बहर प्रीतीचा भाग -४

कर्तव्य आणि श्रद्धा भाव जोपसणाऱ्या दोन जीवांची बहरू पाहणारी प्रेम कहाणी.
भाग -४

न्याहारी आटोपून आई स्वयंपाकाला लागते. सावी आपल्या ऑफिसच्या तयारीला आणि नेहमीप्रमाणे मृनू आपल्या मोबाईल मध्ये गुंतून जाते.

"ए आईssssss झालाय का गं माझा डब्बा तयार? उशीर होतोय गं आणि आधी मठात ही जायचं आहे ". सावी तयार होताना आपली बडबड सुरु ठेवते.

"हा घे तुझा डब्बा आणि हे घे घे पैसे, ज्यांच्याकडून मदत घेतलीये आजपासून च थोडे थोडे देणं सुरु कर".

सावी जरा आश्चर्याने च बघते आणि विचारात जाते की इतके पैसे कुठून आले असतील? पण तिने काही विचारण्या अगोदर आईच उत्तर देते.

"अगं इतकं विचार करण्यासारखं काही नाही, आज सकाळी लिमये येऊन गेले अगं ते नाही का आपले आर. डी एजन्ट ते आले होते तु अंघोळीला गेली होती तेव्हा, त्यांनीच पैसे आणून दिले पैसे. बाबांची म्हणे कुठली तरी आर. डी आटोपली ".

"अगं मग असू दे नं हे पैसे गुंतवणूक कर. बाकी ते मी ह्या महिन्याचा पगार आल्यावर देणं सुरु करेलच " सावी आईला सुचवते.

"ते काही नको, आता देणं सुरु कर म्हणजे माझं समाधान."आई फर्मान च सोडते.

"बरं बाई आज अर्धी सुट्टी टाकते आणि आधी जाऊन भेटते, झालं का मग समाधान?" सावी समजवते आईला.

"हो, हे घे पैसे आणि ठेव तुझ्याजवळ आणि देऊन ये ते."

सावी आधी मठात जाते. स्वामींना चाफ्याची फुलं अर्पण करते आणि नमस्कार करून आपला मोर्चा गुरुजींकडे वळवते.

"आज चक्क स्वामींना सुट्टी आणि स्वारी आमच्या कडे कशी काय वळली?" गुरुजी तिला विचारतात.

त्यांना वाकून नमस्कार करता करता ती बोलू लागते,
"काय हो काका म्हणजे काय मी तुमच्यासोबत बोलतच नाही का?"

ते तिच्या बाबांचे ओळखीतलेच असतात म्हणून ती कधी त्यांना काका तर कधी गुरुजी म्हणून संबोधायची तिला सवय असते.

"तसं नाही पण काही विशिष्ट मोर्चा असल्याशिवाय स्वारी वळत नाही बाळाची आमच्या कडे."

"तसं नाही हो मला थोडी माहिती हवी होती, त्या वृषभ सरपोतदार बद्दल "ती गुरुजींसोबत बोलत असते.

"हम्म आलाय विषय लक्षात, बोला "

"काका काल मी इथून गळ्यातली साखळी विकायला म्हणून गेले तर ते तिथं आले आणि मला तसं करण्यापासून थांबवलं त्यांनी आणि माझी मदत ही केली ".

"अगं मग चांगलं आहे ना त्यात एवढं विचार करण्यासारखं काय?, म्हणजे इतक्या शंका का आहेत?"

"तसं नाही हो काका, पण अनोळखी व्यक्ती इतक्या सहज इतकी मोठी मदत का करेल कुणाला. म्हणजे उगाच काही कारण असल्याशिवायच?"

गुरुजी तिला थांबवत बोलू लागतात, "अगं प्रत्येकदा असं चांगलं होत असताना अशी शंका यायलाच हवी का?, आणि हो ही तुझ्यासारखा स्वामीभक्त आहे शिवाय त्यानं ऐकलं तुझं बोलणं आणि वाटली मदत करावी त्यात काय इतकं?माझ्याचकडून काढली त्यानं तुझी माहिती."

"हं ठीक आहे पण तुम्ही ओळखताच तर मला थोडी माहिती हवी होती त्यांच्याबदल ".

"अगं त्याचं नाव वृषभ सरपोतदार, नामदार इंडस्ट्रीयालिस्ट सुनिल सरपोतदार यांचा लहान मुलगा. चांगला शिकलाय, अमेरिकेतून ग्रॅज्युएट झालाय आणि घरचीच कंपनी जॉईन केलीये त्याने, खूप हुशार आहे बरं म्हणजे फक्त वडिलांना जॉईन केलंय म्हणून कमी समजू नकोस. फार गुणी मुलगा आणि स्वामींवर निस्सीम श्रद्धा..."

गुरुजींना थांबवत सावी बोलू लागते, "बरं कळलं मला
तुमचा तो वृषभ फार गुणी आहे ते.असो, मी आता पळते". आणि लगेच नाहीशी होते.

स्वामी आणि गुरुजींची भेट घेऊन ती पोहचते ते थेट सरपोतदार इंडस्ट्री च्या गेट समोर.

सावी आत शिरते आणि वृषभ बदल रेसेपशनिस्टला विचारते तर ती कॉल करून त्याला कळवते आणि तो लगेच बाहेर येतो.

"अरे नमस्कार,पण तुम्ही आता इथं कश्या?बरं चला माझ्या केबिन मध्ये जाऊन बोलू "सावी ला रूम कडे नेट वृषभ बोलू लागतो.

दोघेही केबिन मध्ये जातात. वृषभ कॉल करून दोघांसाठी कॉफी मागवून घेतो.

"हा तुम्ही दिलेल्या मदतीचा पहिला हफ्ता " असं म्हणत आईने दिलेले पैसे ती वृषभ समोर ठेवते.

"बापरे म्हणजे तुम्ही पैसे वगैरे घेऊन पळून गेल्या असत्या तर काय केलं असतं मी? विचारच करवत नाही हो." उगाच सावी ची थट्टा करण्याच्या सुरात तो बोलू लागतो.

"हम्म घ्या आता मजा". सावी बोलते.

"बरं मग स्वामी काय म्हणाले?आज विचारपूस करणार होत्या नं तुम्ही कुणाचीतरी त्यांच्याजवळ " परत मजा घेत तो तिला विचारू लागतो.

पण सावी ही काही कमी नसतेच त्यामुळं ती सुद्धा उत्तर देते,"हो विचारलं नं आणि सांगितलं ही त्यांनी. म्हणाले बरा आहे मुलगा, म्हणजे विश्वास वगैरे ठेवू शकतो. हुशार आहे बऱ्यापैकी, कर्तबगार ही वाटतोय ".

"बापरे एवढं बोलले का स्वामी! नशीब चांगलं आहे म्हणायचं आमचं ". तो उत्तर देतो.

पण सावी चा मस्करीचा मूड तसाच असतो म्हणून ती बोलणं सुरूच ठेवते,"हो म्हणजे असावं च नशीब चांगलं त्याशिवाय का माझ्यासारखी मैत्रीण मिळालीये."


"ओह्ह्ह म्हणजे मैत्री झालीये का आपली, आणि हे झालं कधी?कारण काल तर एकजण मदत घ्यायला ही तयार नव्हतं आणि आज चक्क मैत्रीण वगैरे, वाह्ह गाडी काय जोरात धावतेय."आणि दोघेही हसू लागतात.

"ह्या मैत्रीचे खात्रीदार खुद्द ते आहेत म्हणून विश्वास बसलाय ", असं बोलताना ती कानाला हात लावते.

"अच्छा म्हणजे ही स्वामींची कृपा म्हणायची, स्वामी खूप खूप धन्यवाद, बरं मग आता ह्या मैत्रीची सुरवात साजरी करायला पाहिजे नाही का?".

"नाही आता नको कारण ह्या मैत्रिणीला ऑफिस ला जायचं आहे. इकडे यायचं म्हणून अर्धी सुट्टी घेतली होती, आणि म्हणूनच आपण ही मैत्री ची सुरवात आपण पुढल्या वेळी साजरी करूया " सावी सुचवते.

"काहीच हरकत नाही, मैत्री झालीये ना मग ती साजरी ही होत राहील." वृषभ सकारात्मक उत्तर देतो.

आणि उठता उठता तिचं त्याच्या टेबल वर लक्ष जातं, ती बाहेर येते आणि रेसेप्शन वर विचारपूस करते आणि तिच्या लक्षात येतं की वृषभ च्या कंपनी मध्ये एक जागा खाली आहे म्हणून मग ती तिचा बायोडाटा देऊन ठेवते पण याची खबर वृषभ ला लागू देत नाही.

एक आठ पंधरा दिवस सरतात,मधल्या काळात या दोघांचं फार काही बोलणं होत नाही आणि एक दिवस अचानक सावी ला सरपोतदार इंडस्ट्री मधून इंटरव्यू साठी कॉल येतो.

तसा तिला खूप आनंद होतो पण ती शांततेने सगळं पार पाडायचं ठरवते.

आज ऑफिस ला दांडी मारून इंटरव्यू ला जायचं ठरवते, एक छान कॉटन चा ड्रेस घालून मस्त तयार होऊन ती निघते.

"अगं अगं डब्बा तर घेऊन जा, आज काही खाल्लं ही नाहीयेस ". आई घाईत असलेल्या सावी ला थांबवत बोलू लागते.

"आज नको गं आई, आज मी जरा घाईत आहे आणि मी खाऊन घेईल एक दिवस बाहेरून काहीही होत नाही. चल चल बाय मी निघते "असं म्हणून आईला नमस्कार करत निघून ही जाते.

🎭 Series Post

View all