’ चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ’
जलद कथालेखन स्पर्धा
शीर्षक : सासर की माहेर... भाग ३ (अंतिम भाग)
©® एकता माने
सोनलच्या माहेरी जेव्हा तिच्या सासूबाईंबद्दल समजले तेव्हा मात्र तिच्या आईने आपल्या मुलीच्या काळजीने लगेच तिच्या सासरी येण्याचा निर्णय घेतला.
"अशावेळी मी माझ्या लेकीला एकटी सोडणार नाही. माझ्या लेकीवर एवढा भार पडू देणार नाही." सोनलच्या आईने ठामपणे आपलं मत सांगितले.
सोनलची आई काही दिवसासाठी सोनलच्या सासरी आली. त्यांच्या येण्याने घरातलं वातावरण थोडं बदललं. सोनलला घरकामामध्ये आईची मदत होऊ लागली, तिच्या सासूची देखील व्यवस्थित सेवा होत होती. आपल्या आईच्या येण्याने सोननला मानसिक आधार मिळाला होता, तिच्या खांद्यावरच ओझं हलकं झालं होतं. आपल्या आईला आपल्याजवळ पाहून तिचं मनही शांत झालं होतं.
’ज्या मुलीला आपल्या माहेरची जोडू नको असे मी सांगत होते आज तीच मुलगी आणि तिच्या माहेरची माणसं माझ्या सेवेमध्ये कुठल्याही गोष्टीची कमी ठेवत नाही. तिच्या आईने तिच्या संसारामध्ये हस्तक्षेप करू नये असा विचार करणारी मी पण आज तिची आई येऊन आपल्या घरच्यांना अगदी प्रेमाने सांभाळून घेत आहे. इतके दिवस आपणच चुकीच्या समजुतीमध्ये होतो का?’ आपल्या सुनेचे आणि तिच्या आईने केलेले कर्तव्य पाहून सासूबाईंच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ लागले आणि त्या आपल्या बोलण्याचा आणि आपल्या वागण्याचा विचार करू लागल्या.
हळूहळू सासूबाईंच्या तब्येतीमध्ये बरीच सुधारणा झाली. त्यांच्या घरचेही वातावरण परत पहिल्यासारखे आनंदी होऊ लागले. इतके दिवस सासूबाईंनी शांतपणे सोनलने आणि तिच्या आईने घेतलेल्या काळजीकडे मनापासून पाहिले होते.
तिच्या सासूबाईंच्या तब्येतीमध्ये होणारी सुधारणा पाहून सोनलची आई पुन्हा आपल्या घरी निघून गेली. आपल्या आईच्या सहवासामुळे सोनलमध्ये देखील एक वेगळीच ऊर्जा संचारली होती. आपल्या आईने सांगितल्याप्रमाणे पुढचे काही दिवस सोनलने आपले ऑफिसचे काम आणि घरातली जबाबदारी अगदी व्यवस्थित सांभाळली होती.
"बाळा, मला माफ कर. मी तुझे मन तुझ्या माहेरी जोडलेलं पाहून खूपच गैरसमज करून घेतला होता; पण मला आता समजले आहे की, मुलगी ही नेहमी दोन्ही घरांची असते. माहेराचं प्रेम तिला शक्ती देते आणि सासरचं आयुष्य तिला जबाबदारीने वागायला शिकवते." सोनलच्या सासूबाई तिच्या डोक्यावर हात ठेवून प्रेमाने तिच्याकडे पाहून बोलू लागल्या.
आपल्या सासूबाईंच्या आज होणाऱ्या स्पर्शामध्ये तिला आपुलकी आणि प्रेम जाणवले. तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले. ज्याप्रमाणे आपल्या आईचा मायेचा आधार आपल्या डोक्यावर असतो त्याचप्रमाणे आज तिला तिच्या सासूबाईंच्या हाताच्या स्पर्शामध्ये तो आधार जाणवला. त्यांच्या डोळ्यांमध्ये दिसणाऱ्या आईसारख्या प्रेमाचा सोनलला आज पहिल्यांदाच अनुभव आला.
त्या दिवसानंतर मात्र सोनलच्या सासरच्या वातावरणामध्ये झालेला बदल तिला जाणवला. सासरच्या लोकांमध्येही तिला एका प्रकारची आपुलकी तिला पाहायला मिळत होती. दिवाळीचे दिवस जवळ आले यावेळी सासुबाई स्वतः तिच्याजवळ आल्या आणि प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या,
"सोनल, या वेळच्या भाऊबीजेला तू तुझ्या माहेरी जा. तुझा भाऊ तुझी वाट बघत असेल. काही दिवस तिकडे राहून आपल्या माहेरपणाचाही अनुभव घे. आपल्या घरी गेल्यावर तुलाही छान वाटेल." त्यांचं बोलणं ऐकून सोनलच्या मनामध्ये आनंद दाटून आला त्या आनंदानेच तिने आपल्या सासूबाईंना आईप्रमाणे घट्ट मिठी मारली. त्यांनीही प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवत तिच्या मनाला धीर दिला.
सोनल आनंदाने आपल्या माहेरी जाण्याची तयारी करू लागली. या दरम्यान अमितही तिला बाहेर घेऊन गेला आणि तिच्या माहेरच्या लोकांसाठी खूप सारी शॉपिंग करायला सांगितले. सुरुवातीचे सण जसे लक्ष्मीपूजन, पाडवा तिने अगदी आनंदाने आपल्या सासरी साजरा केला. यावेळी तिच्या सासरची सगळी माणसंही तिच्या या सणांमध्ये अगदी आनंदाने सामील झाली होती.
सोनल भाऊबीजेसाठी तिच्या माहेरी आली. आपल्या बहिणीला दारात पाहून तिच्या भावाला खूप आनंद झाला त्याने धावत येऊन आपल्या बहिणीला घट्ट मिठी मारली. आपल्या भावाच्या मिठीमध्ये असलेले समाधान तिला जाणवले. दोघांच्याही डोळ्यांमध्ये आज समाधानाचे आणि आनंदाचे अश्रू होते.
सोनलने आपल्या भावासोबत भाऊबीजेचा सण अगदी आनंदाने साजरा केला. तिच्या येण्याने तिच्या माहेरच्या घरालाही वेगळाच उत्साह आला होता. आपल्या मुलीला पाहून तिचे आई-वडीलही खूप खुश झाले होते.
दिवाळी सणानंतर एक दिवस सोनलच्या सासूने तिच्या माहेरच्यांना घरी येण्याचे आमंत्रण दिले. आपल्या माहेरची मंडळी घरी येणार म्हणून सोनलने अगदी आनंदाने साग्रसंगीत भोजन केले होते. तिच्या सासूनेही तिला सगळ्या कामांमध्ये मदत केली. त्यादिवशी सगळे एकत्र बसले होते. सोनल, सोनलची आई बाबा , भाऊ , सासू-सासरे आणि तिचा नवरा अमित.
"आजपासून आम्ही कधीही तुला रोखणार नाही सोनल. तुझं माहेरही आहे आणि सासरही आहे. तू या दोन्ही घरांची लेक आहेस. सासरचे कर्तव्य निभावत असताना कोणीही तुझे माहेर तुझ्यापासून तोडणार नाही." सासूच्या तोंडातून निघालेल्या त्या प्रेमळ वाक्याने सोनल सगळ्यांकडे पाहून हसली तिच्या डोळ्यांतूनही आनंदाश्रू वाहू लागले.
"धन्यवाद आई! माझ्या आयुष्यातलं हे सगळ्यात मोठे स्वातंत्र्य आज मला मिळाले आहे. आज मी जगातली सगळ्यात भाग्यवान स्त्री स्वतःला समजत आहे कारण माझे सासर आणि माझे माहेर ही दोन्हीही घरे माझ्या हक्काची झाली आहेत.”
मुलगी ही कधीही फक्त एका घरची नसते ती दोन्ही घरांची हृदयस्पंद असते. मुलीचं माहेर हे तिचं मूळ असतं तर सासर हे तिचं भविष्य असतं. दोन्ही नात्यांचा समतोल राखणं हा तिचा खरा विजय असतो. आपल्या या दोन्ही घरांची कर्तव्य पार पाडत असताना तिच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंदही वेगळाच असतो. त्यामुळे लग्न झाल्यावर मुलगी तिच्या सासरी आल्यावर तिचे माहेर तिचे राहिले नाही असे सांगण्यापेक्षा ती दोन्ही घरांची लेक आहे, ही दोन्हीही घरे तिच्या हक्काची आहे असे सांगितले तर ती आनंदाने आपली सगळी कर्तव्य पार पाडेल.
समाप्त
©एकता माने ( संघ कामिनी )
©एकता माने ( संघ कामिनी )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा