बेलभंडार भाग 2
मागील भागात आपण पाहिले केशरने गनिमांचा हेर मारला. त्यानंतर ती त्याचाच घोड्यावरून घरी गेली. जिवाजीकाका नाईकांना खबर द्यायला गेले आता पाहूया पुढे.
"काकू सरक बाजूला. म्या करते भाकऱ्या. तू जा गायीच दूध काढ." केशर हातपाय धुवून भाकरी थापायला बसली.
थोड्या वेळाने जिवाजी आले. त्यांनी इशारा करून काम झाल्याचे सांगितले. तेवढ्यात सगुणा आत आली.
" झालं का तुमचं सुरू. काय सारक चालू आसत दोगांच?" सगुणा रागवत होती.
तेवढ्यात केशरने जेवायला वाढले.
" काकू एक इचारायच व्हतं. उद्या भैरोबाच्या यात्रला जायचं ना आपून?"
केशर गोड शब्दात बोलली.
"आता म्या न्हाई म्हणल तर तुम्ही बाप लेक माज आईकुन घरी बसणार हाय का? चंदी,सुमी, गोदी ह्यांना बी इचार ग."
काकूंनी परवानगी दिली.
आनंदात जेवण करून केशर बाहेर गेली. तलवारीचा सराव बाकी होता. केशर सराव कधी चुकवत नसे. तिने तलवार हातात घेतली आणि तिच्या नजरेत आई भवानीचा करारीपणा झळकू लागला.
"केशर,किती येळ लावती. चल की लवकर."
बाहेरून मैत्रिणी आवाज देऊ लागल्या.
केशर आवरून बाहेर आली आणि जिवाजी काका बघतच राहिले. आपल्याच लेकीला आपलीच नजर लागेल असे वाटले त्यांना क्षणभर.
"चला ग पोरींनो बसा लवकर गाडीत."
सगुणा घाई करत होती.
गाडीने लय धरली आणि मग सुरू झाली देवाची गाणी. केशरचा सुरेल आवाज ऐकून कान तृप्त होत होते. यात्रेच्या ठिकाणी पोहोचल्यावर सगळ्यांनी गाडी लावून आडोसा केला. चूल मांडली आणि मग जाणत्या बायका स्वयंपाक आणि पोरीसोरी निघाल्या यात्रेत.
बांगड्यांची, लुगड्यांची रंगीबेरंगी दुकाने. गुलाल,बुक्का,हळद,कुंकू यांचे लागलेले रंगीत ढीग. खेळणी पाहून रडणारी बारकी पोरे. नवीन लग्न झालेली जरा अवघडलेली जोडपी. नुसत्या दर्शनाला आलेल्या म्हाताऱ्या आणि म्हातारे. त्यांचे रंगीबेरंगी पटके. शेव, रेवड्या,बत्तासे सगळे बघत मैत्रिणी फिरत होत्या.
"केशर,बांगड्या बगु चल."
सुमी तिला ओढत घेऊन गेली.
हिरव्या,पोपटी,गर्द जांभळ्या, लालचुटूक बुट्ट्या असलेल्या बांगड्या पाहून पोरी हरकून गेल्या.
"ये दादा,त्या लाल बांगड्या दाव."
केशर दुकानदाराशी बोलत होती.
"नग,लाल नग. आय मारील मला. हिरव्या घेते मी." चंदी म्हणाली.
"शंकऱ्या आर गोऱ्या हातात हिरव्याच बांगड्या शोभून दिसत्यात नव्हं."
मागून पुरुषी आवाज आला तशी केशर रागाने गरकन मागे वळली.
भव्य कपाळ,रुंद छाती,केशरी पटका आणि पिळदार मिशी वर ओठात हसू.
त्याला पाहून ती क्षणभर थांबली आणि म्हणाली,"हिरव्या बांगड्या घालणारा मर्द शिलेदार असायला पायजे. आस दुकानात बांगड्या बगणारा नव्हं."
तिच्या डोळ्यांत अंगार दाटला होता.
"अय पोरी,कुणाला बोलतीस?" शंकऱ्या पुढे आला.
" शंकऱ्या माग हो! आर त्यासनी आजुन तसा मर्द भेटला नसल." त्याने मागून आवाज दिला.
