’ चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ’
जलद कथालेखन स्पर्धा
शीर्षक : सासर की माहेर... भाग १
©® एकता माने
आज या दारामध्ये उभे राहून सोनलचे मन भरून येत होते. त्या उंबरठ्यावरच कधीपासून तिची नजर अडकलेली होती.
‘हे माझं घर... माझा जन्म झाल्यापासून माझं सगळं बालपण या घरातच गेलं. इकडचे उन्हाळे, पावसाळे मी पाहिले. छोट्या छोट्या गोष्टींसाठी हट्ट करत माझ्या हसण्याचे, रडण्याचे आवाज अजूनही या घरात घुमत असल्यासारखे मला जाणवत आहेत. माझ्या वडिलांची सोनपरी म्हणून माझे होणारे लाड आणि आज अचानक वाटत असलेला तो परकेपणा... आजपासून हे घर, या घरातल्या वस्तू, हे लोक माझे राहणार नाही...’
विचार करून सोनलचे डोळे भरून येत होते. आज तिचे लग्न होते आणि आपल्या लग्नासाठी ती घरातून बाहेर पडत असताना तिच्या मनामध्ये लहानपणापासूनच्या अनेक आठवणी आठवून तिच्या डोळ्यांमध्ये पाणी येऊ लागले.
“बाळा, तू आज या घराचा निरोप घेऊन आपल्या सासरी जात असलीस, तरीही तुझ्यासाठी कायमच या घराचे दरवाजे उघडे राहतील. या घरावर असलेला तुझा हक्क तुझ्याकडून कोणीही हिरावून घेणार नाही. तुझे सासर जरी आजपासून तुझ्या हक्काचे असले तरी माहेरही तुझ्या प्रेमाचेच असणार आहे.” सोनलची आई प्रेमाने आपल्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवत तिला आश्वासन देत म्हणाली.
सोनलने भरल्या डोळ्यांनी आपल्या आईकडे पाहून तिला घट्ट मिठी मारली. प्रत्येक मुलीचे आयुष्य हे असेच असते ना! लहानपणापासून तिच्या घरामध्ये, आपल्या माणसांमध्ये राहिलेली असते. एक ना एक दिवस त्यांना सोडून तिला कायमचे सासरी जावे लागते. यालाच तर जगाची रीत म्हणतात. आज सोनलही ती रीत निभावत होती.
सोनल आणि अमित दोघांचेही अरेंज मॅरेज झाले होते. घरच्यांनी ठरवून लग्न लावून दिले होते. दोघांनीही एकमेकांसोबत थोडेफार बोलून लग्नासाठी होकार दिला. अमित एक शिकलेला आणि समजूतदार मुलगा होता त्यामुळे त्याच्यामध्ये नकार देण्यासारखे सोनलला काहीही जाणवले नाही.
देवा ब्राह्मणाच्या आणि आपल्या घरच्यांच्या साक्षीने त्या दोघांचेही लग्न झाले. लग्नानंतर सोनल सासरी आली. सासरीही तिचे अगदी सुंदर पद्धतीने स्वागत करण्यात आले. लग्नानंतरची पद्धत अनुभवत होणारे वेगवेगळे खेळही दोघांनी आनंदाने खेळले. लग्नानंतरचे पुढचे काही दिवस सासरच्या माणसांना समजण्यामध्ये जात होते. सासरकडची मंडळीही नवीन नवरीला छान सांभाळून घेत होती.
हळूहळू जसे दिवस पुढे जाऊ लागले तशी सोनलला आपल्या सासरच्या माणसांची नव्याने ओळख होऊ लागली. अमित, तिचा नवरा तिच्यावर खूप प्रेम करत होता. छान समजूतदार होता; पण तो त्याच्या आईच्या शब्दांना नकार देण्याइतका धैर्यवान नव्हता. सोनलला त्याचे प्रेम समजत तर होते; पण त्याचे प्रेम त्याच्या आईच्या मान्यतेशिवाय कुठेही व्यक्त होत नव्हते.
सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये सोनलला सतत आपल्या माहेरची, माहेरच्या लोकांची आठवण येत होती. एका संध्याकाळी सोनलने हलक्या आवाजात अमितच्या बाजूला बसून त्याला विचारले,
“अमित, जर मला माहेरी जावे, आपल्या माणसांना भेटावे असे वाटले तर?”
“मला काहीच हरकत नाही सोनल. तुझे माहेर आहे. तू कधीही जाऊ शकतेस. फक्त काही करायचे असेल तर आईची परवानगी घेत जा.” अमितने तिच्याकडे पाहून अगदी सहजपणे उत्तर दिले.
‘आईची परवानगी घेत जा.’ हे वाक्य सतत सोनलच्या मनामध्ये घोळत राहिले. लग्नाआधी ज्या मुलीला आपली मर्जी चालवण्याची, आपल्या मनाप्रमाणे जगण्याची, आपल्याला पाहिजे ते करण्याची सवय होती आज तिला प्रत्येक पावलावर परवानगी घ्यावी लागणार आहे ही गोष्टचं तिला अस्वस्थ करत होती.
सोनलच्या सासूबाई शांता पारंपरिक विचारांच्या होत्या. त्यांच्या दृष्टीने मुलगी लग्नानंतर जर सतत आपल्या माहेराशी जोडली गेली तर तिचे सासरकडच्या घराकडे दुर्लक्ष होते म्हणून एकदा लग्न झालेल्या मुलीने कामाशिवाय आपल्या माहेरी जाऊ नये असे त्यांचे मत होते. त्यांना सोनलचे तिच्या आईसोबत होणारे सतत फोनवरचे बोलणेही आवडत नव्हते. आईने आपल्या मुलीच्या संसारात सतत हस्तक्षेप करू नये असे त्यांचे मत होते.
एक दिवस असेच संध्याकाळच्या वेळी त्या किचनमध्ये आल्या. त्यांनी पाहिले की सोनल किचनमध्ये काम करत फोनवरही बोलत आहे. त्यांनी तिकडेच उभे राहून तिच्या बोलण्याचा आढावा घेतल्यावर त्यांना समजले की, सोनल आपल्या आईसोबत बोलत आहे.
“सोनल, रोज रोज आपल्या आईसोबत फोनवर बोलण्याची गरज काय आहे? आता तू आपल्या सासरी आली आहेस. आता माहेर विसरून जा. या घरासाठी तुझी काही कर्तव्यं आहेत. ती करत असताना सतत माहेरची ओढ असणे बरोबर नाही.” फोन ठेवल्याबरोबर सासूबाईंनी सोनलकडे पाहून तिला थेट सांगितले.
‘मी माझ्या आईसोबत बोलले नाही तर मलाही राहावणार नाही. माझ्या माहेरपासून, तिकडच्या लोकांपासून इतक्या लवकर वेगळं होणं शक्य नाही.’ सोनलचे डोळे पाणावले होते. या शब्दांचा मनामध्ये विचार करताना तिचे मनही भरून आले होते. हे शब्द फक्त तिच्या मनामध्येच राहून गेले, तोंडाने मात्र ती गप्पच बसली.
क्रमशः
©एकता माने ( संघ कामिनी )
©एकता माने ( संघ कामिनी )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा