Login

अर्धांगिनी - भाग -48

Bayko

अर्धांगिनी – भाग  - 48


त्या रात्रीनंतरचा दिवस जड असतो…सकाळी दादा लवकर उठतो, तो देवासमोर उभा राहून डोळे मिटतो,आज पहिल्यांदाच तो देवाजवळ काही मागत नाही…फक्त एवढंच म्हणतो..“बाप्पा...माझ्या बहिणीला ताकद दे.”...थोड्याच वेळात तिघंही पोलीस स्टेशनकडे निघतात,स्टेशनचं दार दिसताच शर्वरीच्या पावलांचा वेग मंदावतो.

शर्वरीचा हात थरथरतो, डोळ्यांसमोर जुन्या आठवणी झरझर फिरतात,साक्षी लगेच तिचा हात घट्ट धरते.“मी आहे.” दादा दुसऱ्या बाजूने तिच्या खांद्यावर हात ठेवतो“आणि मीही.”बोलतो.


ती एक दीर्घ श्वास घेते…आणि आत पाऊल टाकते, स्टेशनमध्ये नेहमीसारखी गडबड असते, लोक… तक्रारी… आवाज…
पण शर्वरीसाठी तो आवाज हळूहळू बोथट होतो.

एक महिला पोलीस अधिकारी पुढे येते आणि बोलते वकिलांचा कॉल आला होता सांगितलं आहे तुमच्याबद्दल.“तुम्ही बसा, घाई नाही.जेवढं सांगता येईल, तेवढंच सांगा.”

शर्वरी सुरुवात करते…पहिलं वाक्य बोलतांनाचं तिचा आवाज अडखळतो, दादा तिला पाहून मान हलवतो, साक्षी तिच्या हातावर हलकं दाब देते.

मग शब्द येऊ लागतात...थांबून…रडून...
कधी अश्रूंमध्ये…कधी रागात…
सात वर्षांचा नरक...ती एका कागदावर उतरवत असते.
खोलीत शांतता असते…ती शांतता वेदनेची असते.


महिला अधिकारी नोंद घेताना क्षणभर थांबते, डोळे पुसते…आणि म्हणते...“तू खूप धाडसी आहेस.”
तो शब्द शर्वरीसाठी नवा असतो,धाडसी.
तक्रार नोंदवल्यावर बाहेर येताना शर्वरीचं अंग थकल्यासारखं वाटतं…पण मन हलकं झालेलं असतं.

दादा उभा राहून हे सगळं पाहत असतो, त्याच्या डोळ्यांत पाणी येतं…पण यावेळी ते दुःखाचं नसतं, ते आशेचं असतं.

शर्वरीचा लढा आता फक्त न्यायासाठी नाही…तर स्वतःची ओळख घडवण्यासाठी आहे, पोलीस स्टेशनमधून बाहेर पडताना आकाश ढगाळलेलं असतं…पण शर्वरीच्या आत कुठेतरी पहिल्यांदाच उजेड पडलेला असतो.

ती पायऱ्यांवर थांबते,एक क्षण डोळे मिटते,जणू सात वर्षांच्या ओझ्याखालून पहिलं पाऊल मोकळ्या जमिनीवर टाकतेय.

साक्षी पाठीवरून हात फिरवते आणि म्हणते“आज तू खूप मोठं काम केलंस.”शर्वरी काहीचं बोलत नाही…

दुपारी दोन पत्रकार दारात उभे राहतात, कॅमेरे, प्रश्न...
“पीडित मुलगी तुम्हीच का?”“हे सगळं खरं आहे का?”
“आता पुढे काय?”दादा पुढे सरसावतो.
“माझी बहीण कोणालाही उत्तर देणार नाही.”पण तेवढ्यात शर्वरी पुढे येते आणि म्हणते..
“मी बोलणार आहे.”दादा क्षणभर गप्प होतो.


मग हळूच बाजूला सरकतो, कॅमेऱ्यांचा प्रकाश तिच्या डोळ्यांवर पडतो,ती एक दीर्घ श्वास घेते,आणि पहिल्यांदाच सार्वजनिकपणे स्वतःसाठी उभी राहते.
“मी माझं नाव सांगणार नाही,”
ती ठामपणे म्हणते.“कारण नाव महत्त्वाचं नाही.
जे घडलं… ते महत्त्वाचं आहे.”क्षणभर शांतता.“मी काही चुकीचं केलं नाही, माझं शरीर, माझं आयुष्य सौद्याला लावलं गेलं.
मी गप्प राहिले…कारण मला भीती होती.”

पण ती पुन्हा सावरते.“आज मी बोलतेय…कारण माझ्यासारख्या अजूनही अनेक मुली आहेत ज्या बोलू शकत नाहीत.”मी मागे हटणार नाही.”
पत्रकार निघून जातात, दादा विचारतो, “भीती वाटतेय?”शर्वरी हसते आणि म्हणते.
“हो…
पण त्यापेक्षा जास्त आता स्वतःवर विश्वास वाटतोय.”
दादा डोळे पुसतो.“आज माझी बहीण खऱ्या अर्थाने जन्मली.”ही फक्त सुरुवात आहे, लढा अजून मोठा आहे, पण शर्वरी आता पळणारी नाही…ती समोर उभी राहणारी आहे.

(पुढच्या भागात — न्यायालयीन लढ्याची पहिली तारीख आणि शर्वरीसमोर उभं राहणारं कठीण आव्हान…)


सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख