Login

फर्स्ट फ्लोअर भाग - एक

The Story About Molestation And Culprit
फर्स्ट फ्लोअर.
भाग -एक
@ज्योती सिनफळ.

रात्रीचे साधारण नऊ वाजलेले होते. आरती आणि सागर अतिशय घाबरलेल्या अवस्थेत आपली मुलगी विशाखाला संजीवनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला घेऊन आले होते. मुलीची अवस्था जरा नाजूकच होती. त्यांच्यासोबत त्यांचे फॅमिली डॉक्टर जोशी आणि सोसायटीतील सभासद काणे आणि मेहता पण होते. हॉस्पिटलमधील डॉक्टर खोटेंना बघुन डॉक्टर जोशी पुढे आले आणि त्यांनी विशाखाबद्दल डॉक्टरांना थोडक्यात सांगितले. डॉक्टर खोटेंनी विशाखाला तपासले आणि ताबडतोब तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्याच्या सुचना आपल्या स्टाफला दिल्या आणि ऑपरेशन थिएटरमध्ये जाताजाताच जोशींना मागे वळुन म्हणाले,

“कोणीतरी पेशंटच्या फॉर्मच्या फॉर्म्यालिटीज पूर्ण करा. तोपर्यंत आम्ही पुढची तपासणी करतो.”

थोड्या वेळात डॉक्टर खोटे गंभीर चेहऱ्याने ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले आणि मि. आणि मिसेस भावेंना म्हणाले,

“विशाखाची प्राथमिक तपासणी करताना आम्हाला असे आढळून आले आहे की तिच्यावर कोणीतरी अतिप्रसंग केलेला आहे. तिचा व्हजैनल स्कीन टेअर झाली आहे. ब्लिडींग पण भरपूर झाले आहे. आपल्याला ताबडतोब तिला ब्लड द्यावे लागेल. आमचे उपचार सुरूच आहेत परंतु अजुन काही टेस्ट्स करणे बाकी आहे. त्यासाठीचे सॅम्पल्स आम्ही लॅबोरेटरीला पाठवले आहेत. त्याचे रिपोर्ट्स आल्यानंतर आपण पुढचे उपचार सुरू करु. बाय द वे तुम्ही पोलिसांना कळवले आहे का? कारण ही पोलीस केस आहे आणि पोलिसांना सांगणे गरजेचे आहे.”

हे ऐकताच सागर आणि आरती एकमेकांकडे कावऱ्याबावऱ्या नजरेने बघू लागले. हे सगळ काय घडतय हे समजण्याच्या मनस्थितीतच ते नव्हते? त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन डॉ. खोटे त्यांना सांत्वन देत म्हणाले,

“ठिक आहे तुम्ही चिंता करु नका. आम्ही पोलीसांना कळवण्याची व्यवस्था करतो.”

आरती मात्र ह्या सर्व प्रकाराने खुपचं घाबरली होती. आपल्या डोळ्यातील पाणी पुसत तिने डॉ. विचारले,

“माझी विशाखा कशी आहे डॉक्टर?”एवढ्याशा लेकरावर असं कोणी का केलं असेल? आम्ही तिला भेटु शकतो‌ का?” ‌

त्यावर डॉ. खोटे आरतीला म्हणाले,

“आत्ता ती ऑपरेशन थिएटरमध्ये आहे. थोड्याच वेळात तिला आय. सी. यु. मध्ये शिफ्ट करू आम्ही. मग तुम्ही तिला बघू शकता परंतु भेटण्याची लगेच परवानगी देता येणार नाही कारण ही पोलीस केस आहे.”

