत्र जमा झाले सर्वांनी आपापल्या तलवारी बाहेर काढल्या होत्या. काही जणां जवळ भाले होते, पांच एक मिनिटं त्यांच्या म्होरक्याने बहुधा मोहिमेचं उद्दिष्ट, आणि ती कशी फत्ते करायची ते थोडक्यात सांगितलं असावं आणि सर्व जण आपापली शस्त्र परजून सुसाट निघाले.
“विदिशा होडीतून आपण खाली उतारू आणि किनाऱ्यावर जाऊ. पायाखाली जमीन असली की सुरक्षित वाटेल.” – विशाल.
विदीशाने मान डोलावली आणि दोघही बोटीतून खाली उतरले. पाऊल भर पाणी होतं, पण पाचच मिनिटांत ते किनाऱ्यावर पोचले.
“इथे थांबून काय करणार? त्यापेक्षा आपण पण मावळ्यांच्या मागे मागे जाऊ. ते निश्चित कुठल्या तरी मोहिमेवर असणार. आपण कधी लढाई पाहीली नाही. या निमित्ताने ज्ञानात भर पडेल. चल.” – विशाल.
“अहो सर काही तरीच काय, कोणाचं आपल्याकडे लक्ष गेलं तर आपलाच शिरच्छेद व्हायचा. नको बाबा. आहोत तिथेच ठीक आहोत,” – विदिशा.
“अग आपण कोणालाच दिसणार नाही. दिसलो असतो, तर आधीच स्वर्गवासी झालो असतो. हे जे काही चाललं आहे ते शिवाजी महाराजांच्या काळातलं असावं बहुधा. आपण एकविसाव्या शतकात आहोत. चल चिंता करू नकोस. आपण सूरक्षित अंतरावर राहून बघू.” – विशाल.
थोडे आढे वेढे घेऊन विदिशा तयार झाली.थोडं दूर गेल्यावर त्यांना एक छावणी दिसली. साधारण २०-२५ तंबू लागलेले होते. मध्ये एक जरा मोठा तंबू होता रंगी बेरंगी कापडाच्या कनाती लावलेली आणि प्रामुख्याने हिरवा रंग आणि वरच्या टोकाला चंद्रकोर असलेलं निशाण. एका बाजूला घोडे, उंट वगैरे बांधलेले होते. चार पांच सैनिक सलवार आणि कुर्ता आणि वरून जाकीट आणि डोक्यावर गोल उंच टोपी घातलेले, गस्त घालत होते. दर पांच मिनिटांना होशियार आणि प्रतिसाद म्हणून जागते रहो अश्या हाका देत असावेत. ऐकू काहीच येत नव्हतं. मराठे कुठे दिसतच नव्हते.
विशाल आणि विदिशा दूर एका दगडावर बसून हे सर्व पहात होते. गस्ती सैनिकांच्या मशालींच्या उजेडात सर्व स्वच्छ दिसत होतं. असाच थोडा वेळ गेला आणि अचानक मराठ्यांनी एकदम हल्ला करून सर्व गस्त घालणाऱ्यांना कंठ स्नान घातलं. आणि मग जबरदस्त हर हर महादेव असा गगन भेदी नारा दिल्यासारखं तलवारी उंचावून आणि भगवा उंचावून मराठे छावणीवर तुटून पडले. मोगल सैनिक झोपेत होते, ते सावध होऊन शस्त्र हातात घेई पर्यन्त बरेच जण जायबंदी झाले किती तरी मेले. सुमारे तासभर रणकंदन चालू होतं. छावणीत २०० ते २५० सैनिक असावेत. मावळे जेमतेम ५०. विषम परिस्थिती होती. पण ध्यानी मनी नसतांना आक्रमण झाल्याने मोगल सैनिकांना स्वत:ला सावरताच आलं नाही. अर्धी अधिक छावणी कापल्या गेली. जबरदस्त हाणामारी. हातघाईची लढाई. जिकडे तिकडे रक्ताचा सडा. धडापासून वेगळं होणार शिर. हे सगळं बघतांना विदीशाला भोवळ आली. जवळ पाणी नव्हतं त्यामुळे नुसती वाट पाहाण्या पलीकडे विशालला काहीच करता आलं नाही. बरेच सैनिक पळून गेले. मराठ्यांनी घोडे, उंट आणि जनावरं मोकळी सोडून दिली, सर्व तंबूंना आगी लावल्या, आणि नंतर मराठे जसे विद्युत वेगाने आले तसेच निघून गेले. बरोबर चार जण जखमी झाले होते, त्यांना बरोबर घेऊन गेले.
आता रणभूमी वर शांतता झाली होती. अधून मधून कोणी कण्हत होतं त्यांचे आवाज येत नव्हते, पण अंदाज येत होता. मशाली विझल्या होत्या, पण तंबू जळत होते, त्यामुळे सभोवार पडलेले सैनिक दिसत होते. दृश्य तसं भीतीदायक होतं. आजवर नुसत्या युद्धाच्या कथा वाचून आणि ऐकून अंगावर रोमांच यायचे, पण प्रत्यक्ष पाहतांना आता दोघेही भीतीने गारठले होते. विदिशा आता भानावर आली होती. भेदरलेल्या नजरेने तिने चहूकडे पाहिले आणि म्हणाली, “संपली का कापाकापी?” – विदिशा.
“हो. अन मराठे जसे आले तसेच अंतर्धान पण पावले. मोगलांची उरलेली फौज पळून गेली. आता घाबरण्याचं काही कारण नाही.” – विशाल.
विदिशा विशालला जवळ जवळ घट्ट बिलगूनच बसली होती. दोघांच्याही तोंडातून शब्द फुटत नव्हता.
बऱ्याच वेळाने विदीशाला कंठ फुटला,
“बापरे, लढाई किती भयंकर असते ते आज कळलं.” – विदिशा.
“नुसतं दुरूनच बघून आपली ही अवस्था झाली आहे, जे प्रत्यक्ष लढतात त्यांना काय होत असेल?” – विशाल.
“कोण जाणे.” – विदिशा.
हळू हळू सर्व शांत झालं. लागलेल्या आगी पण विझत आल्या होत्या. थोडा वेळ अजून गेला आणि सर्वत्र गडद काळोख पसरला. सभोवार पसरलेली भीषण स्मशान शांतता, आणि या भयावह परिस्थितीत अडकलेले दोन जीव. दोघंही कमालीचे घाबरले होते. विदिशा विशालला घट्ट मिठी मारूनच बसली होती. अजूनही थरथरत होती. विशाल तिला शांत करण्यासाठी नुसताच तिच्या पाठीवरून हात फिरवत होता. थोड्या वेळाने विशालच्या लक्षात आलं की ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन केंव्हाच झोपली होती. विशाल पण तिला डिस्टर्ब होऊ नये म्हणून हालचाल न करता शांत बसला. काही वेळानंतर विदीशाला जाग आली. विशालच्या खांद्यावर आपलं डोकं टेकलं होतं हे लक्षात आल्यावर ओशाळली. विशालला सॉरी म्हणाली.
“नेवर माइंड. तुझ्या मेंदूला हा सगळा ताण सहन झाला नाही म्हणून तुला ग्लानि आली होती. रीलॅक्स इथे अत्यंत विपरीत परिस्थितीत आपणच दोघे सापडलो आहोत. त्यामुळे तू अजिबात संकोच वाटून घेऊ नकोस. पूर्ण विश्वास ठेव माझ्यावर.” – विशाल.
“तो तर आहेच. तरी पण संकोच वाटतो ना.” – विदिशा.
“नको करूस संकोच. आणखी एक गोष्ट. आपण ऑफिस मध्ये नाहीये, आणि तुझा बॉस बालाचंद्रन आहे, मी नाही. त्यामुळे सर हे विशेषण काढून टाक.” – विशाल.
विदिशा गोंधळली. म्हणाली,
“मग काय म्हणू? विशालराव ?” – विदिशा असं म्हणाली आणि तिचं तिलाच हसू आलं.
“माझा एक मित्र आहे संदीप नाव आहे त्याचं. त्यांचे सासू सासरे त्याला संदीपराव असं म्हणतांना ऐकलं आहे. तू माझी सासू आहेस का?” – विशाल
विशाल असं म्हणाल्यावर विदीशाला एकदम हसू फुटलं खळखळून हसायला लागली. आणि तिला पाहून विशाल पण त्या प्रवाहात वहात गेला. दोघांच्याही डोक्यावरचा ताण तणाव कुठल्या कुठे पळून गेला.
“आत्ता किती वाजले असावेत?” – विदिशा.
“आपण मंदिरात होतो तेंव्हा १२ वाजले होते. त्यानंतर या सगळ्या प्रकारात २ ते ३ तास तरी मोडले असावेत. अजून शुक्र तारा उगवला नाहीये, म्हणजे चार वाजायचे आहेत. म्हणजे आता तीन चा सुमार असावा.” – विशाल.
“आकाशात अगणित तारे असतात. त्यामधून तुला शुक्र तारा ओळखता येतो?”– विदिशा.
“हो तुला पण ओळखता येईल. हा तारा खूप तेजस्वी असतो. आता आपण समुद्राकडे पाठ करून उभ राहिलो, तर उजव्या हाताला दक्षिण येते आणि समोर पूर्व. हा तारा दक्षिणपूर्व दिशेला असतो.” – विशाल.
“बस? एवढ्या तुटपुंज्या माहितीवर कसं ओळखता येईल?” – विदिशा.
“अजून सांगायचं म्हणजे यांच्या बाजूला कन्या नक्षत्र असतं.” – विशाल.
“विशाल तू गोंधळात अजून भर घातली आहेस. कन्या नक्षत्र कसं समजणार?” – विदिशा.
“Y कसा असतो? खाली शेपूट आणि वर दुभंगलेला. आता दोन्ही Y ची शेपटी जोडली तर जो आकार तयार होईल ते कन्या नक्षत्र. पण हे आडवं उभं कसाही असू शकेल आपण फक्त डिझाईन बघायचं झालं.” – विशालने सविस्तर समजावलं.
क्रमश:----
पुढचा भाग उद्या – बिकट परिस्थिती २

दिलीप भिडे.
0

🎭 Series Post

View all