Login

फर्स्ट फ्लोअर भाग- चार

The Story About Molestation And Culprit
फर्स्ट फ्लोअर
भाग -4
@ज्योती सिनफळ.

तीन चार दिवस झाले तरी विशाखाच्या प्रकृतीत म्हणावी अशी सुधारणा दिसत नव्हती. अतिरक्तस्राव झाल्यामुळे ती अजूनही शुद्धीत आली नव्हती.

डॉक्टरांचे उपचार चालू होते परंतु जोपर्यंत ती पूर्ण शुद्धीवर येत नाही डॉक्टरांनाही ठोसपणे काही सांगता येत नव्हते.

एक दोनवेळा ती शुद्धीवर आली आणि थोड्याच वेळात परत बेशुद्ध झाली. त्यामुळे सागर-आरती देखील तिच्या प्रकृतीबाबत खूप चिंतेत होते. आरतीचे डोळे तर रडून रडून नुसते सुजले होते. आपल्या मुलीसोबत भर दिवसा आपल्याच घरात हे असे कृत्य कोणी केले असेल? ह्या विचाराने त्यांचं डोकं बधीर व्हायची पाळी आली होती. त्यात त्यांना मुलीला भेटू पण देत नव्हते. ते फक्त तिला काचेतून बघू शकत होते. आपल्या मुलीची ही अवस्था त्यांना बघवत नव्हती.

इन्स्पेक्टर कुलकर्णींनी पण धरपकड आणि चौकशी सत्र जोरावर चालू केले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी होत होती. पण अजुनही म्हणावे असे ठोस काही हाती लागत नव्हते. त्यामुळे तेही थोडे हताश झाले होते. पत्रकार आणि सोशल मिडिया पोलीसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत होते. मिडीयाच्या प्रेशरमध्ये येऊन वरीष्ठ अधिकारीही गुन्ह्याचा तपास लवकर लावण्याबाबत दबाव आणत होते. ह्या सगळ्यातही इ. कुलकर्णीं डोक्यावर बर्फ ठेऊन शांतपणे गोळा केलेल्या पुरावे आणि सीसीटीव्हवरील फुटेजला बारकाईने तपासत होते. गुन्हेगार कदाचित अगदी डोळ्यासमोर असूनही आपल्या नजरेत येत नाहीये. काहीतरी मिसिंग आहे जे शोधण्याचा ते कसोशीने प्रयत्न करत होते. कॉन्स्टेबल तुकारामही टपरीवरच्या मुलांची सगळी माहिती फाईलबंद करून घेऊन आला. इं.कुलकर्णी फाईल वरून नजर फिरवतच होते की कॉन्स्टेबल तुकारामने आनंद आणि अमित काणे आल्याचे कळवले.”

“आधी अमितला आत पाठवा.”

असे सांगून त्यांनी पुन्हा नजर फाईलमध्ये वळवली.

कॉ. तुकाराम अमितला आत जाण्यास सांगताच. अमितच्या चेहऱ्यावर भीती पसरली. बाबांकडे एक कटाक्ष टाकत अमित उठून इ. कुलकर्णीच्या केबीनकडे गेला आणि त्याने दारातून विचारले,

“मे आय कम इन सर?”

“ये अमित, बैस.”

“आधी मला सांग तुझे पेपर कसे झाले?”

“अपेक्षेपेक्षा खूपच छान गेले सर.”

“अपेक्षेपेक्षा म्हणजे?”

कुलकर्णींनी त्याला बरोबर शब्दात पकडले.

त्यांच्या अचानक प्रश्नाने तो पण गडबडला. चिंतेच्या असंख्य आठ्या त्याच्या कपाळावर उमटल्या. पण लगेच स्वतःला सावरत त्याने उत्तर दिले.

“म्हणजे दोन चार दिवसांपासून ह्या घटनेमुळे आम्ही सगळेच खूप डिस्टर्ब होतो. त्यामुळे माझंही अभ्यासात लक्ष लागत नव्हते. पण तरीही पेपर खूप चांगले गेले सर.”

“हम्म, साहजिकच आहे. त्यात तू आणि विशाखा तर चांगले मित्र ना एकमेकांचे!”

“ हो सर. आम्ही लहानपणापासूनचे मित्र. एकाच शाळेत होतो आम्ही शिकायला. ती मागे होती काही वर्ग पण शाळा एक त्यामुळे आमची स्कूल व्हॅन पण एकच होती. जाणे, येणे, खाणे सगळं सोबतच असायचे.”

“मला खरं खरं सांग, तुला विशाखा आवडत होती ना? आम्ही असं ऐकलं की तू तिला प्रपोज पण केलं होतं, हे खरंय का?”

त्यावर अमित पुन्हा गडबडला. काय उत्तर द्यावे त्याला समजत नव्हते? मग एक पॉज घेत तो म्हणाला,

“हो सर, मला आवडायची ती. मी प्रपोज केलं होतं पण आता मला पटतंय की मी तिला तसं विचारायला नको होतं. ती माझी तारूण्यातली पहिली चूक होती.”

“पण म्हणजे ती तुला आता आवडत नाही का?”

ह्यावर काय बोलावं क्षणभर त्याला सुचेना.

कुलकर्णींनी पुन्हा जरा जोर लावून विचारल्यावर तो म्हणाला,

“नाही सर. म्हणजे हो सर.”