आरती व सागर हे ऐकुन कोलमडून पडले. ते तिथेच एका बेंचवर हवालदिल होऊन बसले. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे थोड्याच वेळात इन्स्पेक्टर कुलकर्णी त्यांच्या लेडी कॉन्स्टेबलसह तिथे आले व ते सरळ डॉ. खोटेंच्या केबीनमध्ये गेले. त्यांची एकमेकांशी काय चर्चा झाली माहीत नाही पण थोड्या वेळाने ते डॉक्टरांच्या केबीनमधून बाहेर आले आणि सागर आणि आरतीला उदेशुन म्हणाले,

“मी कम्प्लेंट नोंदवुन घेतली आहे पण नेमकं काय झाले आहे हे कोणी सांगू शकेल का?“

ह्या प्रश्नावर आरती परत रडायला लागली. सागरची अवस्था काही त्याहुन वेगळी नव्हती. तरीसुध्दा धीर करून तो इन्स्पेक्टर कुलकर्णींना म्हणाला,

“मी सागर भावे. ही माझी बायको आरती भावे. पेंशट विशाखा भावे आमची एकुलती एक मुलगी.”

पुढे इन्स्पेक्टर कुलकर्णींनी विचारले,

“हे सर्व घडलं तेव्हा तुम्ही कुठे होतात?,”

सागर परत एकदा रडायला लागला आणि म्हणाला,

“आम्ही दोघेजण बॅंकेत नोकरी करतो. नेहमीप्रमाणे तेव्हाही आम्ही ऑफीसमध्येच होतो. आमची एवढी लहान मुलगी तिने कोणाचे, काय वाईट केले हो, म्हणुन तिला एवढी क्रूर शिक्षा मिळाली!”

हे वाक्य बोलताना सागर पुन्हा जोरजोराने रडायला लागला. सागरची अवस्था पाहून काणे धावतच त्याला सावरायला त्याच्याजवळ आले. आरती मात्र नुसती सुन्न होऊन शुन्यात बघत बसली होती. आजुबाजुला काय चालले आहे ह्याचे तिला कसलंच भानच उरल नव्हतं.

इन्स्पेक्टर कुलकर्णी सागरला म्हणाले,

“मिस्टर सागर तुमची मनस्थिती मी समजू शकतो, पण पुढील तपासासाठी मला तुमच्या घराची तपासणी करावी लागेल आणि गरज पडल्यास सोसायटीतील लोकांची चौकशी पण करावी लागेल.”

त्यावेळी बाजुला उभे असलेले काणे पुढे येऊन इन्स्पेक्टर कुलकर्णींना म्हणाले,

“सर,मी आनंद काणे. मी मनोहर हाऊसिंग सोसायटीचा रहिवासी आहे. सागर भावेंच्या समोरच्याच फ्लॅटमध्ये‌ मी राहतो. त्यांच्याएवजी मी तुमची मदत केली तर‌ चालेल का? कारण आत्ता ते दोघेही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीएत.”

त्यावर इन्स्पेक्टर कुलकर्णी काणेंना म्हणाले,

“ठीक आहे. चालेल”

इन्सपेक्टर कुलकर्णी पुढच्या तपासासाठी काणेंसोबत भावेंच्या सोसायटीत पोहोचले तेव्हा रात्रीचे साधारण बारा वाजले असतील. इतकी रात्र होऊनही सोसायटीत पोलीस आलेले कळताच सगळे लोक पोलिसांच्या भोवती जमा झाले. काहींनी काणेंकडे विशाखाची चौकशी केली. एकंदरीतच सोसायटीत भय आणि चिंतेचे वातावरण पसरलेले होते. ती सगळी गर्दी बघून इन्स्पेक्टर कुलकर्णीनी सर्व लोकांना तात्काळ आपापल्या घरी जायची विनंती केली. बरोबर आलेल्या स्टाफने गर्दी मागे हटवून इन्स्पेक्टर कुलकर्णींना भावेच्यां घरी जायचा रस्ता मोकळा करून दिला.

इन्स्पेक्टर कुलकर्णी जेव्हा पहिल्या मजल्यावर पोहचले तेव्हा भावेच्या घराचा दरवाजा सताड उघडा होता. इ.कुलकर्णींच्या सरावल्या डोळ्यांनी घराच्या मुख्य दरवाजातून हॉलमधे शिरताच आजुबाजुच्या परिसराचे निरिक्षण केले. हॉलला लागून असलेल्या विशाखाच्या बेडरुममध्ये ते गेले तेव्हा तिथे त्यांना पलंगावरची चादर अस्ताव्यस्त झालेली आढळली. चादरीवर रक्ताचे डाग पडलेले होते. बेडरुममध्ये पलंगाच्या साईड टेबलावरील टेबल लॅम्प खाली पडून त्यातील दिव्याच्या काचा सर्वत्र विखरून पडल्या होत्या.पाण्याची बाटलीही खाली पडून त्यातील पाणी जमिनीवर सांडलेले दिसत होते. बॉटलची कॅप मात्र तिथे दिसत नव्हती.

एकंदरीतच खोलीमध्ये काहीतरी झटापट झाल्याची लक्षणे दिसत होती.

इन्स्पेक्टर कुलकर्णींनी घरातील इतर खोल्यांचीही बारकाईने पहाणी केली व आपल्या सब इन्स्पेक्टरला बेडरुम आणि संपूर्ण घरातील वस्तुंवरचे ठसे घ्यायला सांगितले. तसेच फोटोग्राफरलाही बेडरुम आणि इतर जागेचे वेगवेगळ्या अॅंगलमध्ये फोटो घ्यायला सांगितले.

मिस्टर काणे इन्सपेक्टर कुलकर्णीच्या मागेमागे प्रत्येक खोलीमध्ये फिरत हो‌ते. ते बघुन इन्सपेक्टर कुलकर्णी एका जागी थबकले आणि मागे वळले. त्यांच्या अचानक थांबण्याने मिस्टर काणें पण जागीच थांबले. इ. कुलकर्णींनी आपला पोलिसी कटाक्ष काणेंवर टाकून त्यांना विचारले,

“मिस्टर काणे तुम्ही कुठे राहता?”

इन्सपेक्टर कुलकर्णीच्या अचानक आलेल्या प्रश्नाने मिस्टर काणे गांगरले. त त् प प् करत त्यांनी उत्तर दिले,

“हे का.. य मी त.. ते स मो र च्या १०२ नंबर फ्लॅटमध्ये राहतो.”

“अच्छा ! बरं मग तुम्ही किती वर्षापासून भावे कुटुंबाला ओळखता?”

“जवळपास दहा वर्षांपासून आम्ही एकमेकांचे चांगले शेजारी आणि मित्र आहोत.”

“बरं,मग ह्या फ्लोअरवर अजून कोण कोण राहतात?”

“इथे पलीकडे १०३ मध्ये दाते आज्जी राहतात. त्यांच्या पलीकडे पुढे १०४ मध्ये पटवर्धन राहतात.”

काणे बोलत असताना इन्सपेक्टर कुलकर्णींची नजर आपल्या हातावरच्या घड्याळाकडे गेली. सगळे होईपर्यंत रात्रीचा एक वाजला होता. ते बघून ते काणेंना म्हणाले,

“खरंतर आपल्याला बाकी सगळ्यांच्या चौकशा करायच्या होत्या पण आता खुप उशीर झाला आहे. असं करा उद्या सगळ्यांना इकडे हजर राहायला सांगा. मी उद्या सकाळी परत येईन.”

इ. कुलकर्णी आपल्या सबइन्स्पेक्टरला घर सील करायला सांगून सोसायटीच्या बाहेर पडले.

—---------------------------------------------------------
क्रमश:
भाग -एक
@ज्योती सिनफळ

काणे कुलकर्णीच्या मागे मागे का करत आहेत?
इन्स्पेक्टर कुलकर्णींनी प्रश्न विचारल्यावर काणे‌ का गांगरले?
ह्या सगळ्या घटनांमध्ये ‌त्यांचा काही हात तर नाही ना?
मिस्टर काणे पोलिसांची दिशाभूल तर करत नाहीएत ना?
ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घ्यायला पुढचा भाग नक्की वाचा.

0

🎭 Series Post

View all