Login

बेलभंडार भाग 11

मोहिमेचा थरार सुरू झाला.



बेलभंडार भाग 11

मागील भागात आपण पाहिले की बिजलीने छावणीत आतल्या भागात प्रवेश करायला आवश्यक मुद्रा मिळवली. केशरने दिवणाजीच्या टिपणांचे छाप आणले. इकडे गुणवंता महालात मशाली विझल्यावर बाहेर पडायचा सराव शेवटचा करून पाहणार होती. आता पाहूया पुढे.


गुणवंता वाट बघत जागी होती. थोड्याच वेळात एकेक करून मशाली विझवल्या गेल्या आणि संपूर्ण लाल महाल अंधारात बुडाला. गुणवंता त्या अंधारात सराईतपणे चालू लागली. यशस्वीपणे महालाच्या बाहेर येताच ती प्रसन्न हसली. गेल्या आठ महिन्यांच्या कष्टाचे चीज झाले होते.

खानाच्या अंतपुरात मात्र अजून दिव्यांचा प्रकाश दिसत होता आणि घुंगरांचा आवाज ऐकू येत होता. गुणवंता पुन्हा जनानखान्यात जाऊन झोपी गेली.



केशर गणपतीच्या दर्शनाला निघाली. जाताना तिने एक मोठे नैवेद्याचे ताट सोबत घेतले होते. चतुर्थी होती तरीही गेले दोन वर्षे शायिस्ताखान तळ ठोकून राहील्यापासून मंदिराची पार रया गेली होती. आजूबाजूला सात आठ भिकारी मंदिराचा आसरा धरून कसेबसे तग धरून होते.

भग्न अवस्थेत असलेल्या मंदिराकडे पहावत नव्हते. केशर पहाटेच निघाली होती. थोडी दूर जाताच तिला एक फकीर उभा असलेला दिसला.

तेवढ्यात अचानक मोराचा आवाज तीनदा आला. केशरने खूण ओळखली. आजूबाजूला पहात तिने ताटात आणलेली वस्तू फकिराच्या झोळीत ठेवली आणि मागेही न पाहता ती चालू लागली.


राजगडावर नुकतीच पहाट होत होती. सह्याद्रीच्या गळ्यातील ताईत असणारा दुर्गराज अगदी शोभून दिसत होता. सूर्य उगवायला एक फकीर गडाची वाट चढत होता. महाराज देवघरात शंभू महादेवाला अभिषेक करत साकड घालत होते.

"महादेवा! काहीतरी मार्ग दाखव. किती दिवस परीक्षा पाहणार आहेस. आम्हास त्रास होता याचे दुःख नाही परंतु रयत पिडली जातेय."


तेवढयात दारावर वर्दी आली आणि महाराजांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले. महाराज बैठकीच्या दालनात आले.

"बोला बहिर्जी, काय म्हणतोय शायिस्ताखान?" राजांच्या आवाजाला नकळत धार आली.

"राजं, तुमी म्हणता तस खानाला घुसून मारायचा योक मारग सापडला हाय."
नाईकांनी उत्तर दिले.

"बोला बहिर्जी! बोला! कसा मारता येईल खान?" राजांनी बहिर्जींच्या खांद्याला धरून विचारले.

"राजं पंधरा दिसानी येक वरात जाणार हाये बगा." बहिर्जी सूचक बोलले.

"बहिर्जी,तयारीला लागा. तान्हा आणि येसाजीला निरोप धाडा. शेलके गडी निवडा."

राजांनी आदेश दिला आणि बहिर्जी प्रसन्न मनाने बाहेर पडले आपल्या हेरांना पुढील कामगिरी द्यायला.


खंडोजी आणि शंकर कामावर जायला निघाले तेवढ्यात एक कडकलक्ष्मीचा खेळ चालू असलेला दिसला.

"खंडोजी,चल पोतराजाचा खेळ बघू." शंकर त्याला ओढतच घेऊन गेला.


"आसूड बडवत आला आई लखाबाईचा फेरा.
आज पंधरा दिसानी घालू समद्या राकुसाना घेरा.

घेवून स्वांग आली,आई लखाबाईची स्वारी.
माझ्या मल्हारी करा आता लग्नाची तयारी.

संग महादेवाला घिऊन वाहा केशराच फुल.
धरा बिजलीचा आसूड आन घ्यावी फूड चाल.

आई लखाबाई माजी, बया हाय गुणवती.
तिला करावं प्रसन्न आला लखाबाईचा फेरा.

ह्यावेळी मात्र खंडोजी आणि शंकरने अचूक ओळखले. त्यांनी लांबूनच नाईकांना मुजरा केला आणि गर्दीतून बाहेर पडले.


"नाईक,वरातीत माणसं घुसवत्याल. पर आत दरवाज आन खिडक्या उघडाय लागत्याला." खंडोजी म्हणाला.

"व्हय,आदी वरात कुठून निगणार हाय? कुठशी थांबणार ते समद शोधू. " शंकरने उत्तर दिले.

"शंकर त्वा,बिजलीला गाठ. म्या केसर आन गुणवंता दोगिसनी समद सांगतो. खुद्द राजं येणार हायेत. कायबी कसूर व्हायला नग." खंडोजी आणि शंकर दोन दिशांना निघाले.


राघोजी आणि तीन सरदार तंबूत जळून मेल्याने बिजली सावध झाली होती. ती आता बहिर्जींच्या निरोपाची वाट पहात होती.

"मला बिजलीला भेटायचं हाय." शंकरने सांगितले.

"चला आत." सुभान त्याला इशारा करत म्हणाला.

शंकर आणि सुभान आत आले.

"नाईकांचा सांगावा हाय.आज पंधरा दिसा वरात हाय. त्यातून आत घुसून खानाला मारायचं हाय."
शंकरने सांगितले.


"म्या ह्या अंगठ्या वापरून आत शिरते. तिथं गुणवंता हाय."
बिजली त्याला म्हणाली.

"व्हय,आमीबी तथ आसू. पर जरा जपून." शंकर काळजीने म्हणाला.

"शंकरराव, आसल चिखलात जीन हाय आमचं. स्वराज्याचा काम आल तर जिवाचं सोन व्हईल." बिजलीने उत्तर दिले.


" व्हय, पर चिखलात कमळ उगिवत्यात आन अमासनी आवडत्यात." शंकर एवढे बोलून झटकन बाहेर पडला.


खंडोजीने केशरला गाठले.

"गावात लगीनघर हुडकून काढ. तिथूनच आत शिरायच हाय. म्या गुणवंताला खबर दिवून येतो."
खंडोजी निघाला.

केशर आता सावध झाली. ह्या साठमारीत तिला सहज शरीफखान कापता येणार होता.


तिने राणीला बोलावले. तिला सोबत घेतले. दोन्ही बारकी पोरे घेतली आणि केशर निघाली. तिला आता नजरेसमोर दिसत होता फक्त शरीफखान.


मोहीम फत्ते होईल का? शरिफखान मारला जाईल? खंडोजीला केशर मिळेल? बिजलीचे काय होईल?

वाचत रहा.
बेलभंडार.
©®प्रशांत कुंजीर.

0

🎭 Series Post

View all