Login

सासर की माहेर भाग २

प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात निर्माण होणारा प्रश्न
’ चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ’

जलद कथालेखन स्पर्धा

शीर्षक : सासर की माहेर... भाग २

©® एकता माने


सोनलचा लहान भाऊ श्रेयस हा तर तिच्या आयुष्याचा धागा होता. लहानपणापासूनच दोघांचं नातं अतूट आणि अनोखे होते. दोघे एकमेकांसोबत जेवढी मस्ती करायचे तितकाच एकमेकांना जीवही लावत होते.

"यावर्षी दिवाळी सणाला माझी बहीण माझ्या घरी नाही. यावेळी येणाऱ्या भाऊबीजेची मी आतुरतेने वाट पाहत आहे. त्या दिवशी तरी माझी बहीण माझ्यासाठी या घरी येईल. तुला समोर पाहूनच माझ्या दिवाळी सणाला खरा अर्थ येणार आहे." श्रेयसला सोनल सासरी गेल्यानंतर आपल्या बहिणीची कटाक्षाने आठवण येत होती. तिच्यासोबत घालवलेल्या दिवसाची आठवण काढत त्याने आपल्या बहिणीसमोर हट्ट धरला.

सोनलला देखील आपल्या माहेरला जाण्याची मनापासून ओढ लागली होती. त्यात भावाने केलेल्या फोनमुळे तर तिचे मन हेलावून गेले; पण सासूबाईंचा आवाज मात्र तिच्या कानामध्ये चांगलाच घुमला...

"सासरी कार्यक्रम आहे त्यामुळे तुला माहेरी जाता येणार नाही." सासुबाईंनी आपल्या करारी आवाजामध्ये तिला आधीच सूचना दिली होती. रात्री आपल्या माहेरचा विचार करत सोनलच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले. तिला झोपही येत नव्हती.

"सोनल, मला माहित आहे आईच्या बोलण्याने तुला वाईट वाटत असेल, तुझ्या मनाची अवस्था मी समजू शकतो; पण मी आईला उलट बोलू शकत नाही. तूच थोडं समजून घेण्याचा प्रयत्न कर." अमितने सोनल जवळ येऊन समजावण्याच्या स्वरात सांगितले.

"माझा जीव माझ्या या दोन घरांमध्ये अडकलेला आहे अमित. माझं माहेर हे माझ्या आयुष्यातले धडधडणारे हृदय आहे तर माझे सासर माझ्या पायाला जखडलेली साखळी आहे." सोनलने रडक्या स्वरात त्याला उत्तर दिले.

या वेळच्या दिवाळसणाला सोनलला इच्छा असूनही तिच्या माहेरी जाता आले नाही. तिच्या भावाची भाऊबीज पूर्ण होऊ शकली नाही. सासरच्या कार्यक्रमांमध्ये सोनलने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली परंतु मनाने मात्र ती आपल्या माहेरच्या घरातच अडकली होती.

हळूहळू दिवस पुढे जात होते परंतु सोनलच्या मनामध्ये मात्र एक अदृश्य असे द्वंद चालू होते. ती मनापासून आपली सासरची सगळी जबाबदारी पार पाडत होती परंतु तिचे मन माहेरसाठी माहेरच्या लोकांसाठी देखील तुटत होते.

'ज्या घरात आपण लहानाचे मोठे झालो आहे त्या घराला इतक्या सहजपणे विसरणे शक्य आहे का?'

हा प्रश्न तर खरंच प्रत्येक स्त्रियांनी आपल्या मनाला विचारायला पाहिजे कारण एका स्त्रीच्या मनाची व्यथा ही दुसरी स्त्री जास्त चांगल्या प्रकारे समजू शकते आणि जर तीच ही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करत नसेल तर?

"आई, मला खूप त्रास होत आहे ग. हे घर बोलायला जरी माझे असले तरी मी इथे स्वतःच्या मनाप्रमाणे राहू शकत नाही. मला आपल्या येण्याची,  तुम्हा सगळ्यांना बघायची, तुमच्यासोबत बोलण्याची खूप इच्छा होत असते; पण इच्छा असूनही मला तसे करता येत नाही." एक दिवस आपल्या आईसोबत फोनवर बोलत असताना सोनलच्या मनातल्या भावना बाहेर पडत होत्या.

"बाळा, लग्नानंतर प्रत्येक मुलीला दोन्ही घरांची जबाबदारी समजून घ्यावी लागते. तिचं सासर जरी तिच्या हक्काचे असले तरी तिचे माहेर कोणी तिच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. तू कधीही इकडे येऊ शकते, हे ही तुझ्या हक्काचेच घर आहे." सोनलच्या आईने शांत आवाजात तिला उत्तर दिले. आपल्या आईचे शब्द ऐकून सोनलच्या डोळ्यातून ओघळलेल्या अश्रूंनी फक्त तिच्या बिछान्यावर असलेली उशी ओली झाली.

सोनल आपले मन मारून आपल्या सासरकडच्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत होती. आपली सगळी जबाबदारी व्यवस्थित पार पाडत होती. एक दिवस अचानक तिच्या सासूबाईंची तब्येत बिघडली. डॉक्टरांनी सांगितलं त्यांना विश्रांतीची गरज आहे त्यामुळे आता घराची सगळी जबाबदारी सोनलवर आली.

ऑफिसचे काम, घरचे सगळे काम, जेवण, घरात होणारी छोटी मोठी कामे देखील आता सोनलला बघावी लागत होती. सगळं एकटीने करायला लागत होते, मदतीचा एकही हात नसल्यामुळे ती पूर्ण थकून जात होती. तरीही तिने कधी कोणाला या गोष्टीची जाणीव करून दिली नाही. सगळं एकटीने सहन करत राहिली.

"सोनल, मला माफ कर. मी तुझ्या वेदनेत तुला आधार देऊ शकलो नाही पण खरंच तू खूप धैर्यवान आहेस." तिला होणारा त्रास पाहून एक दिवस अमितने तिचा हात धरला आणि तिला स्वतःजवळ बसवत बोलू लागला.

"धैर्य नाही अमित. हे माझं कर्तव्य आहे पण हे कर्तव्य पार पाडत असताना आम्हालाही माझ्या आईची खूप गरज वाटते ही गोष्ट कोणाच्याही लक्षात आली नाही. मलाही मायेचा आधार पाहिजे आहे." सोनल रडक्या स्वरात त्याच्याकडे पाहून म्हणाली.