“हे नाही- हो काय लावलेय? स्पष्ट उत्तर दे, आवडते की नाही?”

“सर आवडते पण…..”

“पण तिला तू आवडला नाही म्हणून तिने तुला मुस्काटात मारली आणि म्हणून तू त्याचा बदला घ्यायला हे सगळे केलेस असेच नाऽ, मि.अमित?”


हे ऐकून अमितचा चेहरा पांढरा फटक पडला. तो रडायला लागला.


“नाही सर, खरंच मी असं काही केलं नाही. माझ्यावर विश्वास ठेवा.”

“मग हे काय आहे?”

कुलकर्णींनी समोरच्या लॅपटॉपवरील दृश्य त्याला दाखवत विचारले,

“मग ह्यावर तुझे काय म्हणणे आहे?”

“सर, मी आईची शपथ घेऊन सांगतो मी तिथे गेलो जरूर होतो पण मी हे काही केलेले नाही.”

“आम्हाला तिथे तुझ्या हाताचे ठसे पण मिळाले आहेत तेव्हा जे सांगशील ते खरे खरे सांग.”

कुलकर्णीचा दरडावलेला आवाज ऐकून अमितचा चेहरा खर्रकन उतरला.

“सर, मी सगळं नीट खरं खरं सागतोय. मी काही केलेले नाहीये. त्या दिवशी मी माझा अभ्यासच करत बसलो होतो इतक्यात दाराची बेल वाजली. कुरीयरवाला आला होता. पार्सल घेऊन मी वळतच होतो की माझे लक्ष समोर भावेंच्या घराकडे गेले. त्यांचे दार मला उघडे दिसले. दार ह्यावेळी उघडे कसे? म्हणून बघायला गेलो तर हॉलमध्ये टीव्हीवर कार्टून चालू होते पण तिथे कोणीच दिसले नाही. म्हणून मी विशाखाला हाक मारत स्वयंपाकघर बघितले. तिथेही कोणी नाही म्हणून मी तिच्या बेडरूममपाशी गेलो तर तेही अर्धे उघडे. मी दारावर टकटक केली पण काही रिस्पॉन्स नाही म्हणून मग दार ढकलले आणि जे दृश्य दिसले ते पाहून मी खूपच घाबरलो. ह्यातलं काहीच आपल्यावर येऊ नये ह्या भितीने मी तिथून पळ काढला आणि थेट घर गाठल. मी हे कोणालाच सांगितले नाही सर? पण मी खूप घाबरलो होतो. सर खरंच माझा ह्यात काहीही हात नाही. प्लीज मला वाचवा.”

बोलता बोलता अमित ढसढसा रडायला लागला.

“हम्म. हे बघ कोण गुन्हेगार हे आम्ही शोधून काढूच पण जर तू ह्यातलं एकही वाक्य खोटं बोलला असशील तर मात्र तुला अटक पण होऊ शकते. म्हणून सांगतोय अजून काही सांगायचे राहून गेले असेल तर आत्ताच साग. हे घे पाणी पी.”

“नाही सर, मी जे सांगितले तेवढेच खरे आहे. हे कोणी केलं मला माहित नाही.”

“ठीक आहे. पण आत्ता तू मला जे सांगितलेस ते तुझ्या घरात किंवा इतरही कोणाला सांगू नकोस. आता जा आणि तुझ्या बाबांना आत पाठव आणि हो पुन्हा वेळ पडलीच तर मी बोलावेन तेव्हा हजर रहायचं.”

अमित डोळे पुसत बाहेर गेला आणि त्याच्या बाबांना आत जायला सांगितले.

काणे घाबरतच आत आले आणि कुलकर्णींच्या समोरच्या खुर्चीत बसले.

कुलकर्णींनी त्यांच्यासमोर आपल्या लॅपटॉपच्या सीसीटीव्ही फुटेजमधील काही लोकांना काणेंना ओळखायला सांगितले आणि एका फोटोकडे बघून विचारले,

“ही व्यक्ती कोण आहे? तुम्ही ओळखता का ह्या व्यक्तीला?

काणे क्षणभर स्तब्ध झाले आणि मग कुलकर्णीच्या प्रश्नांना ते एक एक करत उत्तरे देऊ लागले.

चौकशी पूर्ण झाली तसे काणे बाहेर जाऊ लागताच कुलकर्णी म्हणाले,

“मिस्टर काणे, आपल्यात आत्ता जे काही बोलणं झालं ते गुप्तच ठेवा.”

होकारार्थी मान हलवत, कपाळावरचा घाम पुसत काणे आपल्या मुलासोबत पटकन पोलीस स्टेशनबाहेर पडले.

कुलकर्णीही एका लेडी कॉन्स्टेबलसह आत्ताच हाती आलेल्या नव्या माहितीचा पाठपुरावा करायला पुढच्या तपासणीसाठी बाहेर पडले.

-------------------------------------------------------------क्रमश:

फर्स्ट फ्लोअर.

भाग चौथा

@ ज्योती सिनफळ.

इ. कुलकर्णींना काणेंकडून काय नवी माहिती मिळाली? त्याचा ह्या घटनेशी काही संबंध असेल का?
कुलकर्णींना ह्यातला खरा गुन्हेगार शोधण्यात यश येईल?
हे रहस्य वाचण्यासाठी शेवटचा भाग नक्की वाचा.

🎭 Series Post

View all