"चला ग! हित लई माकड जमल्यात." केशर वेणीला हिसका देऊन म्हणाली.
"डाळींब व्हटाच लाल,दातात हिरा झळकला.
नजरन रोखून बाण,मुखडा चांदाचा हसला.
तू नार अशी गुलजार,शाहीर भान हरपला.
कुण्या गावाची तू सुंदरा,घाव कळजामंदी रुतला."
हे ऐकताच केशर फक्त रागाने पाहून पुढे निघून गेली. सगळीकडे फिरत असताना त्या एका ठिकाणी थांबल्या.
तेवढ्यात चंदाला पाहून एक यवन सैनिक म्हणाला,"हाय जानेमन! क्या बला की खुबसुरत हो तुम|"
"हे खेटर बगीतल काय? थोबाड रंगवू का मेल्या." चंदा संतापली.
तोपर्यंत त्याच्या चार साथीदारांनी चंदाला घेरले. चंदा आता थोडी घाबरली. त्यातल्या एकाने घोड्यावरून खाली उतरून चंदाचा हात धरला.
"खबरदार! तिचा हात सोड न्हायतर मरायला तयार हो?" केशर गरजली.
"कौन मारेगा हमे? जानेमन इन नाजूक हातोसे हमे खुश करो." तो मोठ्याने हसत होता.
तोपर्यंत त्याच्या हातावर तलवारीचा वार झाला. तसे बाकीच्या तिघांनी उडी घेतली. केशर एकटी चौघांना भिडली. तलवार विजेच्या चपळाईने चालत होती. तेवढ्यात मागून एकजण केशरवर वार करताना पाहून चंदा जोरात ओरडली. पण त्याचा वार व्हायच्या आत त्याच्या छातीत एक लाथ बसली. कोणीतरी केशरच्या पाठीला पाठ लावून लढत होते. त्या चारही सैनिकांनी लोक जमत असलेले पाहून पळ काढला.
केशर मागे वळली आणि त्याच्याकडे बघतच राहिली.
"शाहीर,चला दर्शनाला उशीर होतोय." शंकर खाकरून म्हणाला.
"तुमचं लई उपकार झालं बघा." चंदा,सुमी आणि गोदा हात जोडत म्हणाल्या.
" शाहिरांना तलवारबी चालवता येती व्हय. मला वाटलं फकस्त तोंडच चालवाया येतंय." केशर अजून रागात होती.
पण तरीही तिला तो शाहीर आवडला होता. एवढ्यात मागून एक आवाज आला.
"खंडोजी, आव हिकड कुठ? हित काय करताय तुम्ही?" जिवाजी काकांचा आवाज ऐकून केशर चमकली.
"काय न्हाय काका. एक वाघीण लांडग्यांच्या टोळीत सापडली व्हती. तिला सोडवित व्हतो." खंडोजी हसून सांगत होते.
" केशर,चल पोरी. तिकडं म्हाताऱ्या ओरडत हायेत. खंडोजी तिकड खालच्या अंगाला गाड्या हायेत. दर्शन झालं की परसाद घ्यायला या."
जाताना जिवाजी आमंत्रण देऊन गेले. खंडोजी भान हरपून केशरकडे बघत होता.
इकडे राजगडावर सदर भरली होती.
" शायिस्ताखान जेजुरिकडे निघाला आहे. आम्ही इथे काय करतोय?" आऊसाहेब संतापल्या होत्या.
खान करत असलेली रयतेची लूट थांबावी आणि खानाला धडा शिकवावा अशी मसलत चालू होती.
"पर आऊसाब, खानाची फौज मोठी हाय. जे करायचं ते सावध राहून आन शत्रू टप्प्यात आणून." बहिर्जी अदबीने बोलले.
" खानाला मुलुखात येईपर्यंत गनिमी काव्याने हैराण करत रहा. त्याच्या फौजेवर छोटे छापे मारा."
महाराजांनी आज्ञा दिली आणि बैठक संपली.
ह्या लढाईत केशर आणि खंडोजीचे काय होईल? खंडोजी कोण आहे? केशरचे कामगिरीवर जायचे स्वप्न पूर्ण होईल का?
वाचत रहा.
बेलभंडार.
©®प्रशांत कुंजीर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा